Mumbai noise pollution : भारत हा सार्वजनिक बेशिस्तीचा देश आहे हे सगळ्यांना मान्य व्हायला हवं. ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, रेल्वे रूळांच्या आजूबाजूला पसरलेली दुर्गंधी, रस्त्यावर जाता-येता थुंकणारे लोक, पिचकाऱ्यांनी माखलेल्या कार्यालयांच्या भिंती हे सर्व आपण पाहत असतो.
महाराष्ट्रातील एका महापालिकेतअशा गलिच्छ भिंती स्वत: आयुक्त पुसत होते, पण तरीही तिथल्या कर्मचाऱ्यांना त्याची लाज वाटत नव्हती. प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवा, किमान कमी तरी करा असं सांगूनही त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. समाजाने शिस्त बाळगली, तर आरोग्याची समस्या बऱ्यापैकी हलकी होऊ शकेल!
रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. पुढचं वाहन जागचं हलू शकणार नाही हे माहीत असूनही मागून सतत हॉर्न वाजवला जातो. विनाकारण हॉर्न वाजवण्यामुळे आसपासच्या लोकांच्या कर्णेंद्रियांवर विपरीत परिणाम होतो, याची फिकीर बाळगली जात नाही. आजकाल शहरांमधून जागोजागी नवीन टॉवर्सची बांधकामं होताना दिसतात. बांधकाम करताना आवाज होणार असल्यास, किमान रात्री तरी हे काम थांबवावं अशा सूचना आहेत, मात्र त्यांचं पालन अजिबात होत नाही.
मुंबईत २० सप्टेंबर रोजी काळा चौकी इथल्या महागणपती मंडप परिसरात विजेचा तीव्र धक्का लागल्यामुळे एक आठ वर्षांची मुलगी व ३३ वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला. मंडळाच्या नावावर बसवलेला तात्पुरता वीजमीटर चुकीच्या पद्धतीने जोडला गेला होता. तेथे तात्पुरत्या उभारलेल्या थंड पाण्याच्या किंवा पाणपोईजवळ वीजप्रवाह उतरला आणि त्याची वायर भाविकांच्या पायात अडकल्याने ही भीषण घटना घडल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. केवळ निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाला. सार्वजनिक गणपतीच्या आगमनाच्या तसंच विसर्जनाच्या सोहळ्यात कोणत्याही व कशाही दिशेने उडणारे फटाके लावले जातात. ते आसपासच्या घरांमध्येही घुसण्याचा किंवा त्यामुळे रस्त्यावरच्या वायरींनाही धोका पोहोचू शकतो. तरीही याबाबतचा उत्साह कमी होत नाही.
वास्तविक ध्वनी आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे केले जाऊ शकतात. तसंच मिरवणुकांदरम्यान ध्वनिक्षेपक, आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक आहे. उत्सवकाळात ध्वनी व वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणांसह रस्त्यांवर फटाके वाजवण्यावर बंदी घालणारा तोंडी आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश स्वागतार्ह आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश वाद्यं वाजवून ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई म्हणून मिरवणुकांदरम्यान परवानगीविना ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई असल्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. पर्यावरण कायदा आणि ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांप्रमाणे परवानगीविना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई आहे, त्यामुळे वापर करण्यापूर्वी अशा परवानगीचं पत्रक ध्वनिक्षेपकावर लावणं आदेशाद्वारे बंधनकारक करण्यात येणार आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने दिले आहेत. मिरवणुकांना परवानगी देताना घसघशीत अनामत रक्कम आकारण्यासही सांगितलं जाईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
उत्सवकाळातील गोंगाटाची दखल घेऊन न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. न्यायालयाने नेहमीच अशी सक्रियता दाखवली तर जनता दुवाच देईल. मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्याची परवानगीच का असावी, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे. आपल्याकडे कोणीही कुठेही फटाके लावतो. कोणी प्रश्न विचारला तर त्याला जमावाच्या वा काही गुंडांच्या रोषाचं बळी व्हावं लागतं.
अनेकदा पोलिसांकडे तक्रार केल्यास, तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याऐवजी ते पोलीसच संबंधितांना सांगत असल्याच्याही तक्रारी आहेत. फटाक्यांमुळे प्रदूषण प्रचंड वाढतं. यामुळे खरं तर नागरिकांनी स्वत:हून फटाके उडवणं बंद केलं पाहिजे. आमचा सण-उत्सवाला विरोध नाही, ते साजरे झालेच पाहिजेत. मात्र, त्याचा सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये. याबाबत राज्य सरकार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणांची भूमिका महत्त्वाची असल्याचं न्यायालयाने सूचित केलं आहे. वास्तविक फटाकेबंदीच्या आदेशाची आम्ही कठोर अंमलबजावणी करू, असं आश्वासन २०२० मध्येच राज्य सरकारने दिलं होतं. परंतु, कोणत्याही पक्षाचं सरकार असो, भारतात कायद्यांची राबवणूक होत नाही हे रोजच्या रोज दिसतं. पुण्यात विद्यानंद बापट यांनी लाऊडस्पीकर विरुद्ध आवाज उठवला. नागपूरमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत साउंड सिस्टिम आणि हायबीम लेझर लाइट्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
धर्माचं नाव घेऊन यास विरोध करण्यात आला. परंतु, नागपुरातील भाजप नेते आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी लाऊडस्पीकर बंदीचं समर्थन करण्याचीच स्वागतार्ह भूमिका घेतली. हा नागपूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात का लागू केला जात नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. या बंदीमुळे रोजगारावर गदा आल्याचं सांगत, लाऊडस्पीकर व्यावसायिकांनी मूक मोर्चाही काढला होता. मात्र, ज्या गोष्टीमुळे लोकांच्या आरोग्यास झळ पोहोचते, अशा व्यवसायाचं समर्थन करणं गैर आहे. भारत हा देश धार्मिक आहे. सण, उत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या संस्कृतीला व परंपरेला कोणाचाही विरोध नाही. फक्त आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये, हाच शाश्वत धर्म असल्याचं लोकांनी जाणलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे.
नंदिनी आत्मसिद्ध
nandini.atma@gmail.com
Read About : Philtrum Explained : ओठांवर खळी का आहे?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.