Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Crime 4 Murders in 4 Days : किरकोळ कारणांवरून थेट जीव घेण्याची विकृती, शहरात 4 दिवसांत 4 हत्या

मुकुंदवाडीत गरब्यातील वादातून तरुणाची हत्या, रांजणगावात बाप-लेकाचा खून आणि सिडकोत व्यावसायिक वादातून मित्राची हत्या

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime शहरात मागील चार दिवसांत लागोपाठ घडलेल्या भीषण आणि निर्घृण हत्याकांडाच्या सत्रामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर हादरून गेले आहे. वेगवेगळ्या तीन गंभीर घटनांमध्ये एकूण चार जणांचा बळी गेला आहे. शहरातील मुकुंदवाडी, रांजणगाव शेणपुंजी आणि एन-७ सिडको भागात या रक्ताळलेल्या घटना घडल्या आहेत.

१. मुकुंदवाडीत गरब्यातील वादातून मित्राची हत्या

पहिली घटना मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर भागात घडली. नवरात्रोत्सवात दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ वादाचा व नशेत झालेल्या भांडणाचा रक्तरंजित शेवट झाला. पुष्कर सतीश गाडे (वय २०) या तरुणाची त्याचाच जिवलग मित्र महेश संजय पवार उर्फ भोऱ्या (वय २३) याने डोक्यात आणि मानेवर लोखंडी रॉडने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी महेश पवारने स्वतः एका पोलीस मित्राला फोन करून गुन्ह्याची माहिती दिली, ज्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला अटक केली.

२. रांजणगावात किरकोळ वादातून बाप-लेकाचे दुहेरी हत्याकांड

दुसरी अत्यंत खळबळजनक घटना वाळूज जवळील रांजणगाव शेणपुंजी येथील कृष्णानगर भागात घडली. ६ महिन्यांपूर्वीच्या जुन्या वादावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांत मोठा संघर्ष झाला. यात आरोपी नागेशने त्याच्या आईने आणून दिलेल्या चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात बाबासाहेब रामदास कीर्तिकर (वय ४३) आणि त्यांचा मुलगा निहाल बाबासाहेब कीर्तिकर (वय १७) या बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन मुले गंभीर जखमी झाली. हत्येनंतर रेल्वेने हरियाणाला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या राजेंद्र गयचंद, मनोज गयचंद, नागेश गयचंद, मानसी गयचंद आणि शानो गयचंद या पाचही संशयित आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून अवघ्या काही तासांत जेरबंद केले.

३. सिडको एन-७ मध्ये व्यावसायिक वादातून मित्राचा काटा काढला

तिसरी थरारक घटना एन-७ सिडकोतील मंगेश गॅस एजन्सीसमोर भरदिवसा घडली. व्यावसायिक स्पर्धेतून आणि आर्थिक वादातून देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (वय ३६) हा जिममधून दुचाकीवर घरी परतत असताना, त्याचा मित्र असलेला आरोपी पवन दिलीप पराशर (वय २२) याने कारने त्याचा पाठलाग केला. पवनने बंटीच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे बंटी हवेत उडून रस्त्यावर कोसळला आणि त्याची दुचाकी १५० फुटांवर जाऊन पडली. त्यानंतर आरोपी पवन पराशरने कारचा यू-टर्न घेतला आणि रस्त्यावर जखमी पडलेल्या बंटीच्या डोक्यात लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने वार करून त्याला जागीच संपवले. या भीषण कृत्यानंतर आरोपी स्वतः रक्ताळलेली कार घेऊन सिडको पोलीस ठाण्यात हजर झाला.

Read About : Chhatrapati Sambhajinagar Murder : आधी कारची जोरदार धडक, नंतर रॉडने वार; एन-7 सिडको भागात भरदिवसा व्यावसायिक वादातून मित्राचा क्रूर खून

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.