Ad Advertisement Ad Advertisement

Diveagar Beach – दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या ४२ विद्यार्थ्यांपैकी आठ जण समुद्राच्या लाटांच्या प्रवाहात वाहून गेले

बोर्ली पंचतन (रायगड): Diveagar Beach पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आज (१ ऑक्टोबर) एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. आळंदी येथील ‘व्हिनस अकॅडमी’ या खासगी कोचिंग क्लासेसची शैक्षणिक सहल दिवेआगर येथे आली होती. मात्र, समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण आळंदी आणि दिवेआगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

४२ विद्यार्थ्यांची आली होती सहल

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिनस अकॅडमीच्या इयत्ता ११ वी आणि १२ वी सायन्सच्या एकूण ४२ विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक सहल कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आली होती. यामध्ये १७ मुली आणि २५ मुलांचा समावेश होता.

लाटांच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले

दिवेआगर किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थी समुद्राच्या लाटांचा आनंद घेत होते. काही विद्यार्थी उत्साहाच्या भरात समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे आठ विद्यार्थी पाण्याच्या जोरदार लाटांमध्ये ओढले गेले. मुले बुडत असल्याचे पाहताच किनाऱ्यावर एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला.

स्थानिक आणि वॉटर स्पोर्ट्स कर्मचाऱ्यांचे बचावकार्य

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक ग्रामस्थ आणि किनाऱ्यावरील ‘महाकाली वॉटर स्पोर्ट्स’च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने समुद्रात धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. त्यांनी अथक प्रयत्नांनंतर सर्व आठही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत.

दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांची नावे : राजवीर वाहिले, सोहम भांडवळकर, कौस्तुभ दोंड, यश वानखेडे, कैवल्य वासंकर, तन्मय वाहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना या अत्यंत दुःखद घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Read About : Rajkot Fake Currency – इन्स्टाग्राम रील पाहून भाजी विक्रेत्याने छापल्या बनावट नोटा; राजकोट पोलिसांची मोठी कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.