Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Worst Drought 1972 vs 2026 : १९७२ की २०२६? महाराष्ट्राचा सर्वात भयानक दुष्काळ कोणता?

1972 चा महाभयंकर दुष्काळ… 54 वर्षांनंतर 2026 मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

Maharashtra Worst Drought 1972 vs 2026 “तडे गेलेली काळी आई… सुकलेली विहीर… करपलेली पिके आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला आपला बळीराजा. हे चित्र आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलंय. होय, आज २०२६ मध्ये आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा भीषण दुष्काळाच्या आगीत होरपळतोय. आपण २०१२ चा दुष्काळ पाहिला, २०१५ ची भीषणता सोसली आणि २०१९ चा पाण्याचा टँकरही अनुभवला. पण आज, २०२६ मध्ये जे घडतंय… ते या सगळ्याच्या पलीकडचं आहे!”

“जेव्हा आजच्या परिस्थितीची तुलना महाराष्ट्रातील ज्येष्ठ माणसं करतात, तेव्हा त्यांच्या तोंडून एकच वर्ष निघतं… ते म्हणजे १९७२! ५४ वर्षांपूर्वीचा तो भयानक दुष्काळ आणि आजचा २०२६ चा दुष्काळ. आज आपण या व्हिडिओत दोन्ही दुष्काळाचे वास्तव मांडणार आहोत. १९७२ आणि २०२६… नक्की कोणता दुष्काळ महाराष्ट्राला जास्त उद्ध्वस्त करतोय? रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

“चला, आधी आजच्या वास्तवावर नजर टाकूया. २०२६ मधील हा दुष्काळ अचानक आलेला नाही. यंदाच्या मान्सूनमध्ये निसर्गाने आपल्याला पुरतं फसविलं. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तब्बल १८ ते २० टक्के पाऊस कमी झाला आहे. पण ही फक्त टक्केवारी नाही, याच्या मागचं सत्य खूप भयंकर आहे.

राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ३०० हून अधिक तालुक्यांमध्ये आज पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. विहिरींनी कधीच तळ गाठलाय. भूजल पातळी तब्बल ३ ते ५ मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच, खोल बोअरवेल मारूनही आता फक्त धूळ बाहेर येतेय.”
“मराठवाड्यात परिस्थिती सर्वात गंभीर आहे, तिथे ३९% पावसाची तूट आहे. ऐन पावसाळ्यातच धरणांमधील पाणी साठा सिंगल डिजिटवर (१०% पेक्षा कमी) आला होता. खरिपाची सोयाबीन, कापूस, मका ही पिके तर जळून खाक झालीच, पण रब्बीचा खानदेशातील कपाशी,विदर्भाचा संत्र्याचा बेल्ट आज पूर्णपणे होरपळून निघाला आहे. ज्यांना उभं करायला शेतकऱ्याने रक्ताचं पाणी केलं होत ती फळझाडं वाळून चालली आहेत.चाऱ्या अभावी जनावरे जनावरांच्या बाजारात इच्छा नसताना शेतकऱ्याला न्यावी लागत आहे. म्हणजे या दुष्काळाने शेतकरी शेती, पशुपालन अशा दोन्ही आघाड्यावर उध्वस्त झाला आहे.

आता आपण मागे जाऊया इतिहासात…

वर्ष १९७२. आजच्या पिढीला कदाचित माहित नसेल, पण तो फक्त पाण्याचा दुष्काळ नव्हता, तो ‘अन्नाचा दुष्काळ’ होता. सलग तीन वर्षे पाऊस न पडल्यामुळे महाराष्ट्राची धान्य कोठारे रिकामी झाली होती. आजच्यासारखी मोठी धरणे तेव्हा नव्हती, टँकरची सोय नव्हती आणि दळणवळणही नव्हते.

पण आजच्यासारखा पाण्याचा प्रचंड उपसा न झाल्याने जमिनीत पाणी टिकून होतं. म्हणजे 72 च्या दुष्काळात पाणी होतं पण अन्न नव्हतं ”त्या काळातील आठवणी ऐकल्या की डोळ्यात पाणी येतं. गावागावांत खायला अन्न नव्हतं. लोक सांगतात की, अमेरिकेतून जो ‘लाल गहू’ जनावरांसाठी आणला जायचा, तो गहू माणसांना खावा लागला. ‘सुखडी’ नावाचा पेंडसारखा पदार्थ खाऊन लोकांनी भूक भागवली.

गावातील प्रतिष्ठित, श्रीमंत कुटुंबा देखील या दुष्काळाने मातीत मिसळले. भलेभले जमीनदार, पाटील आणि त्यांच्या घरातील महिला पुरुषही पोट भरण्यासाठी ‘रोजगार हमी योजना’ (रोहयो) च्या कामावर जाऊ लागले. उन्हातान्हात दिवसभर दगड आणि खडी फोडल्यानंतर कुठे दोन पैसे हातावर पडायचे. पाण्याअभावी हजारो जनावरे रस्त्या कडेला तडफडून मरण पावली, कित्येक गोवंश खाटीकखान्यात गेले. जगण्यासाठी गावेच्या गावे रिकामी झाली आणि लोकांनी मुंबई-पुण्याच्या मिल कडे धाव घेतली. तो केवळ दुष्काळ नव्हता, ते एक जिवंत मरण होतं!”

“आता मुख्य प्रश्न… मोठा कोणता?

१९७२ की २०२६? वरवर पाहता १९७२ जास्त भयानक वाटेल, कारण तेव्हा अन्न नव्हते. पण तज्ज्ञ सांगतात, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या २०२६ चा दुष्काळ अधिक घातक आहे! कसा? ते या तीन मुद्द्यांवरून समजून घ्या.”

१. गुंतवणुकीचा जुगार :

“१९७२ मध्ये पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्याचा पेरणीचा खर्च झाला नव्हता. तो मजूर बनून खडी फोडत होता. पण २०२६ चा शेतकरी आधुनिक आहे. त्याने एकरी २० ते ३० हजार रुपये खर्च करून महागडी बियाणे, खते घेतली. ट्रॅक्टरचा खर्च केला. पीक जोमात आलं आणि ऐनवेळी पाऊस गेला. म्हणजेच, २०२६ च्या शेतकऱ्याची संपूर्ण गुंतवणूक एका झटक्यात शून्य झाली!”

२. कर्जाचा विळखा :

1972 मध्ये बँका नव्हत्या, सावकारी कर्ज मर्यादित होतं. आज २०२६ मध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावर पीक कर्ज आहे, ट्रॅक्टरचे हप्ते आहेत, खाजगी सावकारांचा तगादा आहे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. पीक गेलं तरी हा कर्जाचा डोंगर कमी होत नाही. म्हणूनच आज शेतकरी जास्त आत्महत्येकडे वळतो आहे.”

३. पाण्याचे संकट:

“१९७२ मध्ये जमिनीच्या पोटात पाणी होतं, विहिरी खोदल्या की पाणी लागायचं. आज २०२६ मध्ये आपण पृथ्वीचे पोट पोखरून हजार फुटांवर गेलोय, तरी पाणी नाही. आपण आपले पाण्याचे स्त्रोतच संपवून टाकले आहेत.”

“संकट मोठं आहे, मान्य! पण महाराष्ट्र कधीच संकटांसमोर झुकलेला नाही. आपल्याला २०२६ च्या या महादुष्काळाशी लढावं लागेल आणि आपण सावरणार कसे? त्यावर आता बोलू”

पाण्याचे रॅशनिंग: प्रत्येक गावाने आणि शहराने पाण्याचा अपव्यय थांबवला पाहिजे. गाड्या धुणे, पाण्याचा विनाकारण वापर यावर कडक बंदी हवी.

कमी पाण्याच्या पिकांची निवड: ऊस आणि जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी बाजरी, ज्वारी, कडधान्ये या पारंपरिक पिकांकडे वळण्याची हीच वेळ आहे.

सरकारी आणि सामाजिक कवच: सरकारने बँकांचे हप्ते आणि वीजबिल पूर्णपणे माफ केले आहे. फक्त त्याची प्रॅक्टिकली अंमलबजावणी झाली पाहिजे. शहरात राहणाऱ्या नोकरदार वर्गाने आपल्या गावाकडच्या बांधवांसाठी मदतीचे हात पुढे केले पाहिजेत.

“जाता जाता एकच गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते… जमिनीला पडलेल्या तड्यांमधून केवळ धूळ उडत नाही, तर त्यातून आमच्या शेतकऱ्याची स्वप्नं राख होऊन उडून चालली आहेत. पण लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. संकटं येतात आणि जातात, बदलतो तो फक्त काळ! १९७२ च्या काळोखाला चिरून जर आपली जुनी पिढी बाहेर पडू शकली, तर २०२६ च्या या संकटाला हरवण्याची ताकद आजच्या तरुणांच्या मनगटातही आहे.

गरज आहे ती फक्त एकमेकांचा हात हातात धरण्याची. शेतकऱ्याला एकटं सोडू नका, त्याला धीर द्या. कारण जमीन सुकली तरी चालेल, पण माणसांमधील माणुसकी सुकता कामा नये.”

Read About: Shivaji Maharaj Drought Management Farmer Welfare – 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळ कसा संपवला होता? उपाय वाचून व्हाल थक्क..!

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.