अन्न व औषध प्रशासनाची संभाजीनगरात धडक कारवाई; उत्पादन-विक्रीवर बंदी
Domino’s Pizza food license suspended in Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बजाजनगर, वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. निलंबनाच्या कालावधीत या केंद्रातून खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री अथवा वितरण करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी आस्थापनेची तपासणी केली होती. या तपासणीत विविध त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने ४ सप्टेंबर रोजी सुधारणा नोटीस बजावली होती. त्यानंतर आस्थापनेने २३ सप्टेंबर रोजी खुलासा सादर केला, तर २९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र, त्याच दिवशी करण्यात आलेल्या फेरतपासणीतही अनेक त्रुटी दूर करण्यात आलेल्या नसल्याचे आढळले.
तपासणीत अन्न, पॅकेजिंग साहित्य व रसायनांच्या साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, खाद्यपदार्थांच्या नियमित प्रयोगशाळा चाचण्यांच्या नोंदी उपलब्ध नसणे, अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याबाबत आवश्यक प्रमाणपत्र नसणे, अन्नकचरा व टाकाऊ वस्तूंची वेळेवर विल्हेवाट न लावणे आदी त्रुटी निदर्शनास आल्या. त्यामुळे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी परवाना निलंबनाची कारवाई केली.
Read About: Language Preservation – साठी AI ची डिजिटल संजीवनी; स्थानिक समुदायांकडून अल्पसंख्याक भाषा जपण्याचा नवा मार्ग
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.