Ad Advertisement Ad Advertisement

Human-wildlife conflict in Marathwada मराठवाड्यात वाढला मानव-वन्यजीव संघर्ष

दीड हजार नागरिकांवर हल्ले : ५५०० पाळीव प्राण्यांचा बळी

Human-wildlife conflict in Marathwada छत्रपती संभाजीनगर : वाढते शेतीक्षेत्र, मानवी वस्ती, विकासकामे आणि प्राणीसंख्या; गायरान-माळरान जमिनींचे घटलेले क्षेत्र आदी कारणांमुळे मराठवाड्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. मार्च २०२१ ते मार्च २०२६ पर्यंत विभागात वन्यप्राण्यांकडून तब्बल १५७३ नागरिकांवर हल्ले चढविण्यात आले. यात अनेकजण जखमी तर काही नागरिक मृत पावले आहेत.

वनविभागाच्या अहवालानुसार, हिंगोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या सर्वाधिक घटना नोंद झाल्या असून यांत ६४९ नागरिक जखमी झाले आहेत. तर विभागात जवळपास ५५०० पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दगावली आहेत. बिबट, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बीड सर्कलमध्ये २०८, संभाजीनगर २१५, नांदेड ३८४ तर धाराशिव सर्कलमध्ये ११८ नागरिक जखमी झाले आहेत. विभागात एकूण १७३४ प्रकरणे (नुकसानभरपाई अर्ज) प्रशासनाकडे नोंदविली गेली. पैकी १६१ अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. यास सर्वाधिक अर्ज नांदेड सर्कलमधील (६९) आहेत.

वन्यजीवाच्या हल्ल्यात पाळीव प्राणी मृत्यूच्या ६४८१ घटना विभागात नोंदविल्या गेल्या. ५५२७ अर्ज मंजूर करण्यात आले. पैकी सर्वाधिक घटना या संभाजीनगर सर्कलमध्ये घडलेल्या असून त्यांची संख्या २४७० इतकी आहे. नांदेड सर्कलमध्ये ११८६ गुरे दगावली. बीड सर्कलमध्ये १०४५, हिंगोलीत ५०० आणि धाराशिव सर्कलमध्ये ३२६ पाळीव जनावरे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दगावली आहेत.

  • अन्नाच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीत येतात. जंगलात आपण काहीही ठेवलेले नाही. सर्व शासकीय योजना या मनुष्य केंद्रित आहेत. वन जमिनींचे पट्टे वाटप बंद केले पाहिजे अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक अतिंद्र कट्टी यांनी केली आहे.
शेतशिवारात उपद्रव सुरूच

रानडुक्कर, काळवीट, नीलगाय, हरणांच्या कळपांकडून शेतशिवारात पिकांचे नुकसान केले जाते. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त आहेत. २०२१ ते मार्च २०२६ दरम्यान ४५९३० पीक नुकसानीच्या घटनांची वनविभागाने नोंद घेतली आहे. सर्वाधिक पीक नुकसान संभाजीनगर सर्कलमध्ये झाले असून मंजूर अर्जांची संख्या १८६६६ इतकी आहे. बीडमध्ये हा आकडा २०२५, हिंगोली १३७४०, धाराशिव २७६५ आणि नांदेड मंडळात ८६७४ इतका आहे.

राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यात ११० मृत्यू

मार्च २०२१ ते मार्च २०२६ पर्यंत राज्यभरात बिबट्यांच्या हल्ल्यात ११० नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३४४ जण जखमी झाले आहेत. उसाची शेती बिबट्यांच्या अधिवासाचे प्रमुख क्षेत्र ठरत असल्याचे वन विभागाच्या अहवालात नमूद आहे.

मराठवाड्यात २९ जणांचा गेला जीव

मराठवाड्यात एप्रिल २०१६ ते मार्च २०२१ दरम्यान वन्यजीवांच्या हल्ल्यात २९ जणांनी जीव गमावला आहे. तर ६२७ जण जखमी झाले. पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या २४४१ घटना घडल्या. पीक नुकसानीची १४१५३ प्रकरणे नोंदली गेली.

मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाकडून नागरिकांत विविध उपक्रम राबवून जागृती केली जात आहे. शिवाय जखमी आणि मृतांच्या वारसांना शासनाच्या वतीने मदतनिधी दिला जातो. नागरिकांनी रात्रीच्या वेळी विनाकारण शेतशिवारात जाऊ नये. पुरेशी खबरदारी बाळगावी. वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला द्यावी असे आवाहन वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी केले आहे.

Read About : Indian Wolf Satellite Collar लांडग्याला सॅटॅलाइट कॉलर; राज्यातील दुसरा प्रयोग संभाजीनगरात
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.