१० मिनिटेही पुरली नाहीत! १०० मिनिटांत समभागांचा पूर्ण भरणा; ६६,५०० कोटींचे अर्ज
Jio Platforms IPO : नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या ‘जिओ (JIO) प्लॅटफॉर्म्स’ चा बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) बाजारात येतो न येतो तोच गुंतवणूकदारांच्या अक्षरश: उड्या पडल्या, अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण आयपीओ ओव्हरसब्स्क्राईब होऊन जिओने शेअर बाजारात अक्षरश: खळबळ उडवून दिली. भारतातील सर्वात मोठा ३०,२१३ कोटी रुपयांचा हा आयपीओ खुला होताच अवघ्या १०० मिनिटांत समभागांचा पूर्ण भरणा झाला. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात जलद विक्री ठरली आहे. सुरुवातीलाच बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसे ओतण्यासाठी घातलेली स्पर्धा पाहता, हा आयपीओ या वर्षाचा सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या आयपीओला ३.०१ पट प्रतिसाद मिळाला. १९.७५ कोटी शेअर्सच्या विक्रीसाठी जगभरातील गुंतवणूकदारांनी तब्बल ५९.४४ कोटी शेअर्ससाठी बोली लावत सुमारे ६६,५०० कोटी रुपयांचे अर्ज सादर केले. अँकर इन्व्हेस्टर्सचा विचार केल्यास एकूण मागणी तब्बल ७४,६१० कोटी रुपयांच्या पार गेली आहे.
१,०६५ ते १,११९ रुपये प्रति समभाग असा किंमत पट्टा असलेल्या या आयपीओमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सचे मूल्य तब्बल १०८ अब्ज डॉलर्स (सुमारे ९ लाख कोटी रुपये झाले आहे. टेलिकॉम क्षेत्रासोबतच डिजिटल सेवा, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि एआय क्षेत्रात विस्तार करणाऱ्या जिओच्या ५३.३ कोटी ग्राहकांच्या भक्कम पायावर गुंतवणूकदारांनी पूर्ण विश्वास दाखवला आहे.
इतर मोठ्या आयपीओंना टाकले मागे
जिओचा हा वेगवान प्रतिसाद इतर मोठ्या भारतीय कंपन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा ठरला आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ पहिल्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण भरला होता. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा आयपीओ २०२५ मध्ये पहिल्या दिवसाच्या अखेरीस पूर्ण सबस्क्राईब झाला होता. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या २७,८७० कोटींच्या आयपीओला २०२४ मध्ये पहिल्या दिवशी केवळ १८ टक्के प्रतिसाद मिळाला होता. या तुलनेत जिओने पहिल्याच दिवशी अभूतपूर्व विक्रम केला आहे.
कंपनीला थेट मिळणार निधी
ह्युंदाई आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे आयपीओ हे पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ स्वरूपात होते, म्हणजेच शेअर्स विकणाऱ्या जुन्या भागधारकांना तो पैसा मिळाला असता. याच्या अगदी उलट, जिओ प्लॅटफॉर्म्स तब्बल २७ कोटी नवीन समभाग विक्रीला आणत असून यातून गोळा होणारा संपूर्ण निधी थेट कंपनीच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.
मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद
या आयपीओमध्ये बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सर्वाधिक रस दाखवला असून त्यांचा कोटा तब्बल ९.०२ पट भरला गेला. यामध्ये देशांतर्गत बँका, विमा कंपन्या, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड्सनी जोरदार बोली लावली आहे.
Read About : Equity Mutual Fund Investment September- शेअर बाजारातील अस्थिरतेतही इक्विटी म्युच्युअल फंडांत 38,306 कोटींची गुंतवणूक
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.