Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Crime – निवृत्त सुभेदार मेजरकडून लष्करी दारूचा साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची पडेगाव आणि जालना रोडवर कारवाई; ५७ बाटल्या व मोपेडसह १ लाख ६२ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime : लष्करातून सुभेदार मेजर पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीकडून सैन्यासाठी राखीव असलेल्या मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पडेगाव आणि जालना रोड परिसरात केलेल्या कारवाईत विदेशी मद्याच्या ५७ सीलबंद बाटल्या आणि एक मोपेड असा एकूण १ लाख ६२ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बाजीराव शामराव सोनुने (रा. द्वारकानगर, पडेगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला जालना रोडवरील सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली एका व्यक्तीकडून दुचाकीवरून बेकायदा मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी पथकाने परिसरात सापळा रचला.

एमएच-२०-बीडब्ल्यू-०९८१ क्रमांकाच्या मोपेडवरून जाणाऱ्या सोनुने याला पथकाने थांबवून झडती घेतली. त्यावेळी वाहनाच्या डिक्कीत आणि समोरील बॅगेत ७५० मिली क्षमतेच्या विदेशी व्हिस्कीच्या सहा सीलबंद बाटल्या आढळल्या. या बाटल्यांवर ‘केवळ सैन्यासाठी राखीव’ तसेच महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असल्याचा उल्लेख असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सोनुने याने हे मद्य आर्मी कँटीनमधून घेतल्याचे सांगितल्याची माहिती विभागाने दिली. त्यानंतर त्याच्या पडेगाव येथील द्वारकानगरमधील प्लॉट क्रमांक २०९ येथे पथकाने छापा टाकला. तेथे सैन्यासाठी राखीव असलेल्या व्हिस्की, रम आणि वोडकाच्या आणखी ५१ सीलबंद बाटल्या आढळून आल्या.

उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, सोनुनेकडे मद्य बाळगण्याचा परवाना आढळून आला नाही. विनापरवाना मद्य बाळगणे आणि प्रतिबंधित मद्याच्या व्यवहारासंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत ६० हजार रुपये किमतीची मोपेड आणि *१ लाख २ हजार ३८५ रुपये किमतीचे मद्य, असा एकूण *१ लाख ६२ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी उपआयुक्त तथा अधीक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद चौधरी, दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड, रेणुका कांबळे, अंकुश राठोड, गणेश नागवे, प्रवीण पुरी, बालू पुरी, विजय पवार, निखिल काकडे, अश्विनी बोंदर, कोमल नरके आणि सचिन पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read About : Roadways Bus Driver Assault : बसचालकाला बेदम मारहाण; ३ आरोपी २४ तासांत अटकेत
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.