Ad Advertisement Ad Advertisement

Mikhail Popkov Serial Killer : मिखाइल पॉपकोव्ह : ‘वर्दी’आडचा किलर!

Mikhail Popkov Serial Killer : काही गुन्हेगारांची कहाणी त्यांच्या गुन्ह्यांमुळे भयावह ठरते; काहींची कहाणी त्यांना एवढी वर्षे कोणी ओळखू शकले नाही, यामुळे अधिक अस्वस्थ करते. मिखाइल विक्टरोविच पॉपकोव्हची कहाणी या दोन्ही प्रकारांत मोडते.

मिखाइल विक्टरोविच पॉपकोव्ह रशियाच्या सायबेरियातील अँगारस्क शहरात पोलीस म्हणून काम करीत होता. त्याच्या अंगावर कायद्याची वर्दी होती. शहराच्या रस्त्यांवर तो लोकांना मदत करणारा, सहकाऱ्यांशी हसून बोलणारा आणि स्वत:च्या कुटुंबात रमणारा सामान्य माणूस म्हणून वावरत होता. पण, याच माणसावर पुढे झालेल्या तपासात तब्बल ९१ हत्यांशी संबंधित दोषसिद्धीची नोंद झाली. रशियन गुन्हेगारी इतिहासातील सर्वाधिक बळी घेतलेला सीरियल किलर म्हणून ओळखला जाऊ लागला.

त्याला माध्यमांनी ‘अँगारस्क मॅनियाक’ आणि ‘वेरवुल्फ’ म्हणजे ‘अँगारस्कचा विकृत खुनी’ आणि ‘लांडगामानव’ अशी नावे दिली. पण, त्याच्या कहाणीतील सर्वांत अस्वस्थ करणारी गोष्ट ही होती की, त्याचे भयावह रूप एखाद्या अपरिचित माणसाच्या चेहऱ्यासारखे नसून ते ओळखीच्या, विश्वासार्ह वाटणाऱ्या चेहऱ्यामागे दडले होते. कायद्याच्या रक्षणासाठी नेमलेला माणूसच कायद्याच्या चिंधड्या उडवू लागला तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर, हा प्रश्न त्याच्या प्रकरणाने उभा केला. पॉपकोव्हने स्त्रियांची हत्या केली, त्यांच्या स्वातंत्र्यावर आणि शरीरावर आघात केला; पण त्याच्या गुन्ह्यांच्या मालिकेने समाजाचा आणखी एक आधार मोडला आणि तो म्हणजे वर्दी, अधिकार आणि सुरक्षिततेच्या प्रतीकांवरील विश्वास.

१९६४ साली तत्कालीन सोव्हिएत संघातील नोरिल्स्क येथे मिखाइलचा जन्म झाला. लहानपणीच त्याचे कुटुंब सायबेरियातील ईकुत्स्क प्रदेशात असलेल्या अँगारस्क येथे आले. शालेय जीवनात त्याला स्कीइंगची आवड होती. लष्करी सेवा बजावल्यानंतर आणि काही काळ कारखान्यात काम केल्यानंतर १९८७ मध्ये तो मिलिशिया या तत्कालीन सोव्हिएत रशियन पोलीस व्यवस्थेत दाखल झाला. तो कनिष्ठ लेफ्टनंटच्या पदापर्यंत पोहोचला. सहकाऱ्यांमध्ये तो मिशा उलीब्का, या टोपणनावाने परिचित होता. त्याचा चेहरा प्रसन्न असे, तो लोकांशी सहज वागे आणि कामाच्या ठिकाणी त्याच्याविषयी संशय निर्माण करणारी प्रतिमा नव्हती. यथावकाश त्याचे लग्न झाले; पत्नी येलेना आणि मुलगी येकातेरिना यांच्यासह त्याचे कौटुंबिक जीवन वरकरणी व्यवस्थित दिसत होते. पुढे त्याच्यावर गंभीर आरोप झाले, तेव्हा त्याला ओळखणाऱ्या अनेकांना धक्का बसला.

१९९८ मध्ये त्याने पोलीस दलाची नोकरी सोडली. त्याच्या राजीनाम्यामुळे सहकारी आश्चर्यचकित झाले. पोलीस दलातून बाहेर पडल्यानंतर अँगारस्कमधील तेल रासायनिक उद्योगाशी संबंधित आस्थापनांत तो सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होता. २०११ च्या आसपास ही नोकरी सोडून त्याने वाहनांच्या खरेदी-विक्रीसंबंधीची कामे केली, प्रवासी वाहतूकदेखील केली आणि काही काळ स्मशानभूमीत कबरी खोदण्याचे कामही केले. समाजाच्या दृष्टीने पाहता हा एका माणसाच्या नोकऱ्या बदलण्याचा साधा इतिहास वाटू शकतो; पण त्या काळात त्याच्या गुन्ह्यांचे पुरावे विविध ठिकाणी विखुरलेले होते आणि तो स्वत:ही तपासापासून दूर राहत होता.

पॉपकोव्हचा गुन्हेगारी इतिहास १९९२ पासून सुरू झाल्याचे तपासात पुढे समोर आले. त्याने केलेल्या हत्यांचा कालावधी नव्वदच्या दशकापासून २०१० च्या दशकाच्या प्रारंभापर्यंत पसरलेला होता. हे गुन्हे विविध प्रदेशात घडले होते; अँगारस्क, ईकुत्स्क, उसोल्ये सिबिर्स्कोये आणि आसपासच्या भागांत स्त्रिया गायब होत होत्या, त्यांचे मृतदेह जंगलात, रस्त्यांच्या कडेला किंवा शहराच्या बाहेरील कमी वर्दळीच्या ठिकाणी सापडत होते. सुरुवातीला हे मृत्यू वेगवेगळ्या गुन्ह्यांसारखे दिसत होते; पण त्यांची पद्धत आणि काही समान खुणा तपास अधिकाऱ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होत्या.

त्याच्या गुन्ह्यांची पद्धत धक्कादायक आणि पूर्वनियोजित असायची. तो अनेकदा रात्रीच्या वेळी एकट्या स्त्रियांना गाठत असे. काही वेळा तर त्याने पोलीस गणवेश, तसेच अधिकृत वाहनाचा वापर केला; अन्य प्रसंगी तो सामान्य वाहनचालक असल्याप्रमाणे वागे. तो स्त्रियांना घरी सोडण्याचे किंवा प्रवासात मदत करण्याचे आश्वासन देई. स्त्रियांचा त्याच्यावर सहज विश्वास बसायचा, कारण समोरचा माणूस पोलीस असल्यामुळे त्या निर्धास्त व्हायच्या. त्या विश्वासाच्या बळावरच तो स्त्रियांना शहराबाहेर किंवा निर्जन ठिकाणी घेऊन जायचा. अनेक केसेसमध्ये त्याने महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या केली. कुऱ्हाड, चाकू, स्क्रूड्रायव्हर आणि गळा आवळण्यासाठी वापरली जाणारी साधने अशा वेगवेगळ्या वस्तू त्याने हत्यार म्हणून वापरल्या.

या स्त्रिया कोण होत्या याचा विचार केला की पॉपकोव्हच्या गुन्ह्यांची सामाजिक बाजू अधिक स्पष्ट होते. त्याच्या बळींपैकी काही स्त्रिया रात्री मद्यपान करून घरी परतत होत्या; काहींचा परिचय मद्यपानाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक जागांमध्ये झाला. बाकी स्त्रिया सामान्य नोकरदार, विद्यार्थिनी, प्रेमळ माता, मित्र-मैत्रिणींना भेटून घरी परतणाऱ्या तरुणी अशा वर्गातील होत्या. पीडित महिलांचे वर्तन गुन्हेगारी वर्गवारीतले तर कदापिही नव्हते; त्या आपल्या कुटुंबाच्या, मैत्रीच्या आणि रोजच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्ती होत्या. पॉपकोव्हने मात्र त्यांना कधीही चांगले व्यक्ती मानले नाही. त्यांच्या आयुष्याचा अर्थ त्याने स्वत:च्या विकृत निकषांवर ठरवला.

तपासात पॉपकोव्हने स्वत:च्या कृत्यांचे समर्थन करण्यासाठी एक भयावह तर्क पुढे केला. त्याने आपण शहरातील ‘अनैतिक’ स्त्रियांना संपवत होतो, असा दावा केला. काही प्रसंगी त्याने स्वत:ला शहरातील वाईटपणा दूर करणारा ‘स्वच्छताकर्मी’ मानल्याचे सांगितले. त्याच्या मते, रात्री बाहेर जाणाऱ्या, मद्यपान करणाऱ्या किंवा पुरुषाशिवाय फिरणाऱ्या स्त्रियांचे वर्तन निंदनीय होते.

या विचारांच्या पाठीशी स्त्रीच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची पुरुषी मानसिकता आणि स्वत:ला नैतिक न्यायाधीश समजण्याचा विकृत अधिकारभाव दिसतो. एखाद्या स्त्रीने रात्री बाहेर जाणे, मद्यपान करणे, अनोळखी व्यक्तीशी बोलणे किंवा वैवाहिक चौकटीबाहेर स्वत:चे निर्णय घेणे, यांपैकी कोणतीही गोष्ट तिच्यावर हिंसा करण्याचा अधिकार कुणालाही देत नाही. जून २०१२ मध्ये त्याला अटक करण्यात आली. रशियात १९९६ पासून मृत्युदंडावर स्थगिती असल्याने त्याला फाशीची शिक्षा झाली नाही. गुन्ह्यांच्या प्रचंड संख्येमुळे समाजात मृत्युदंडाची मागणी झाली, पण न्यायालयाने विद्यमान कायदेशीर चौकटीत जन्मठेपेची शिक्षा दिली. स्वत:ला नैतिकतेचा फुकट फौजदार समजणारा पॉपकोव्ह वास्तवात एक विकृत वासनांध विकारी पुरुष होता. आता तो कारागृहात सडतोय, त्याच्या कृत्यांची सजा भोगतोय!

समीर गायकवाड

Read About : Captain Tatsunosuke Ariizumi : कॅप्टन तात्सुनोसुके अरिझुमी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.