Ad Advertisement Ad Advertisement

Warren Buffett’s Business Thinking : वॉरेन बफे यांचे गुंतवणूक विचार

Warren Buffett’s Business Thinking : जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी बर्कशायर हॅथवेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वेच्छेने सोडली. १९६५ मध्ये त्यांनी एका संघर्ष करणाऱ्या कापड गिरणीचा ताबा घेतला आणि तिचे रूपांतर तब्बल १.१ ट्रिलियन डॉलर मूल्याच्या जागतिक समूहात केले. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासातून मिळालेले गुंतवणुकीचे अनुभव आणि विचार आजही जगभरातील गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या याच सकारात्मक आणि व्यावहारिक गुंतवणूक विचारांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न…

मेरिकन गुंतवणूकदार आणि परोपकारी वृत्ती असणारे बफे जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. गुंतवणूक क्षेत्रात नावलौकिक होण्याआधी त्यांनी गुंतवणुकीतील अनेक घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यामुळे बफे यांनी गुंतवणूक विषयक अनेक मार्गदर्शक विचार मांडले आहेत. त्याचसोबत गुंतवणूक आणि जीवन या दोन्हीबाबतीत व्यावहारिक, सामान्य ज्ञान आणि अंतर्दृष्टी यातील परस्पर संबंधदेखील उलगडून दाखविला आहे. त्याबाबत सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी बफे यांचे पाच गुंतवणूक विषयक निवडक कोट्स (सुविचार) आणि गुंतवणूक विषयक ‘सुवर्ण नियम’ समजून घेऊ..

गुंतवणूक प्रक्रियेसाठी शैक्षणिक सूत्रांपेक्षा सामान्य आणि व्यवसायाचे ज्ञान अधिक महत्त्वाचे आहे. असा विचार बफे यांनी मांडला आहे.
कोणतीही व्यक्ती सामान्य ज्ञान (कॉमन सेन्स) किंवा व्यवहारी ज्ञानाचा उपयोग करूनही चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकते. काही विशिष्ट घटना वारंवार घडत असतात आणि त्याचा शेअर बाजारावर तात्पुरत्या स्वरूपात परिणाम दिसून येत असतो, असा या विचारामागचा उद्देश आहे. उदाहरणार्थ, सोन्याचे भाव वाढले, अमेरिकेतील शेअर बाजार कोसळले, कंपनीला मोठ्या रकमेचे टेंडर मिळाले, कंपनीने लाभांश जाहीर केला इत्यादी घटनांचे निरीक्षण केल्यास जाणवते की, शेअर बाजारातील तात्पुरती घसरण किंवा तेजी चांगल्या कंपन्यांचे शेअर खरेदी किंवा विक्री करण्याची संधी वेळोवेळी देत असतात.

बफे यांनी इक्विटी पोर्टफोलिओबाबत एक विचार ठळकपणे मांडला आहे. डंप म्हणजेच पडून राहतील असे शेअर पोर्टफोलिओमध्ये नसावेत. म्हणजेच कुठलाही परतावा न देणारे शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेवू नये. थोडक्यात, पोर्टफोलिओ कसा असावा? याबाबत बफे यांनी खूप कमी शब्दांत योग्य मार्गदर्शन केले आहे. भारतात डिमॅट खातेदारांची संख्या २३ कोटींहून अधिक झाली आहे; पण त्यांच्या मनात शेअर आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत स्पष्टता नाही.

बहुतांश वेळा नवोदित गुंतवणूकदार इतरांनी सुचवलेल्या कंपनीचे शेअर्स ट्रेडिंग करण्याच्या उद्देशाने घेत असतात; म्हणजेच कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने अनेक कंपन्यांचे शेअर विकत घेतले जातात. स्टॉक मार्केटमध्ये अचानक घसरण आल्यावर सर्वच कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत घसरण येते. ज्या कंपन्या चांगले कार्य करत असतात त्यांच्या शेअर किमतीत काही दिवसांनी पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होते. पण, झेड ग्रुपमधील किंवा पेनी स्टॉक कंपन्यांच्या शेअर किमतीत बदल होत नाही. त्याचा थेट नकारात्मक प्रभाव पोर्टफोलिओवर दिसून येतो. बफे यांनी मांडलेले विचार सावध गुंतवणूक कशी करावी याचे तंतोतंत मार्गदर्शन करणारे आहेत.

आपण काय करत आहोत हे माहीत नसल्यामुळे धोका निर्माण होतो. हा बफे यांचा व्यावहारिक दृष्टिकोन सर्वांनी अमलात आणला पाहिजे. नवीन व्यवसाय आणि गुंतवणूक करताना वैचारिक स्पष्टता गरजेची असते. सध्या छोटे गुंतवणूकदार कुठलीही माहिती न घेता गुंतवणूक पर्याय निवडताना दिसत आहेत. त्याचसोबत फ्युचर अँड ऑप्शनद्वारे कमी कालावधीत अधिक पैसे कमविण्याचा विचार करत आहेत. यामधील आर्थिक धोक्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्टॉक एक्स्चेंज आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया नवोदित गुंतवणूकदारांना फ्युचर अँड ऑप्शनपासून दूर राहण्याचा सल्ला वारंवार देत आहे.

बफे यांनी शेअर खरेदीबाबतची मानसिकता कशी असावी याबाबत स्पष्ट विचार मांडले आहेत. ते म्हणतात की, तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर घेता म्हणजेच तिच्या एकूण शेअर भांडवलातील एक तुकडा खरेदी करता; तेव्हा कंपनीच्या नशिबातील वाटा उचलण्याचा प्रयत्नदेखील करत असता, त्यामुळे शेअरमधील गुंतवणूक करताना विविध कंपन्यांचे शेअर वारंवार खरेदी-विक्री करण्याचा दृष्टिकोन स्वीकारू नये. शेअरमधील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळविण्यासाठी ट्रेडिंग हा पर्याय नाही. अव्वल दर्जाच्या कंपनीचे शेअर दीर्घकाळ गुंतवणूक स्वरूपात विकत घेतल्यास शेअर किमतीमधील वाढ, सोबत बोनस शेअर, लाभांश, राईट्स इश्यू, शेअर बायबॅक इत्यादी स्वरूपात अनेक आर्थिक फायदे शेअरधारकांना मिळत असतात.

शेअरची कमी किंमत सौदा करण्याची हमी देत नाही. कंपनीकडून योग्य मूल्य आणि प्रगती दाखविणारा प्रस्ताव सादर झाला पाहिजे, असा विचारही, बफे मांडतात. त्याचे तात्पर्य, कंपनीच्या कार्यात सातत्याने विस्तार होताना दिसला पाहिजे, त्यामुळे कंपनीच्या एकूण मूल्यात वाढ होत जाते आणि गुंतवणूक दृष्टीने हेच कंपनीकडून अपेक्षित असते. वॉरेन बफे यांचा गुंतवणूकविषयक सर्वात प्रसिद्ध ‘सुवर्ण नियम’ शेवटी नमूद करत आहोत. कारण हा नियम समजून येण्यासाठी त्यांचे वर नमूद केलेले विचार मनात रुजणे गरजेचे आहे. बफे यांचा सुवर्ण नियम म्हणजे, गुंतवणुकीसाठी दोन भागांचा सिद्धांत आहे…’पहिला नियम म्हणजे कधीही पैसे गमावू नका आणि नियम क्रमांक २ आहे, कधीही नियम क्रमांक १ विसरू नका’… हा नियम भांडवल जतन करण्यावर आणि आर्थिक तोटा टाळण्यावर भर देतो. थोडक्यात, इक्विटी स्वरूपातील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी असावी.

प्रा. कौस्तुभ खोरवाल

Read About : Rent vs buy home India : भाड्याने राहून गुंतवणूक करणे फायदेशीर असते का?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.