तपासाचे जाळे भेदण्यासाठी बिश्नोई टोळीचे ‘डबा कॉल्स’ तंत्रज्ञान
Bishnoi Gang Dabba Calls Technology : मुंबई : गुन्हेगारी जगतात पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना चुकवण्यासाठी गँगस्टर्स सातत्याने नव्या क्लृप्त्या शोधत असतात. यातीलच एक अत्यंत नवी आणि पोलिसांना चकवा देणारी पद्धत म्हणजे ‘डबा कॉल्स’ होय. ‘डबा कॉल्स’ ही एक प्रकारची इंटरनेटद्वारे केली जाणारी व्हॉइस कॉलिंग सिस्टीम आहे. यात मुख्य गुन्हेगार थेट कोणालाही फोन लावत नाही. त्याऐवजी, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले अनेक मोबाईल फोन्स आणि स्पीकर एकमेकांना जोडले जातात. पहिली व्यक्ती एका ॲपवरून दुसऱ्या फोनवर कॉल करते, तो फोन एका बंद खोलीत (डब्यात) स्पीकरवर ठेवलेला असतो. त्या स्पीकरचा आवाज दुसऱ्या फोनच्या मायक्रोफोनद्वारे पुढे पाठवला जातो. अशा प्रकारे ३ ते ४ फोनची साखळी तयार करून मूळ नंबर लपवला जातो.
गेल्या काही दशकांत व्हॉइसओव्हर आयपी तंत्रज्ञान आणि इंटरनेट कॉलिंग स्वस्त आणि सुलभ झाल्यानंतर गुन्हेगारांनी पारंपरिक फोन कॉल्सऐवजी या साखळी पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली.
या पद्धतीचा वापर का केला जातो?
१. मूळ स्थान लपवणे : फोनचा खरा कॉलर कुठून बोलत आहे (उदा. परदेशातून, की दुसऱ्या राज्यातून) हे पोलिसांना सहसा ट्रॅक करता येत नाही, कारण पोलिसांच्या टॉवर लोकेशनमध्ये मध्यस्थी असलेल्या फोनचे लोकेशन दिसते.
२. ओळख गुपित ठेवणे :
फोन ट्रॅक केल्यास पोलिसांना केवळ मधल्या साखळीतील फोन किंवा इंटरनेट आयपी ॲड्रेस सापडतो, ज्यामुळे मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होते.
३. खंडणी आणि धमक्यांसाठी वापर : गँगस्टर्स व्यावसायिक, बिल्डर्स किंवा सेलिब्रेटींना खंडणीचे फोन करण्यासाठी किंवा धमक्या देण्यासाठी या ‘डबा कॉल्स’ पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. भारतात आणि विशेषत: मुंबईत या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने कुख्यात गँगस्टर आणि आंतरराज्यीय गुन्हेगारी सिंडिकेट्सनी केला आहे
लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहरा गँग :
परदेशात बसून किंवा भारतातील वेगवेगळ्या राज्यांतून गुप्तपणे बॉलीवूड सेलिब्रेटी, मोठे व्यावसायिक आणि बिल्डर्सना खंडणीचे फोन करण्यासाठी किंवा धमक्या देण्यासाठी या गँगच्या सदस्यांनी ‘डबा कॉल्स’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे.
दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन टोळी :
नव्वदच्या दशकात आणि त्यानंतरच्या काळात अंडरवर्ल्डमधील डॉन लोकांनी भारतातील व्यापाऱ्यांना हवाला आणि खंडणीसाठी फोन करताना अशाच प्रकारच्या मध्यस्थ फोन लाइन्स (पीसीओ किंवा कॉन्फरन्स कॉल्सची जुनी रूपे) वापरल्याचा इतिहास आहे.
रणदीप मलिक मास्टरमाइंड असल्याचा दाट संशय
पंडितसह रेहानही होता संपर्कात, बिश्नोई बंधूंच्या चौकशीची शक्यता
मुंबई : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अनिल पंडित नसून रणदीप मलिक हा असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई या दोघांच्या खास विश्वासातला माणूस म्हणून मलिक ओळखला जातो. टायगर हल्ल्यात पंडित आणि गोळीबार करणारा रेहान हा त्याच्याच संपर्कात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे याबाबत बिश्नोई बंधूंच्या चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरयाणातील सोनिपत येथे गोळीबार करण्याचा आदेश मलिककडून पंडित आणि रेहानला देण्यात आला होता. त्यानुसार, तो करण्यात आला. टायगरवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेत सुरक्षित पोहोचवले जाईल, असे आश्वासन रेहानला देण्यात आले होते. मलिकने पंडितला असेच आश्वासन पूर्वी दिले होते. सिद्धू मुसेवाला प्रकरणानंतर त्याला डंकी रूटने अमेरिकेत पोहोचवण्यात आले. त्यामुळे तो तरुणांना टोळीत ओढण्यासाठी स्वत:चे उदाहरण देतो, अशीही माहिती पुढे आली आहे.
टोळीत पंडितला मलिकची जागा देण्यात आली. मलिककडे खंडणी गोळा करणे, नक्की कुणावर हल्ला करायचा, हे ठरवण्याचे अधिकार आहेत. म्हणजेच टोळीत मलिकला बढती देण्यात आली. त्यामुळेच पंडित हा अनमोल बिश्नोईचा माणूस म्हणून टोळीत ओळखला जाऊ लागला. मलिक वरच्या श्रेणीत गेल्यानंतर पंडित त्याच्यासाठी ‘डबा कॉल्स’ लावून द्यायचा. ही पद्धत बिश्नाई टोळीनेच सुरू केली. मलिक त्यातला तज्ज्ञ मानला जातो. त्यानेच पंडितला ही पद्धत शिकवली. त्यानुसार, तो त्याला असे फोन करण्यासाठी सहाय्य करायचा.
Read About : Tiger Shroff Mumbai Car Firing Incident 18 Oct: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.