Ad Advertisement Ad Advertisement

Why Ravana Never Dies : रावण मरत का नाही?

Why Ravana Never Dies : काळाच्या प्रवाहासोबत वाहताना समाजातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील सीमारेषा झिजून एवढ्या अंधुक होत गेल्या आहेत की, प्रथा-परंपरांच्या खांद्यावर बसून मिरविणाऱ्या अंधश्रद्धांच्या बाजाराने श्रद्धेच्या मंदिरात केव्हा प्रवेश केला किंवा प्रामाणिक श्रद्धांवर अंधश्रद्धांचा मुलामा चढून त्यादेखील बेगडी कशा ठरू लागल्या ते निश्चित सांगता येणे आता अवघड झाले आहे. अन्यथा, घराघरांत श्रद्धापूर्वक प्रतिष्ठित होणाऱ्या गणेशोत्सवाने सार्वजनिक रूप धारण केल्यानंतर त्यास व्यावहारिक, व्यापारी रूप प्राप्त होऊन मंगल आरत्या, अथर्वशीर्षांची जागा फटाक्यांच्या रोषणाईने, प्रखर दिव्यांच्या आतषबाजीने आणि कर्णकर्कश्श प्रदूषणकारी ध्वनीच्या गोंगाटाने केव्हा घेतली ते वेळीच लक्षात येऊन त्यास आवर घालणे आजच्याएवढे अवघड झाले नसते.

दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून आरोग्यास अपायकारक अशा वायूच्या धुराची वेटोळी आसमंतात पसरवून जीवाची घुसमट करणारी फटाक्यांची आतषबाजी करणे ही श्रद्धा नाही, हे माहीत असूनही तसे करण्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचे मोजमाप सोपे व्हावे यासाठी फटाक्यांच्या आतषबाजीला श्रद्धेचा मुलामा देण्याची वेळदेखील आली नसती आणि पाडवा-दसऱ्याच्या सणासुदीच्या हंगामात केवळ महागड्या वस्तूंची खरेदी केली पाहिजे या समजुतीला श्रद्धेचे कोंदणही लाभले नसते, त्यामुळेच केवळ श्रद्धेची जागा घेतलेल्या अंधश्रद्धांनी सण-उत्सवांची जागा व्यापण्यास सुरुवात केल्याचे लक्षात येऊनही त्यांचे पालन करणे ही परंपरा होत गेली आणि त्यामागील उद्देशांचा विसरदेखील पडत गेल्याने, परंपरा आणि प्रथांचे संस्कारदेखील मागे पडत गेले.

अन्यथा, नेहमीची प्रथा म्हणून विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने सोने लुटण्याच्या कार्यक्रमासोबत रावणदहनाची वर्षानुवर्षे चालणारी कृती काळासोबत मागे पडत गेली असती, पण तसे होत नाही. दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे उत्साहात दहन केले जाते, त्याच्या दहनक्रियेचा आनंद व्यक्त करण्यासाठी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी होते आणि रावण मेल्याचा आनंद साजरा केला जातो.

श्रद्धा आणि सामाजिक परंपरा म्हणून हे योग्यच आहे, यात शंका नाही. गेल्या कित्येक दशकांपासून दसऱ्याच्या सणाचा मुहूर्त साधून रावणदहनाचे सोहळे सार्वजनिकरीत्या साजरे केले जातात. ही दीर्घकाळ सुरू असलेली सामाजिक परंपराच आहे, त्यामुळे त्याला श्रद्धेची किनार लाभलेली आहे. हेदेखील चांगलेच आहे. मात्र, रावणदहनाच्या परंपरागत कार्यक्रमामागील हेतू काळाच्या ओघात काहीसा नजरेआड होऊ लागल्याने, अन्य अनेक सण-उत्सवांच्या काळात त्या त्या वेळी साजऱ्या करावयाच्या प्रथांप्रमाणेच दसऱ्याच्या उत्सवकाळी रावणदहन करणे एवढीच औपचारिक परंपरा मागे राहिली आहे.

रावणदहनाच्या परंपरेमागील हेतूचा विसर पडत गेल्याने, दर वर्षी रावणाच्या प्रतिमेचे दहन करूनही रावणवृत्तीचा विनाश मात्र होत नसल्याने, ही पवित्र परंपरादेखील आता अंधश्रद्धांच्या मालिकेत जमा होईल आणि कालांतराने त्यासही सुधारकांच्या विरोधाच्या सुरास सामोरे जावे लागेल अशी भीती आता खुणावू लागली आहे, त्यामुळे ज्या परंपरांमागे काही सामाजिक हेतू आहेत, त्या परंपरा निष्ठेने पाळल्या जाव्यात आणि त्याच उद्देशाने असे सण-उत्सवांचे सोहळे साजरे केले जावेत याची काळजी घेण्याची जबाबदारी उत्सवप्रिय समाजाच्या शिरावर येऊन पडली आहे.

उत्सवप्रियता हे सामाजिक जाणिवा जिवंत असण्याचे एक चांगले लक्षण आहे. सण, उत्सव आणि सोहळ्यांच्या निमित्ताने सामूहिकतेच्या जाणिवा जाग्या होतात, समाज म्हणून परस्परांशी ऐक्याचे नाते जडते आणि समूहाने सण साजरे केल्याने सणांचा उत्साहदेखील वाढतो यातही शंका नाही, म्हणूनच घराघरांत खाजगीरीत्या साजऱ्या होणाऱ्या सण-सोहळ्यांना सार्वजनिक रूप देऊन ते सामूहिकरीत्या साजरे करण्याची कल्पना गेल्या शतकभरात उचलून धरली गेली. त्याच परंपरेचा भाग म्हणून, दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या कागद, गवत, फटाके आदींच्या साह्याने बनविल्या गेलेल्या प्रतिमेचे उत्सवी उत्साहाने दहन केले जाते.

समाजातील वाईट प्रवृत्तींंचे आणि परंपरांच्या नावाखाली फोफावणाऱ्या वाईट प्रथांचे दहन व्हावे व समाज सन्मार्गाला लागावा हा या प्रथेमागील हेतू असला तरी कित्येक दशकांपासून दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करूनही या वाईट प्रवृत्तींंच्या विळख्यातून समाजाची कायमची मुक्तता मात्र होत नाही. त्या प्रवृत्ती समाजात खोलवर रुजून राहिल्या आहेत आणि त्यांची पाळेमुळे खोलवर रुजू लागलेली आहेत.

महिला-बालकांची असुरक्षितता, महिलांवरील अत्याचार, चिमुरड्यांचे शोषण, हे या प्रवृत्तीचेच समाजात फोफावलेले रूप आहे. सीतेच्या स्त्रत्विाच्या सन्मानासाठी रावणाचा वध झाला, असे सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीत, स्त्री सन्मानाची कुचेष्टा करणाऱ्या रावणाला शिक्षा म्हणून त्याचे दरवर्षी या दिवशी दहन केले जाते, पण स्त्री सन्मानाचा संस्कार असलेल्या समाजात आजही रुजून राहिलेली रावणाच्या या कुप्रवृत्तीची बीजे प्रत्येक दहनानंतरही जिवंत राहिलेली दिसतात. आजही रावणदहन केले जात असतानाही, स्त्रियांसाठी सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी पेलण्याचे समाजासमोरील आव्हान कायमच आहे.

वर्चस्ववादाचा उन्माद, भ्रष्टाचार, अत्याचार, गुन्हेगारी, सामाजिक भेदभाव, वर्गकलहातून निर्माण होणारा अहंकार ही सारी रावणाच्या स्वभावाची रूपे मानली जातात. रावणदहनामुळे या विकृतीदेखील जाळल्या जाव्यात आणि समाज यापासून मुक्त व्हावा अशी रावणदहनाच्या प्रथेमागील अपेक्षा असते. प्रथेप्रमाणे रावणाच्या पुतळ्यांचे दहन झाले आहे. आता अंतर्मुख होऊन, हा उत्सव रावणाच्या प्रवृत्तींंच्या दहनाचा आहे की रावणाचे आभासी भौतिक अस्तित्व नष्ट केल्याच्या समाधानाचा आहे हे ठरवावे लागेल. रावणाचे दहन झाले, पण तो खरोखरीच मेला का, याचे उत्तर शोधले नाही; तर ही प्रथादेखील कालांतराने अंधश्रद्धा होऊन जाईल.

Read About : Diwali firecracker restrictions : सर्वे सन्तु निरामया:!
E-Paper : Punyanagari E-Paperसंपादकीय

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.