Ad Advertisement Ad Advertisement

Language Preservation – साठी AI ची डिजिटल संजीवनी; स्थानिक समुदायांकडून अल्पसंख्याक भाषा जपण्याचा नवा मार्ग

एआयच्या मदतीने स्थानिक समुदायांकडून अल्पसंख्याक भाषांसाठी ॲप्स, डिजिटल शब्दकोश आणि भाषांतर प्लॅटफॉर्मची निर्मिती

मेलबर्न : Language Preservation कृत्रिम बुद्धिमत्ताच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील आर्थिक आणि सामाजिक विषमतेबद्दल सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जेनेरेटिव्ह एआय आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स हे प्रामुख्याने जगातील काही मोठ्या आणि बहुसंख्य भाषांवर (उदा. इंग्रजी) आधारित आहेत. त्यामुळे इंटरनेटवर कमी प्रतिनिधित्व असलेल्या लहान व अल्पसंख्याक भाषा मागे पडण्याची किंवा नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मात्र, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाचे संशोधक एकतेरिना वायलोमोव्हा आणि राफेल मेर्क्स यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, याच एआय तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून जगभरातील स्थानिक समुदाय आपल्या भाषा जपण्यासाठी आणि त्यांना डिजिटल व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्वत:च पुढे येत आहेत. एआय मॉडेल्स भलेही अल्पसंख्याक भाषा दुर्लक्षित करत असले, तरी या भाषांच्या संरक्षणासाठी स्थानिक समुदायांनी एआयच्या मदतीने उभारलेले हे व्यासपीठ भविष्यात इंटरनेटवर या भाषांचे सर्वात मजबूत आणि अचूक प्रतिनिधित्व ठरत आहेत.

एआय आणि अल्पसंख्याक भाषांमधील दरी

पॉपुआ न्यू गिनीमध्ये बोलली जाणारी ‘हुला’ भाषा (केवळ १०,००० भाषक) किंवा पूर्व तिमोरामधील ‘तेतुन’ भाषा (सुमारे १० लाख भाषक) यांसारख्या भाषांचा एआय मॉडेल्सच्या ट्रेनिंग डेटा-सेटमध्ये अत्यंत नगण्य वाटा आहे. त्यामुळे एआय जनरेट केलेल्या माहितीमध्ये या भाषांची योग्य आणि अचूक मांडणी होत नाही.

स्थानिक समुदायांचे एआयच्या मदतीने यशस्वी प्रयोग

जरी एआय मॉडेल्स या भाषांचा थेट समावेश करत नसले, तरी एआय कोडिंग टूल्सच्या मदतीने स्थानिक भाषकांनी स्वत:ची ॲप्स आणि प्लॅटफॉर्म तयार केले आहेत

‘वावनागी’ – पॉपुआ न्यू गिनी : हुला भाषिक समुदायाकडे संगणक अभियंते किंवा भाषातज्ज्ञ नसतानाही त्यांनी एआय कोडिंग टूल्सच्या साहाय्याने भाषा जतन करणारा प्लॅटफॉर्म तयार केला. यात ८० हून अधिक वापरकर्त्यांनी १२,००० हून अधिक इंग्रजी-हुला भाषांतराचे योगदान दिले असून, भविष्यात अनुवादक ॲप बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

‘तुलुन’ – पूर्व तिमोर : आरोग्यविषयक माहिती स्थानिक ‘तेतुन’ भाषेत अचूक अनुवादित करण्यासाठी ‘मा लुक तिमोर’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने एआय-आधारित प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या भाषेत वैद्यकीय माहिती उपलब्ध होत आहे.

‘डिंग्का-इंग्रजी शब्दकोश’ – दक्षिण सुदान

सुमारे ५० लाख भाषक असलेल्या ‘डिंग्का’ या आफ्रिकन भाषेचा डिजिटल वापर वाढवण्यासाठी अलियर माकोई अचुओथ यांनी एआयच्या मदतीने स्वत:च ॲप आणि शब्दकोश तयार केला.

खर्च आणि वेळेची मोठी बचत

एआय तंत्रज्ञानामुळे ॲप आणि सॉफ्टवेअर तयार करण्याचा खर्च आणि वेळ कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे आता स्थानिक भाषा जपण्यासाठी बाहेरील निधी किंवा मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.

ऑस्ट्रेलियातील ‘चार्ल्स डार्विन युनिव्हर्सिटी’च्या संगणक शास्त्रज्ञ कॅट कुटे यांनी सांगितले, ‘ज्याप्रमाणे आम्ही प्रवासासाठी मोटारसायकल/गाड्यांचा स्वीकार केला, त्याचप्रमाणे आज अनुवाद आणि कथाकथनासाठी आम्ही एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहोत.’

Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.