Smrit Machhar : हा नवा भारत आहे. तो कोणासमोर झुकणार नाही आणि कोणास शरण जाणार नाही. वाकड्या नजरेने पाहणाऱ्या नजरेला नजर भिडवून जशास तसे उत्तर देण्याचा अदम्य आत्मविश्वास मनामनात रुजविण्यासाठी जी शक्ती संपादन करावी लागते, त्या शक्तीचे वरदान आता भारताला प्राप्त झाले आहे. त्यासाठी कित्येक दशकांची तपश्चर्या करावी लागली आहे आणि त्या तपश्चर्येच्या काळात भारताच्या सहिष्णुतेची कसोटी लागली आहे. सहिष्णुता ही दुर्बलता नसते. दुर्बलांच्या सहिष्णुतेची खिल्ली उडविली जाते, पण शक्तिमानांच्या सहिष्णुतेचा एक जबर धाक असतो. गेल्या दशकभराहून अधिक काळात उभ्या जगाने भारताच्या या शक्तीचा अनुभव घेतला आणि त्यासोबतच्या सहिष्णुतेच्या संस्काराची ओळखदेखील जगाला झाली. सर्जिकल स्ट्राईकपासून सुरू झालेल्या शक्तिप्रदर्शनाच्या पर्वास आता एका नव्या पराक्रमाची जोड लाभली आहे आणि भारताच्या मातीत जन्म घेतलेल्या, भारताच्या संस्काराची शिदोरी सोबत घेऊन अवकाशावर गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेल्या तरुणाईचा या शक्तिपर्वात मोठा वाटा आहे, हेदेखील आता सिद्ध झाले आहे.
दुबईच्या फ्लायदुबई विमानाने सुमारे १७५ सहप्रवाशांसह आकाशात झेप घेतली, तेव्हा या विमानाचा मुख्य कप्तान स्मित माछर याच्या चेहऱ्यावर नेहमीच्या सवयीने जबाबदारीच्या जाणिवेचा विश्वास उमटलेलाच होता. विमानातील सर्वजण आपल्यावरील विश्वासामुळेच सुखरूप राहण्याच्या भावनेने आश्वस्त आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्यावर आहे या आत्मविश्वासाने त्याने विमानचालकाची सूत्रे हाती घेतली आणि एका विश्वासाच्या क्षणी त्याच्या सहवैमानिकाने अचानकपणे त्याच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे विमान झपाट्याने जमिनीच्या दिशेने झेपावू लागले. पावणेदोनशे जीवांच्या अस्तित्वाची कसोटी पाहणाऱ्या या क्षणी स्मितने दाखविलेल्या अतुलनीय शौर्य, संयम आणि धाडसामुळे या जीवघेण्या प्रसंगातून सुटका झाल्याच्या आनंदाने ओसंडणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या नि:श्वासातून भारताच्या या सुपुत्राविषयीचा विश्वासही व्यक्त झाला, तो भारताच्या पराक्रमाच्या गाथेतील वर्तमानात नोंदवला गेलेला अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
स्मित माछर नावाच्या या कोवळ्या तरुणाने दाखविलेले अतुलनीय शौर्य, संयम आणि संघर्षाच्या क्षणाला तोंड देण्याकरिता लागणारे असीम धैर्य ही आजच्या भारतातील युवा पिढीची खरी ओळख आहे. अशा साहसापुढे जेव्हा जग झुकते, अवघी मानवजात जेव्हा त्याला सलाम करते, तेव्हा मनामनांत उसळणारा अभिमान हा रस्त्यावरच्या कोणत्याही बेलगाम उसळणाऱ्या गर्दीतून उमटणाऱ्या भावनांपेक्षा उजळ ठरतो; म्हणूनच स्मित माछर हा भारताचा नव्हे, तर जगाचा महानायक ठरला असून त्याची शौर्यगाथा ही आजच्या युवा पिढीच्या कर्तबगारीची खरी कहाणी ठरणार आहे. कारण त्याच्या शौर्यतेजामुळे उभे जग आज खऱ्या अर्थाने उजळले, ही भारतासाठी सर्वाधिक अभिमानाची बाब ठरली आहे.
स्मित माछरच्या शौर्याने केवळ विमानातील प्रवाशांचे प्राण वाचविले, एका संशयित दहशतवादी हल्ल्यास परतवून लावण्याचे धाडस दाखविले एवढेच या घटनेचे महत्त्व मर्यादित नाही. या घटनेमुळे भारताच्या जगासमोरील प्रतिष्ठित प्रतिमेवर उमटू पाहणारा एका काजळीचा डागदेखील या धाडसामुळे पुसला गेला आहे. जेव्हा कोणत्याही एखाद्या घटनेची कारणमीमांसा स्पष्ट होत नाही आणि तसे होण्याआधीच एखादी घटना भूतकाळ होऊन जाते, तेव्हा त्याभोवती संशयाचे असंख्य धागे किचकटपणे विणले जातात आणि वास्तव कारणांचा शोध लावणे अवघडही होऊ लागते.
स्मितच्या धाडसामुळे हे सारे टळले आणि संघर्षनाट्याचा महानायक म्हणूनच त्याची आणि देशाची प्रतिमा उजळली हे भाग्य ठरले आहे. अन्यथा, दुर्दैवाने काही अघटित घडले असते तर त्याला दहशतवादी हल्ल्याने वेगवेगळे तर्क चिकटले असतेच, पण एक भारतीय वैमानिक म्हणून त्या दुर्घटनेचे बालंट येऊन दहशतवादाच्या विरोधातील कांगाव्यास भारताच्या नावाने बोटे मोडण्याची संधीदेखील मिळाली असती. स्मितच्या शौर्याने या संधीला लगाम घातला आहे. असा कोणताही कलंक माथ्यावर उमटण्याच्या शक्यतेलादेखील कोणतीही संधी न देता स्मित नावाच्या या तरुणाने भारताच्या माथ्यावर अभिमानाच्या सुवर्णरेखा उमटविल्या आहेत.
या घटनेमागे दशतवादी हल्ल्याचा कट असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. तो खरा असेल तर दहशतवादाच्या विरोधातील शून्य सहिष्णुतेच्या भारताच्या कणखर धोरणास स्मितसारख्या तरुणाने दिलेले बळ महत्त्वाचे ठरते. दहशतवादमुक्त जग ही भारताची मागणी आहे आणि दहशतवादाच्या विरोधात जगाने एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे यासाठी भारताने सातत्याने पुढाकार घेतलेला आहे. आजवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा भारताने या भूमिकेचा आग्रही पुनरुच्चार केला आहे आणि त्यास अनुकूल प्रतिसादही मिळू लागला आहे.
कोणत्याही कुकर्माच्या विरोधातील लढाईस सज्ज होण्याआधी आपली त्या लढ्याची क्षमता सिद्ध करावी लागते. भारताने सातत्याने सुरू ठेवलेला दहशतवादविरोधी लढाईचा आग्रह म्हणजे केवळ जगातील शक्तिमान राष्ट्रांना पुढाकार घेण्यासाठी घातलेले साकडे नाही, तर या लढाईंचे नेतृत्व करण्याकरिता आवश्यक असलेली क्षमता भारताकडे असल्याची ग्वाही आहे, त्यामुळेच जागतिक स्तरावर भारताच्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळत असताना, एका भारतीय युवकाने जागतिक स्तरावरील एका दहशतवादी कटाचा खात्मा करून आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. स्मित माछर हा युवक या नव्या भारताच्या युवा पिढीतील आत्मविश्वासाचे प्रतिबिंब ठरला आहे.
या घटनेनंतर पंतप्रधानांसोबत संवाद साधताना त्याने व्यक्त केलेल्या भावना हे आजच्या युवा पिढीच्या मानसिकतेचे खरे प्रतिबिंब आहे. या भावना जोपासण्याच्या जबाबदारीचे भान समाजाने ठेवायला हवे.
Read About : Agniveer Reservation : शूरा मी वंदिले…
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.