Ad Advertisement Ad Advertisement

Rent vs buy home India : भाड्याने राहून गुंतवणूक करणे फायदेशीर असते का?

Rent vs buy home India : आजकाल समाजमाध्यमांवर एक सल्ला वारंवार दिला जातो. ‘घर विकत घेऊ नका. भाड्याने राहा. गृहकर्जाचा हप्ता आणि भाडे यातील फरक म्युच्युअल फंडात गुंतवा. २० वर्षांनी घर घेणाऱ्यापेक्षा तुमच्याकडे जास्त संपत्ती असेल.’ ऐकायला हा सल्ला खूप आकर्षक वाटतो आणि त्यामागे आर्थिक गणितही आहे.

समजा १ कोटींचे घर तुम्हाला ३०,००० महिन्याला भाड्याने मिळत आहे. तेच घर विकत घेतल्यास गृहकर्जाचा मासिक हप्ता साधारण ७५,००० आहे. तुम्ही घर विकत न घेता भाड्याने राहिलात तर दरमहा ४५,००० वाचतात. हे ४५,००० पुढील २० वर्षे नियमितपणे म्युच्युअल फंडात गुंतवले आणि चांगला परतावा मिळाला तर निश्चितच मोठी संपत्ती तयार होऊ शकते. एक्सेल शीटवर हे गणित अतिशय सुंदर दिसते; पण प्रत्यक्ष आयुष्य एक्सेल शीटप्रमाणे चालत नाही! गुंतवणूक खरंच करणार आहात का? सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की दरमहा वाचणारे ४५,००० तुम्ही खरोखर पुढील २० वर्षे नियमित गुंतवणार आहात का? की काही महिन्यांनी त्यातून नवीन गाडी घ्याल? महागडा मोबाइल घ्याल? परदेशी सहलीला जाल? घरातील खर्च आणि जीवनशैली वाढवाल? शेअर बाजार २५%-३०% खाली आला तर घाबरून एसआयपी थांबवणार नाही ना?
भाड्याने राहून गुंतवणूक करण्याचे संपूर्ण गणित आर्थिक शिस्तीवर अवलंबून असते.

गृहकर्जाचा हप्ता सक्तीने भरावा लागतो; पण म्युच्युअल फंडाची एसआयपी थांबवणे खूप सोपे असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा – भाड्याने राहणाऱ्याचे गणित शिस्तीवर चालते. चांगला परतावा मिळेलच का? म्युच्युअल फंडांनी दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण केली आहे याबाबत शंका नाही. काही जुन्या आणि यशस्वी फंडांचे २०-२५ वर्षांचे परतावे पाहिले तर आकडे खरोखर प्रभावी आहेत. पण इथे एक मानसिक पूर्वग्रह लक्षात घ्यायला हवा. तो म्हणजे सर्व्हायव्हरशिप बायस!

आपल्याला नेहमी उत्तम कामगिरी केलेले फंड दाखवले जातात. कमी परतावा देणारे, बंद झालेले किंवा दुसऱ्या फंडामध्ये विलीन झालेले पर्याय मात्र चर्चेत फारसे येत नाहीत. एखाद्या फंडाने मागील २० वर्षांत १८% किंवा २०% परतावा दिला म्हणून पुढील २० वर्षेही तसाच परतावा मिळेल याची कोणतीही खात्री नाही. गुंतवणुकीचा परतावा अपेक्षित असतो, निश्चित नसतो. त्यामुळे भाड्याने राहून गुंतवणूक करण्याचे गणित करताना अवाजवी परतावा गृहीत धरू नका. कॅल्क्युलेटर थांबतो, तुमचे आयुष्य थांबत नाही! घरापेक्षाही मोठा प्रश्न म्हणजे निवृत्ती आहे. समजा आज तुमचे मासिक भाडे ३०,००० आहे. त्यात दरवर्षी ५% वाढ झाली तर २० वर्षांनी हेच भाडे जवळपास ८०,००० महिन्यापर्यंत पोहोचू शकते. आज ३०,००० भाडे सहज परवडते. पण वयाच्या ६० व्या वर्षी ८०,००० किंवा त्यापेक्षा जास्त भाडे भरायची तुमची तयारी आहे का? अनेक रेंट वर्सेस बाय कॅल्क्युलेटर्स २० वर्षांनंतर गणित थांबवतात आणि भाड्याने राहणाऱ्याला विजेता घोषित करतात.

२० वर्षांचे गृहकर्ज फेडलेल्या व्यक्तीचा गृहकर्जाचा हप्ता संपतो. अर्थात घराचा मेंटेनन्स, विमा आणि दुरुस्तीचा खर्च कायम राहतो; पण मोठा मासिक गृहकर्जाचा हप्ता राहत नाही. दुसरीकडे आयुष्यभर भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीचे भाडे मात्र कधीच संपत नाही. निवृत्तीनंतरचा निधी फक्त घरभाडे भरण्यासाठी नसतो. त्यातून अन्न, औषधे, आरोग्य खर्च, प्रवास आणि इतर गरजाही भागवायच्या असतात. त्यामुळे आयुष्यभर भाड्याने राहायचे असेल तर निवृत्ती नियोजन करताना भविष्यातील भाड्यासाठी स्वतंत्र निधी तयार करणे आवश्यक आहे.
स्वत:ला एक प्रश्न विचारा, ‘माझे नियमित उत्पन्न कमी झाल्यानंतर माझे वाढलेले घरभाडे कोण भरणार?’ घर खरेदीचा मोठा फायदा म्हणजे सक्तीची बचत! दरमहा गृहकर्जाचा हप्ता बँक खात्यातून जात राहतो आणि हळूहळू त्या घरातील तुमची मालकी वाढत जाते.

दुसरा फायदा म्हणजे लिव्हरेज अर्थात कर्जाच्या मदतीने मोठी मालमत्ता खरेदी करण्याची क्षमता. समजा राहुलने ५० लाखांचे घर घेतले. त्याने १० लाख डाउन पेमेंट केले आणि ४० लाखांचे कर्ज घेतले. राहुलने स्वत:चे सुरुवातीला १० लाख वापरले पण त्याला ५० लाखांच्या मालमत्तेची मालकी मिळाली. घराची किंमत १०% वाढून ५५ लाख झाली तर मालमत्तेची किंमत ५ लाखांनी वाढते. SWAN टेस्ट करा – घर घेण्याआधी एक साधी SWAN टेस्ट म्हणजे Sleep Well At Night टेस्ट करा.

डाउन पेमेंट, स्टॅम्प ड्युटी आणि इतर खर्च केल्यानंतर किमान ६ महिन्यांचा आणीबाणी निधी शिल्लक आहे का? गृहकर्जाचा हप्ता तुमच्या हातात येणाऱ्या उत्पन्नाच्या साधारण ३०% ते ३५% च्या आत आहे का? घर घेतल्यानंतरही निवृत्ती आणि इतर आर्थिक ध्येयांसाठीची गुंतवणूक सुरू राहणार आहे का? मुख्य कर्जदाराकडे पुरेसा टर्म इन्शुरन्स आहे का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर घराचे बजेट कमी करा किंवा काही काळ घर घेणे पुढे ढकला. घर घेताना बजेट मर्यादित असेल तर रेडी पझेशन किंवा लवकर ताबा मिळणाऱ्या घराचा पर्याय विचारात घ्यायला हवा.

शेवटी काय करावे? भाड्याने राहावे की घर विकत घ्यावे (rent vs buy home) याचे एकच उत्तर सर्वांना लागू होत नाही. तुम्ही पुढील ७ ते १० वर्षे त्याच शहरात राहणार आहात का? घराची किंमत भाड्याच्या तुलनेत योग्य आहे का? डाउन पेमेंटनंतर तुमच्याकडे आणीबाणी निधी शिल्लक राहणार आहे का? गृहकर्जाचा हप्ता सहज परवडतो का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भाड्याने राहिल्यानंतर वाचणारी रक्कम तुम्ही खरोखर नियमितपणे गुंतवणार आहात का? भाड्याने राहिल्यामुळे लवचीकता मिळते. स्वत:च्या घरामुळे स्थैर्य मिळते. दोन्ही पर्याय योग्य असू शकतात. निर्णय तुमची आर्थिक परिस्थिती, तुमच्या कुटुंबाच्या गरजा आणि तुमची मन:शांती यांचा विचार करून घ्या.

अभिजीत कोळपकर
संपर्क : ९५०३०८२७७८

Read About : Rent vs Buy Home : भाड्याने राहावे की स्वत:चे घर घ्यावे?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.