Ad Advertisement Ad Advertisement

Marathas Capture Lahore in 1758 : अटकेवरी लाविले झेंडे!

Marathas Capture Lahore in 1758 : सरहिंदला मराठ्यांनी वेढा घातला आहे, ही बातमी जहाँखान याला आधीच कळलेली होती. तो मोठी फौज घेऊन सरहिंदच्या कुमकेस निघाला, पण वाटेतच त्याला सरहिंद पडल्याची खबर मिळाली. मग तो जलालाबाद येथे तळ ठोकून मराठ्यांना अडवण्यासाठी उभा राहिला, पण…

(भाग-2)

अब्दालीचा उच्छेद करण्यासाठी आपण मराठ्यांची मदत घ्यावी, म्हणजे पुढेमागे आपले शिखांशी वाकडे आले, तर मराठे आपल्याला मदत करतील, असा विचार करून आदिना बेग याने मराठ्यांकडे आपले वकील रवाना केले, हा भाग आपण गेल्या वेळी पाहिला आहे.

हरलाल आणि सिद्दीक बेग हे आदिना बेगचे दोन वकील दिल्लीत श्रीमंत रघुनाथरावांना भेटले. मराठ्यांनी पंजाबात शिरून अब्दालीला कायमचे हाकलावे, याबदल्यात मोहिमेच्या दर दिवशी एक लक्ष आणि छावणीच्या प्रत्येक दिवशी पन्नास हजार रुपये रोख देऊ, असा वायदा या वकिलांनी केला. मराठ्यांचे लक्ष पंजाबकडे लागलेले होतेच, त्यांनी हा करार ताबडतोब स्वीकारला. दिल्लीहून अंबाला, मुघल-दि-सराई, राजपुरा अशा मजला झपाट्याने मारत अवघ्या आठ-दहा दिवसांत मराठ्यांची घोडदळे सरहिंदला येऊन भिडली! ९ मार्च १७५८ रोजी आदिना बेग आणि शीख सैन्य मराठ्यांना येऊन मिळाले. चरतसिंग (महाराजा रणजितसिंग यांचा आजोबा), जस्सासिंग अहलुवालिया, जस्सासिंग रामगडिया, तारासिंग, गुज्जरसिंग असे शीख सरदार पंधरा हजार घोडदळ घेऊन आले होते. शिखांसाठी सरहिंद महत्त्वाचे शहर होते. कारण गुरू गोविंद सिंग जी यांच्या मुलांची, साहिबजादा झोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांची मुघलांनी १७०४ मध्ये सरहिंद येथे क्रूर हत्या केलेली होती आणि त्यामुळे हे शहर ताब्यात घेऊन शिखांना आपला ऐतिहासिक सूड घ्यायचा होता.

मराठ्यांनी सरहिंदला मजबूत वेढा घातला आणि तेथील सरदार अबुस्समद खान याचा निभाव मराठ्यांपुढे लागला नाही. सरहिंद पडले, शीख फौजा ताबडतोब सरहिंदमध्ये घुसल्या आणि एकच लुटालूट सुरू झाली. अबुस्समद खान मराठ्यांच्या कैदेत पडला. येथे लुटीवरून मराठे आणि शिखांमध्ये कुरबुर झाली, पण त्याचे मोठ्या भांडणात रूपांतर झाले नाही. पंधरा हजार शीख घोडदळाने आगेकूच करताना मराठ्यांच्या दोन मजला पुढे राहावे, असा सामंजस्याचा करार झाला. एवढा एक प्रसंग सोडता शीख आणि मराठ्यांचे संबंध पुढेपर्यंत सौहार्दाचे राहिले, आपण याबद्दल पुढेही पाहणार आहोत.

आदिना बेग आता राजकारण खेळू लागला. त्याला मराठे, मुघल बादशहा, शीख, आणि अब्दाली या सर्व दरडींवर हात ठेवायचे होते, म्हणजे सगळ्यांकडूनच त्याला फायदा उकळायचा होता. म्हणून त्याने जहाँखान यालाही पत्र लिहून कळवले की मराठे दिवसाला शंभर-शंभर कोस मजला मारत आहेत, त्यांची फौजही भरपूर आहे, त्यामुळे माझा निभाव येथे लागणार नाही. मी अब्दालीचा एकनिष्ठ सेवक असल्याने मी आपल्याला कळवतो की, आपणच पुढे येऊन या मराठ्यांचा नायनाट करावा.

सरहिंदला मराठ्यांनी वेढा घातला आहे, ही बातमी जहाँखान याला आधीच कळलेली होती. तो मोठी फौज घेऊन सरहिंदच्या कुमकेस निघाला, पण वाटेतच त्याला सरहिंद पडल्याची खबर मिळाली. मग तो जलालाबाद येथे तळ ठोकून मराठ्यांना अडवण्यासाठी उभा राहिला. पण त्याला कळले की त्याला हुलकावणी देऊन मराठे कधीच लाहोरच्या दिशेने निघाले आहेत. ही खबर येताच अफगाणांचे अवसान गळाले आणि जहाँखान माघारी फिरला.

मराठ्यांकडून मानाजी पायगुडे यांनी लाहोरच्या दिशेने कूच केले. या फौजेपाठोपाठ आदिना बेगची फौजही निघाली. जहाँखान आता घाबरला खरा, पण अखेर तोही सेनापती होता. शाहजादा तैमूर, अफगाणांचा जनानखाना, मौल्यवान खजिना याच्या रक्षणाची जबाबदारी त्याची होती. त्याने भराभर निर्णय घेतले. सर्व जनानखाना रावी नदीच्या पलीकडे हलवण्यात आला. जे सैनिक लपून बसत होते किंवा पळून जात होते, त्यांची मुंडकी मारण्यात आली. पण, इतके करून मराठ्यांच्या वादळात आपला टिकाव लागणे अशक्य आहे, हे जहाँखान आणि तैमूरशाह यांना पक्के समजून चुकले होते. मानाजी पायगुडे, गंगाधर बाजी भीवराव, गोपाळराव गणेश या तिघांनी सड्या फौजा बियास नदीपार केल्या. १९ एप्रिल १७५८ रोजी जहाँखान आणि तैमूरशाह लाहोरमधून दहशत खाऊन पळाले आणि मानाजी पायगुडे यांनी लाहोरचा कब्जा केला. ताबडतोब या फौजेने अफगाणांचा तोफखाना, बुणगे लुटून काढले आणि त्यांचा पाठलाग आरंभला.

जहाँखान आणि तैमूर चिनाबच्या काठी पोहोचले आणि मराठ्यांनी त्यांना येथे गाठले. थोडी फार हातघाईची लढाई झाली. मराठ्यांकडे तोफखाना नसल्याने वेढा घालून जहाँखान व तैमूर यांना कोंडीत पकडता येईना. सामान घेऊन पळता येईना म्हणून जड सामानसुमान, तोफा, खजिना टाकून जहाँखान व तैमूर कसेबसे चिनाबपार झाले. हिमालयात बर्फ वितळून नदीला पूर आलेला असल्याने आणि थंडगार पाण्याने नदी भरून गेली असल्याने मराठ्यांना ती ओलांडता आली नाही. मोठ्या संख्येने अफगाण, किझलबाश, इराणी सैनिक नावा, होड्या न मिळाल्याने चिनाबच्या अलीकडेच अडकून पडले आणि मराठ्यांच्या हाती लागले. पाठोपाठ आलेल्या शीख फौजेने या सर्वांना ताब्यात घेतले आणि थेट अमृतसरला त्यांची रवानगी केली. अब्दालीने भ्रष्ट केलेले आणि बुजवण्याचा प्रयत्न केलेले पवित्र सरोवर गाळ काढून स्वच्छ करण्याच्या कामाला या सर्व कैद्यांना लावण्यात आले.

लाहोर आता मराठ्यांच्या पूर्णपणे ताब्यात आले होते. श्रीमंत रघुनाथरावांनी लाहोरमध्ये प्रवेश केल्यावर बादशहाच्या जुन्या महालात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. बहुधान्यनाम संवत्सराच्या गुढीपाडव्यालाच हा समारंभ करण्यात आला. आदिना बेग याला पंजाबची सुभेदारी देण्यात आली.

अश्विन पुंडलिक
ashwin3009@gmail.com


Read About : DNA Typewriter Technology : एका पेशीतून संपूर्ण शरीर कसे तयार होते? शास्त्रज्ञांनी उलगडले रहस्य
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.