CNAP in India : मोबाईल फोनच्या पडद्यावर अनोळखी क्रमांक चमकला की मनात पहिला प्रश्न निर्माण होतो, हा फोन नेमका कोणाचा असेल? बँकेचा अधिकारी, विमा विक्रेता, एखादा मित्र, व्यावसायिक संपर्क की फसवणूक करण्याच्या उद्देशाने फोन करणारा भामटा? अनेकदा आपल्याकडून उत्सुकतेपोटी फोन उचलला जातो आणि काही वेळा त्याची किंमत आर्थिक नुकसान सोसून चुकवावी लागते. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा अल्पशिक्षित लोकांचा फायदा स्कॅमर्स घेतात.
आता मात्र अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास कॉल करणाऱ्याचे नाव थेट मोबाईलच्या पडद्यावर दिसण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनएपी) या तंत्रज्ञानामुळे अनोळखी कॉल ओळखण्याच्या पद्धतीत बदल होण्याची अपेक्षा आहे. ८० ते ९० कोटी मोबाईल वापरणाऱ्या भारतासारख्या देशासाठी ही अत्यंत आश्वासक आणि दिलासादायक घटना म्हटली पाहिजे.
सध्या अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास त्याची ओळख पटवण्यासाठी अनेक जण ट्रू कॉलर किंवा तत्सम ॲपचा वापर करतात. या ॲपमध्ये इतर वापरकर्त्यांनी सेव्ह केलेली नावे, उपलब्ध माहिती आणि स्पॅमविषयक नोंदी यांच्या आधारे कॉल करणाऱ्याची संभाव्य ओळख दाखवली जाते. मात्र, ही माहिती नेहमीच अचूक असेल असे नाही. सीएनएपी या व्यवस्थेची संकल्पना वेगळी आहे. मोबाईल क्रमांकाशी संबंधित दूरसंचार ग्राहक नोंदणीतील नाव कॉल स्वीकारणाऱ्याला दाखवणे हा तिचा मुख्य उद्देश आहे, त्यामुळे संपर्क यादीत नसलेल्या क्रमांकावरून फोन आल्यासही संबंधित क्रमांकाशी नोंदलेले नाव समजण्यास मदत होऊ शकते. या व्यवस्थेचा संभाव्य फायदा म्हणजे स्वतंत्र ॲपवर अवलंबून राहण्याची गरज नसेल.
या सुविधेचे स्वागत करताना तिच्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. मोबाईल स्क्रीनवर दिसणारे नाव म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीची स्वतंत्रपणे पडताळलेली ओळख नव्हे, ते फक्त संबंधित मोबाईल क्रमांकाशी नोंदलेले नाव असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या सिमकार्डचा वापर दुसरीच व्यक्ती करत असेल, तर स्क्रीनवर मूळ ग्राहकाचे नाव दिसू शकते. पण, ते वापरत असलेली व्यक्ती दुसरी असू शकते, त्यामुळे नाव दिसले म्हणजे फोन सुरक्षित आहे किंवा आपण सुरक्षित आहोत असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
नाव दाखवणारी सुविधा आणि स्पॅम कॉलची सूचना देणारी सुविधा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सीएनएपीमुळे एखादा क्रमांक फसवणुकीसाठी वापरला जात आहे की नाही हे आपोआप सिद्ध होणार नाही असे दिसते. त्यासाठी स्वतंत्र स्पॅम शोध यंत्रणा, तक्रारींची नोंद आणि दूरसंचार कंपन्यांची प्रतिबंधात्मक कार्यवाही महत्त्वाची ठरते. व्यावसायिक आस्थापनांकडून ग्राहकांना वारंवार फोन केले जातात. अनेकदा अनोळखी क्रमांक असल्यामुळे ग्राहक फोन उचलत नाहीत. संबंधित क्रमांकाशी योग्य नाव नोंदलेले असल्यास अशा कॉलची ओळख पटवणे सोपे होऊ शकते. ग्राहकांना फोन स्वीकारण्याचा निर्णय घेणे सोपे जाईल, तर संस्थांना ग्राहकांशी संपर्क साधताना विश्वासार्हता वाढवण्यास मदत होईल.
तथापि, व्यावसायिक नाव दिसणे म्हणजे कॉल अधिकृत असल्याची हमी नव्हे. फसवणूक करणारे प्रतिष्ठित संस्थांचे नाव घेऊन किंवा त्यांच्याशी संबंध असल्याचे भासवून नागरिकांना जाळ्यात ओढतात. मुळात असे फोन अशा यंत्रणांकडून केले जातात का याचीच माहिती असली पाहिजे. उदाहरणार्थ, डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. कोणत्याच कायद्यात नाही, पण पोलिसांच्या वेशात कुणी तरी भामटा आपल्या स्क्रीनवर येतो आणि अनेक लोक त्याच्या भूलथापांना, फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे संशय घेण्याला पर्याय नाही.
या तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या गोपनीयतेविषयी काही प्रश्न उपस्थित होतात. ग्राहकाच्या नावाची माहिती कोणत्या स्वरूपात वापरली जाणार, ती कोणाला उपलब्ध होणार, नोंदीतील नाव चुकीचे असल्यास ते कसे दुरुस्त करता येणार आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासाठी कोणते उपाय असणार याबाबत स्पष्टता भविष्यात येणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता वाढावी; परंतु त्याच वेळी ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षणही झाले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानामुळे फसवणुकीचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते, पण त्याची जागा नागरिकांच्या संशयाला, सावधगिरीला, विवेकबुद्धीला पर्याय नाही.
अनोळखी व्यक्तीने बँक अधिकारी, पोलीस, सरकारी कर्मचारी किंवा एखाद्या परिचित संस्थेचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले तरी केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या नावावर विश्वास ठेवू नये, हे कुणालाही कळावे. यासंदर्भात लक्षात ठेवण्यासारखे काही मूलभूत नियम आहेत. उदाहरणार्थ, फोनवर कोणालाही ओटीपी, एटीएम पिन, यूपीआय पिन किंवा इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड सांगू नयेत. पैसे मिळवण्यासाठी यूपीआय पिन टाकण्याची गरज नसते हे लक्षात ठेवावे. संशयास्पद नंबरवरून आलेल्या लिंक उघडू नयेत आणि अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये रिमोट ॲक्सेस ॲप इन्स्टॉल करू नयेत.
सारांश काय, तर कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तीचे (सिम कार्डधारकाचे) नाव दाखवण्याची व्यवस्था ही दूरसंचार क्षेत्रातील उपयुक्त सुधारणा ठरू शकते. ती कॉल स्वीकारण्यापूर्वी सिम कार्डच्या मालकाची माहिती देईल आणि काही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्यास मदत करेल. मात्र, स्पॅम आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी केवळ नाव दाखवणे पुरेसे नाही. मोबाईलच्या स्क्रीनवर नाव दिसणे ही आपल्यापर्यंत येणारी माहिती आहे; ती सुरक्षिततेची हमी नाही. तंत्रज्ञान आपल्याला सावध करू शकते, पण निर्णय घेताना विवेक वापरण्याची जबाबदारी आपलीच असते. कारण सायबर भामट्याची सर्वांत मोठी ताकद त्याचे तंत्रज्ञान नसते, तर समोरच्या व्यक्तीने दाखवलेला आंधळा विश्वास असतो. त्या विश्वासाची जागा आजच्या काळात संशयाने व सावधगिरीनेच घ्यायला हवी.
डॉ. पिनाक दंदे
संपर्क : ९८२३०४५५३३
Read About : AI Investment Cycle वर 2 मोठे धोके; वाढते व्याजदर आणि Monetisation अनिश्चिततेचा तंत्रज्ञान क्षेत्राला फटका
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.