Vrindavan Mystery : खोलीत आढळले ग्राइंडर, गुप्तांगाला दुखापत
मथुरा / वृंदावन : Premanand Maharaj disciple death : प्रसिद्ध संत प्रेमानंद जी महाराज यांचे शिष्य रसिक दुलारी शरण (मूळ नाव : दीपक लोधी) यांच्या मथुरेतील वृंदावन येथील ‘गुरु कृपा कुंज’ आश्रमात झालेल्या मृत्यूमुळे तीव्र खळबळ उडाली आहे. दीपक लोधी यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असले, तरी घटनेपूर्वी घडलेल्या अत्यंत संशयास्पद बाबींमुळे या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे. शुक्रवारी सकाळी १०.२५ च्या सुमारास रसिक दुलारी शरण आपल्या खोलीतून बाहेर आले, तेव्हा त्यांचे कपडे रक्ताने माखलेले होते. ते काही वेळ तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या गच्चीवर फिरत होते आणि नंतर खाली जमिनीवर १० सेकंद पडले.
सकाळी १०.३६ च्या सुमारास त्यांनी चौथ्या मजल्याच्या गच्चीवरून अचानक खाली उडी मारली. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तपासातील ३ मोठे संशयास्पद मुद्दे
१. खोलीत सापडले ग्राइंडर : पोलिसांनी त्यांच्या खोलीची झडती घेतली असता तेथे एक ग्राइंडर मशीन आढळले आहे.
२. गुप्तांगाला गंभीर दुखापत : शवविच्छेदन आणि प्राथमिक तपासात त्यांच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. उडी मारण्यापूर्वी ही दुखापत स्वत: केली होती की कोणी केली, याचा तपास सुरू आहे. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद असल्याचे ‘इंडिया टुडे’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
३. मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा : मृत्यूआधी त्यांनी मोबाईलमधील मेसेज, चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आला आहे.
साधूंमध्ये असंतोष
या घटनेनंतर वृंदावनमधील साधू-संतांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
महंत मोहिनी शरण महाराज यांनी प्रशासनाकडे उच्चस्तरीय तपासाची मागणी केली असून, घटनेनंतर ‘केली कुंज’ आश्रमाने कोणतेही अधिकृत वक्तव्य का जारी केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच साधूंच्या वेशात फिरणाऱ्या असामाजिक तत्त्वांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महंत गंगादास जी महाराज यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, आश्रमाशी जोडलेले काही शिष्य जमिनी बळकावणे आणि माफिया कारवायांमध्ये सहभागी आहेत, ज्यामुळे सनातन संस्कृतीची बदनामी होत आहे.
सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल आणि मोबाईलच्या तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Read About : Jaipur Temple Dispute : जयपूर मंदिरातील आवाजावरून वाद; पुजाऱ्याशी गैरवर्तन, दोघांना अटक
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.