Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Drought Crisis – संधी नव्हे, संकटाचे आव्हान!

Maharashtra Drought Crisis : अनपेक्षितपणे आदळणारे किंवा काही पूर्वसंकेत देऊन समोर उभे ठाकणारे कोणतेही संकट टाळता येणे जेव्हा शक्य नसते, तेव्हा त्याच्या झळा कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे हाच एकमेव उपाय असतो. असे प्रयत्न करण्यासाठी सामाजिक इच्छाशक्ती, यंत्रणांची सज्जता आणि योग्य नियोजन यांची गरज असते. याआधी जेव्हा जेव्हा अशी काही अनपेक्षित किंवा संकेत देऊन दाखल झालेली संकटे समाजावर कोसळली, तेव्हा या तीन बाबींची कसोटी पणाला लागली होती. उभ्या जगाचे जगणे वेठीस धरून जीव मुठीत धरण्यास भाग पाडणारे कोविडसारखे अनपेक्षितपणे उद्भवलेले जीवघेणे संकट असो, महापूर, चक्री वादळे, भूस्खलन, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती असोत किंवा दुष्काळासारखी परिस्थिती असो; अशा कोणत्याही काळात नियोजन, सामूहिक संघर्षशीलता आणि यंत्रणांची सज्जता पणाला लागलेली होती आणि त्यामधील अनेक त्रुटीदेखील अधोरेखित झाल्या होत्या.

खरे म्हणजे कोणतेही संकट नेहमीच भविष्यातील सावधगिरीचे नवनवे धडे नेहमीच देत असते. जेव्हा अशा कोणत्याही संकटांची चाहूल अगोदरच लागलेली असते, तेव्हा ते प्रत्यक्ष समोर येऊन उभे ठाकण्याआधीच त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी करावी लागते. महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थिती हे काही अनपेक्षित संकट म्हणता येणार नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या आधीच व्यक्त झालेल्या अंदाजातून त्याचे पूर्वसंकेत स्पष्ट झालेले असल्याने त्यास तोंड देण्याच्या उपाययोजनांची सज्जता करण्यासाठी पुरेसे नियोजन करणे शक्य झाले आहे. याआधीच्या अशाच परिस्थितीने शिकविलेल्या धड्यांची उजळणी आणि त्या वेळी त्या परिस्थितीकडून मिळालेले अनुभव यांच्या आधारावर आता महाराष्ट्र दुष्काळी स्थितीस सामोरे जाण्यासाठी योग्य प्रकारे सज्ज होत आहे ही समाधानाची बाब असली, तरी या स्थितीचा सामना करण्यासाठी त्याकडे गांभीर्याने पाहणे हीच पहिली गरज आहे.

या आधीच्या दुष्काळसदृश किंवा दुष्काळी स्थितीचा अनुभव लक्षात घेतला तर दुष्काळ हे संकट नसून संधी वाटावी असे काही घडल्याची उदाहरणे समोर आल्याने, ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ असा एक समजही रूढ झाला होता. आता मात्र परिस्थिती त्याहून वेगळी आहेच, पण अगोदरच्या अनुभवांचे पाढे पुन्हा आठवून त्यापासून शहाणपण शिकताना दुष्काळ ही संधी नव्हे, तर संकटच आहे याची प्रामाणिक जाणीव ठेवूनच परिस्थितीशी संघर्ष करावा लागणार आहे हेदेखील स्पष्ट झाले आहे. अपुऱ्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे चटके दिवसेंदिवस दाहक होत जाणार असून ते झेलण्यासाठी सामूहिकरीत्या नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचीच गरज आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ असे वाटण्याजोगे अनुभव याआधी आले असले, तरी ते केवळ एक व्यंगात्मक विधान नसून विशेषत: महाराष्ट्रातील राजकारणाचे आणि अर्थकारणाचे विदारक वास्तव आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण होणारी दुष्काळस्थिती हा जेव्हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी अक्षरश: अस्तित्त्वाचा प्रश्न ठरतो, तेव्हा या आपत्तींचे रूपांतर आर्थिक आणि राजकीय संधीमध्ये घडविण्यासाठी अनेकजण सरसावत असतात, हा जुना अनुभव आता बासनात बंद करावा लागेल, तरच दुष्काळाचा सामना सामूहिकरीत्या करणे अधिक सोपे होणार आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांकडून कोट्यवधींचा निधी दुष्काळ निवारण उपाययोजनांकरिता उपलब्ध होत असतो. टँकरद्वारे पाणी वितरण, चारा छावण्या, जनावरांच्या छावण्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी तात्पुरती कामे सुरू करावी लागतात. सामान्य माणसांना सोसाव्या लागणाऱ्या संकटांच्या झळांची तीव्रता कमी व्हावी हा यामागचा उद्देश असला तरी अशी कामे मिळविण्यासाठी सुरू होणारी स्थानिक स्तरावरील राजकीय वा सामाजिक वजनदारांची स्पर्धा आदींच्या अनुभवामुळे दुष्काळाकडे संकट म्हणून पाहण्याची मानसिकता कमी होत गेली हे वास्तव नाकारता येणार नाही. या संकटकाळात मदतीचा हात पुढे करण्यामागे माणुसकीआधी राजकीय फायदातोट्यांचा विचार उघड होतो, तेव्हा एकीकडे संकटापासून सावरण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि दुसरीकडे संकटाच्या संधीचा फायदा उकळणारे हात असे अस्वस्थ करणारे विसंगत दृश्यदेखील पाहावयास मिळते. असहाय्य संकटग्रस्तांच्या परावलंबित्वाचे भांडवल करून आपले राजकीय वजन पक्के करण्याच्या संधीचे सोने करण्यासाठीही अनेकांची धडपड सुरू होते, तर प्रशासकीय निष्काळजीपणाला निसर्गाच्या अवकृपेचा मुलामा देत सुस्त यंत्रणा नियोजनशून्यतेवर पांघरूण घालण्याची संधी शोधू लागतात.

दुष्काळासारख्या स्थितीत अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याची खरी कसोटी असते. या काळात टँकर माफिया, खासगी विहीरमालक, चारा छावण्यांचे मालक, खते, बियाणी आणि शेती साहित्याची बाजारपेठ यांच्या उलाढालींचे आलेख उंचावत जातात; तर गरीब, सामान्य जनतेच्या कमाई व खर्चाची दरी अधिक रुंदावत असते. अशा वेळी जनतेला दिलासा देण्यासाठी नैमित्तिक कामांत पारदर्शकता राखण्याचा प्रामाणिकपणा व संयमाची कसोटी ठरते. टँकरच्या फेऱ्यांची वस्तुनिष्ठ नोंद, चारा छावण्यांमधील पशूंची खरी आकडेवारी ही अशा काळातील गरज असते; परंतु त्यालादेखील भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे जुने अनुभव ताजे होण्याची भीती असते. परिस्थीतीमुळे कष्टकऱ्यांच्या रोजगाराच्या संधी आक्रसतात, शेतकऱ्यांची शेतीची कामे बंद पडल्याने त्यांना रोजगार शोधावा लागतो आणि कमी रोजगारात काम करणारे मुबलक हात उपलब्ध होतात. अशा वेळी गरजवंतांच्या पिळवणुकीचीदेखील भीती असते. याच पूर्वानुभवांतून, कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण कायमची दुष्काळमुक्ती करणे शक्य आहे असा राज्य सरकारचा विश्वास आहे. दुष्काळ हे संकट आहेच, पण आव्हान पेलण्याची संधी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.

Read About : Maharashtra Drought 2026 : महाराष्ट्राच्या दुष्काळझळा!!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.