Indian Classical Dance : भारतात कथ्थक, भरतनाट्यम, मणिपुरी, कथकली, ओडिसी, कुचीपुडी आणि मोहिनीअट्टम हे शेकडो वर्षांची परंपरा असलेले महत्त्वाचे नृत्यप्रकार आहेत. त्यापैकी भरतनाट्यम ही आज अस्तिवात असलेली, भारतातील सर्वांत जुनी शास्त्रीय नृत्य परंपरा आहे.
नृत्यस्य आनंद विद्या, नृत्यस्य ब्रह्म संदर्श:।
यत्र परिभ्रमती जीव, तत् स्थलम् नाट्यम आश्रम॥
नृत्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. शिकारी अवस्थेत असल्यापासून मानव नृत्याचा आनंद घेत आला आहे. मनाला रिझवण्यासाठी मनमुराद नाचता नाचता मानवाला नृत्याचे नियम बनवावे वाटले आणि वेगवेगळे नृत्यप्रकार अस्तित्वात आले. भारतात कथ्थक, भरतनाट्यम, मणिपुरी, कथकली, ओडिसी, कुचीपुडी आणि मोहिनीअट्टम हे शेकडो वर्षांची परंपरा असलेले महत्त्वाचे नृत्यप्रकार आहेत. त्यापैकी भरतनाट्यम ही आज अस्तिवात असलेली, भारतातील सर्वांत जुनी शास्त्रीय नृत्य परंपरा आहे.
या कलेचे हजारो वर्षे सदिरअट्टम असे नाव होते. या कलेची मुळे आपल्याला नाट्यशास्त्रामध्ये तसेच दुसऱ्या शतकात लिहिल्या गेलेल्या सिलाप्पटिकरम या तमिळ महाकाव्यात आढळतात. भरत मुनींच्या नावावरूनच आता ही कला भरतनाट्यम म्हणून ओळखली जाते. दीड हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या मंदिरांच्या स्तंभावर आणि भिंतींवर भरतनाट्यम करणाऱ्या नर्तकींची शिल्पे कोरलेली आहेत. शास्त्रीय संगीताची जशी ग्वाल्हेर, इंदोर पतियाळा अशी घराणी आहेत, तशी भरतनाट्यम नृत्य परंपरेमध्ये बानी अर्थात शैली आहेत.
तंजावर, कलाक्षेत्र, वझुवूर आणि मैसुर अश्या भरतनाट्यममधील काही शैली प्रसिद्ध आहेत. प्रत्येक शैलीत थोडाफार बदल असतो, उदा. वझुवूर शैलीमध्ये स्त्री आणि स्त्रीत्व यांना अधिक महत्त्व दिलेले असते. इथे शक्तीचे लास्यनृत्य शिवाच्या तांडवापेक्षा अधिक प्रभावी असते. भरतनाट्यम शिकण्याचे दोन टप्पे असतात. विद्यार्थ्याला किमान कौशल्य प्राप्त झाल्याशिवाय घुंगरू बांधण्याची परवानगी नसते. ज्यावेळेस विद्यार्थी गुरुसमोर पूर्ण कार्यक्रम एकटा पार पाडतो, त्यावेळी त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असे मानले जाते.
मग तो गुरूशिवायदेखील त्याची कला सादर करू शकतो. मृदंगम, वीणा, बासरी, घटम यांसारख्या वाद्यांचा वापर करून दाक्षिणात्य संगीताच्या साथीने भरतनाट्यम नृत्य सादर होतं. देवाच्या पूजेचा भाग म्हणून मंदिरामध्ये देवदासी नृत्य करत असत. या देवालयांना आणि देवदासींना राजाश्रय असे. सहाजिकच इथे देवदासींचे शोषण मोठ्या प्रमाणात होत असे. ब्रिटिश आमदनीमध्ये जेव्हा देवदासी प्रथेविरुद्ध नियम बनवण्यात आले, तेव्हा भरतनाट्यम नृत्यावर बंदीदेखील आणली गेली. मात्र, भरतनाट्यमच्या अनेक साधकांनी याविरुद्ध आवाज उठवला, स्वत:ला अटक करून घेतली. अखेरीस वीस वर्षांनी ही बंदी उठवली गेली.
कथ्थक हा देखील किमान दोन हजार वर्षांची परंपरा असलेला नृत्यप्रकार आहे. उत्तर भारतात याचा विकास झाला. कथ्थक म्हणजे गोष्ट सांगणे. आपल्या नृत्य आणि अभिनय यांचे मिश्रण करून कथ्थक कलाकार आपली कला सादर करत असतो. चेहरा, हात, पाय आणि पूर्ण शरीर बोलते करत असतो. आपल्या रंगीबेरंगी रंगभूषेमुळे तसेच पोषाखामुळे कथकली या नृत्य प्रकारातील कलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. केरळमधील हा नृत्य प्रकार फारसा प्राचीन नाही, मात्र आज जगाच्या आकर्षणाचा विषय झाला आहे.
पन्नास वर्षापूर्वी या नृत्यात स्त्रियांना सहभागी होता येत नसे, मात्र आता स्त्रियादेखील या रंगीत नृत्याचा आनंद घेत आहेत. चेहऱ्यावर रागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल तर प्रेमासाठी हिरवा रंग लावला जातो. काळा रंग तामसी विचार तर पांढरा रंग सात्विकतेचे प्रतिनिधित्व करतो. पोशाखाचे वजन तब्बल १२ किलो असते. कलरीपयट्टूच्या सैनिकांनी या नृत्य परंपरेचे शेकडो वर्षे जतन केलं. अर्थात, त्यामुळे त्यांना शरीरासाठी वेगळा व्यायाम करण्याची गरज लागली नसावी.
न तथा सिघ्रं औषधं, न तथा सिघ्रं औम मंत्रम्, यथा सिघ्रं नृत्य विद्या प्रसीदति॥ अर्थात, औषध किंवा मंत्राचा त्वरित परिणाम होणार नाही, त्यापेक्षा जास्त लवकर नृत्य विद्या गुण देईल. नृत्य हे माध्यम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कसं उपयोगी पडेल यावर भारतात हजारो वर्ष चिंतन झालं आणि त्यातून नृत्यचिकित्सादेखील विकसित झाली. आयुर्वेद तसेच भारतीय तत्त्वज्ञानदेखील शारीरिक आणि मानसिक लाभ व्हावा म्हणून संगीत आणि नृत्य यांची आराधना करण्यास सांगते. भान हरपून नृत्य केल्यामुळे मेंदूमध्ये स्राव तयार होतात आणि मानसिक ताणतणावातून व्यक्ती मोकळी येऊ शकते. मात्र, त्यासोबत नृत्य हा एक उत्कृष्ट शारीरिक व्यायामदेखील ठरतो.
मणिपुरी नृत्याचे उदाहरण घेतले तर आपल्या लक्षात येईल की यात नर्तक सातत्याने गोल फिरत असतात, मात्र तरीही ते एकमेकाला किंवा इतर कोणत्या वस्तूला धडकत नाहीत, त्यांची लय बिघडत नाही. या क्रियेत त्यांच्या मनाच्या संतुलनासोबत शरीराचे नियंत्रणदेखील होत असते. सर्वच भारतीय नृत्य प्रकारातून स्नायूंच्या लयबद्ध व्यायामासोबतच मन:शांती आणि शरीराची लवचिकतादेखील साधली जाते.
केरळमध्ये कुटियाट्टम नाट्य, नृत्यप्रकाराची दोन हजार वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. या नाटकांमध्ये ‘रामायण’ कधीकधी एकच प्रसंग अगदी महिनाभर रंगवला जातो. महाभारत तसेच इतर पौराणिक कथा रंगवल्या जातात. संस्कृत भाषेचा स्थानिक संस्कृती आणि रूढी परंपरेसोबत मिलाफ झालेल्या या कलाप्रकाराचा उल्लेख संगम साहित्यात अनेक ठिकाणी आढळतो. यामध्ये चेहरे रंगवून अभिनय केला जातो. चेहऱ्याच्या स्नायूंच्या अगदी सूक्ष्म हालचालींमधून आपल्याला अपेक्षित भाव पोचवणे हे या कलाप्रकाराचे वैशिष्ट्य.
तेव्हा फक्त हिंदू देवळांमध्ये सादर होत असल्याने ही कला शिकण्याची केवळ एका उच्चवर्णीय जातीलाच परवानगी होती. अभिनय शिकण्यासाठी कलाकार दहा ते पंधरा वर्षांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करतात. त्यामध्ये हावभावांची भाषा, डोळ्यांनी भावना व्यक्त करणे, हाताच्या हालचाली यासोबतच श्वासोच्छ्वासावर नियंत्रणदेखील शिकवले जाते. पूर्वी राजा महाराजांच्या आणि श्रीमंत लोकांसमोर सादर केली जाणारी ही कला आता सर्वसामान्य जनतेलादेखील पाहता येते. जगभर या कलेचा प्रसारदेखील होत आहे.
नितीन हांडे
संपर्क : ८९५६४४५३५७
Read About : AI Investment Cycle वर 2 मोठे धोके; वाढते व्याजदर आणि Monetisation अनिश्चिततेचा तंत्रज्ञान क्षेत्राला फटका
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.