Ad Advertisement Ad Advertisement

Water Wastage Fine – सावधान! पाण्याची नासाडी केल्यास थेट फौजदारी अन् 25 हजारांचा दंडही

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा निर्णय : १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

Water Wastage Fine छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाणी वाया घातले जाते. अनेकदा पाणी भरून घेतल्यानंतर वाहने धुणे, रस्त्यावर पाणी सोडण्याचे प्रकार शहरात दिसून येतात. आता याबाबत १५ दिवस नागरिकांत जागृती केली जाणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष संबंधितांवर दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल. पाण्याची नासाडी करणाऱ्या निष्काळजी नागरिकाला ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड केला जाईल, तसेच गुन्हा नोंदविण्यात येईल अशी माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी (दि.१) पत्रकार परिषदेत दिली.

आयुक्त येडगे म्हणाले, की पाणी भरून घेतल्यानंतर पाण्याने वाहने धुणे, रस्त्यावर पाणी मारणे, तसेच रस्त्यावर पाणी सोडून देणे असे प्रकार काही ठिकाणी निदर्शनास आलेले आहेत. अशाप्रकारे पाण्याची नासाडी नागरिकांनी टाळावी. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचत करणे, पाण्याचा जपून वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. राज्यभर दुष्काळ परिस्थिती आहे. सुदैवाने पडलेल्या पावसाचे आणि जायकवाडी धरणात आलेल्या पाण्यामुळे पाणीसाठा सध्या चांगला आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असल्याने आपण शहरात काही भागात चार दिवसांआड, तर काही भागात सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा करत आहोत.

जायकवाडी धरणात आज ८० टक्क्यांपर्यंत पाणीपातळी गेलेली आहे, गतवर्षी याच कालावधीत धरणाची पाणीपातळी ९८ टक्के होती. दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्याचा वापरही जास्त केला जाणार आहे.आगामी उन्हाळ्यातील परिस्थिती लक्षात घेता, सर्वांना पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा नळाला पाणी येते तेव्हा पाणी भरल्यानंतर नळाच्या तोट्या बंद कराव्यात. पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घ्यावी असे आयुक्त येडगे म्हणाले.

आधी आवाहन, नंतर दंड

सुरुवातीला घंटागाडीद्वारे नागरिकांना पाणी बचतीबाबत आवाहन केले जाईल. नागरिकांमध्ये पुढील १५ दिवस प्रचार-प्रसिद्धी केली जाईल. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून पाणी नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पहिल्यावेळेस ५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल. दुसऱ्या वेळेस पुन्हा आढळून आल्यास १० हजार, तिसऱ्या वेळेस २५ हजार रुपये दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच ज्या नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन घेतलेले असतील, त्यांनी आपले कनेक्शन अधिकृत (वैध) करून घ्यावीत. तपासणीत असे अवैध नळ कनेक्शन आढळून आल्यास संबंधितांविरोधात गुन्हा नोंद केला जाईल असा इशाराही आयुक्त येडगे यांनी दिला.

२१ ऑगस्ट झाली दंडात्मक कारवाई

२१ ऑगस्ट रोजी क्रांतीचौक ते पैठण गेट मार्गावर जलबचाव रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आयुक्तासह मनपा अधिकारीही सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान पैठण गेट येथील देशमुख फोटो स्टुडिओच्या इमारतीतून पाणी वाहत असल्याचे दिसून आल्याने आयुक्त येडगे यांनी नागरी मित्र पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने केलेल्या पाहणीत इमारतीवरील टाक्या भरल्यानंतरही नळ बंद न केल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून आल्याने, इमारत मालकाकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता.

Digital Arrest Scam : डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक; सायबर भामट्यांच्या 3 सापळ्यांपासून सावध राहा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.