‘माझ्या मामेबहिणीशी का बोलतोस?’ म्हणत वाद; गारखेड्यातील साईनगर परिसरात रात्री ११ वाजता हल्ला, आरोपीला बीडमधून पुंडलिकनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
छत्रपती संभाजीनगर : Murder in Chhatrapati Sambhajinagar :‘माझ्या मामेबहिणीशी का बोलतोस?’ या कारणावरून झालेल्या वादातून १९ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, हल्ल्यापूर्वी आरोपीने तरुणाला धमकी दिली होती. त्यानंतर अवघ्या तासाभरातच त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील साईनगर येथे बुधवारी (१४ ऑक्टोबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तौसिफ शमीम शेख (वय १९, रा. साईनगर, गल्ली क्रमांक ३, गारखेडा परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीवरून आदित्य शेळके (रा. साईनगर) याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंडलिकनगर ठाण्याच्या विशेष पथकाने रात्रीतून तपास करून १५ ऑक्टोबर रोजी दुपारी बीडमध्ये आरोपी आदित्यला अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांनी दिली.
मामेबहिणीशी बोलण्यावरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ हा सेंट्रिंगचे काम करत होता. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तौसिफ आणि त्याचा चुलत भाऊ मुजम्मीर जमिल शेख (वय २०) हे परिसरातील नूर मस्जिदीच्या पाठीमागे नेहमीप्रमाणे बसले होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणारा आदित्य शेळके तेथे आला.
तौसिफ आपल्या मामेबहिणीशी बोलतो, याचा राग आदित्यच्या मनात होता. याच कारणावरून त्याने तौसिफशी वाद घातला. वाद वाढत असल्याचे पाहून मुजम्मीरने तौसिफला घरी जाण्यास सांगितले. तौसिफ तेथून निघत असताना आदित्यने त्याला सोडणार नसल्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला.
तासाभरातच चाकूने सपासप वार
रात्री ११ वाजेच्या सुमारास तौसिफ घरासमोर दुचाकीवर बसून मोबाईल पाहत होता. त्यावेळी गल्लीतील प्रथमेश साळवे, आफान कुरेशी आणि अरबाज कुरेशी हे जवळच बसले होते. दरम्यान, आदित्य अचानक तेथे आला. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्याने धारदार चाकूने तौसिफच्या छातीवर, डोक्यावर आणि नाकावर वार केले. या हल्ल्यात तौसिफ गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
हल्ल्यानंतर आरडाओरडा ऐकून तौसिफचा भाऊ मोबीन, चुलत भाऊ मुजम्मीर आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. गंभीर जखमी तौसिफला त्याचा चुलत भाऊ मुस्तकीम आणि एका मित्राने दुचाकीवरून तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मुजम्मीर जमिल शेख याच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आदित्य शेळके याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ठळक मुद्दे :
- मृत तरुण : तौसिफ शमीम शेख, वय १९
- घटनास्थळ : साईनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर
- घटनेची वेळ : १४ ऑक्टोबर, रात्री सुमारे ११ वाजता
- वादाचे कारण : मामेबहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून वाद
- पोलीस ठाणे : पुंडलिकनगर पोलीस ठाणे
Read About : FDA Action in Sambhajinagar झेप्टो, बजाज ऑटो कँटिनचा परवाना निलंबित
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.