अफगाणिस्तानातील बदघिस प्रांतात दुष्काळ आणि गरिबीमुळे कुटुंबे कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन मुलींचे विवाह ठरवले जात असल्याचे विदारक चित्र.
काबूल : Child Marriage in Afghanistan ”मी अजून लहान आहे. माझं लग्न होणं योग्य नाही.” अफगाणिस्तानातील १४ वर्षांच्या बीबी सामियाचे हे शब्द केवळ एका मुलीची वेदना नाहीत, तर दुष्काळ आणि गरिबीने उद्ध्वस्त केलेल्या हजारो कुटुंबांची शोकांतिका आहे. लग्नाच्या आदल्या रात्री रडणारी सामिया घर सोडण्याची वेळ येताच पुन्हा अश्रूंना वाट मोकळी करून देते.
अफगाणिस्तानच्या वायव्येकडील बदघिस प्रांतात सुमारे ९५ टक्के लोक पावसावर अवलंबून असलेली शेती आणि पशुपालन करतात. मात्र, वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे पिके नष्ट झाली, जनावरे उपासमारीने मरू लागली आणि कुटुंबे कर्जाच्या खाईत लोटली गेली. २०१८ मधील ऐतिहासिक दुष्काळानंतर, २०२१ पासून पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. उदरनिर्वाहासाठी अनेक कुटुंबांनी गाव सोडून शहरांकडे धाव घेतली. पण काम, अन्न आणि मदत मिळवणे कठीण झाल्याने मुलींचे बालवयात लग्न लावून देणे हा कर्ज फेडण्याचा किंवा घर चालवण्याचा पर्याय बनला आहे.
११ वर्षांच्या मुलीचे चाळीशीच्या दुकानदाराशी साखरपुडा
गुल बोबो या महिलेच्या दोन आणि पाच वर्षांच्या मुलींचेही विवाह ठरवण्यात आले आहेत. गुलालई ही ११ वर्षांची मुलगी चाळिशीतील दुकानदाराशी विवाहबद्ध होणार आहे; तिच्या कुटुंबावर त्याचे कर्ज आहे. काही कुटुंबांना मुलींच्या बदल्यात मिळणाऱ्या वधूमूल्याची रक्कम टप्प्याटप्प्याने मिळते. पूर्ण पैसे दिल्यानंतर सासरचे लोक मुलीला घेऊन जाऊ शकतात.
काही मुली तारुण्याच्या उंबरठ्यावरच गर्भवती होतात. कमी वयातील गर्भधारणेमुळे गंभीर आरोग्यधोके निर्माण होतात. घरकाम जमत नसल्यास सासरच्या मंडळींकडून हिंसाचाराचाही सामना करावा लागू शकतो.
मुलाच्या उपचारांसाठी मुलीचे लग्न
एका कुटुंबाने रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आठ वर्षांच्या मुलाच्या उपचारांसाठी पैसे नसल्याने दोन वर्षांच्या मुलीचे लग्न ठरवले. दुसऱ्या एका कुटुंबात १० वर्षांच्या मुलाची किडनी विकून अन्नासाठी पैसे उभे करण्यात आले. काही पालक स्वत:ची जनावरे आणि जमीन विकूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत.
मदत आटली; मुलींचं भविष्य धोक्यात
आंतरराष्ट्रीय मदत कमी झाल्याने मुलींच्या संरक्षणासाठीचे कार्यक्रम आणि आरोग्यसेवा कमकुवत होत आहेत. ‘वर्ल्ड व्हिजन इंटरनॅशनल’चे मार्क कॅल्डर यांनी बालविवाहामुळे मुलींना जीवघेण्या आरोग्यधोक्यांचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे.
या मुलींची कहाणी केवळ बालविवाहाची नाही; ती हवामान संकट, गरिबी आणि अपुऱ्या मदतीचीही आहे. ”हे सगळं गरिबीमुळे घडतं,” असे १३ वर्षांची शमाएल सांगते. तिचे शब्द एका पिढीचे हरवलेले बालपण अधोरेखित करतात.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.