कौशांबीच्या ग्रामीण भागातील यशोदा लोधींच्या इंग्रजी शिकवणाऱ्या व्हिडिओला प्रियांका चोप्रासह मृणाल ठाकूरची दाद
नवी दिल्ली : Priyanka Chopra उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सिराथू या गावात राहणाऱ्या आणि सोशल मीडियावर इंग्लिश विथ देहाती मॅडम या नावाने प्रसिद्ध असलेल्या यशोदा लोधी यांची एक सुखद धक्का देणारी माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने यशोदा यांचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
नेमके काय घडले होते?
यशोदा लोधी यांनी एक नवीन व्हिडिओ शेअर करत हा संपूर्ण रंजक किस्सा सांगितला आहे. त्या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होत्या. काम करता करता त्यांनी एक इंग्रजी शिकवणारा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचे ठरवले. मात्र, शेतात व्हिडिओ बनवताना पाहून त्यांच्या पतीने त्यांना चांगलेच ओरडले. पतीने विरोध करूनही यशोदा यांनी हार मानली नाही; त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट करून दिला.
प्रियांका चोप्राच्या एका शेअरने बदलले वातावरण
व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर यशोदा यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित व सुखद धक्का देणारी गोष्ट घडली. प्रियांका चोप्राने तो व्हिडिओ पाहिला आणि स्वत:च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तो शेअर केला. यशोदा यांनी सांगितले की, प्रियांका चोप्रा मॅडमने माझा व्हिडिओ शेअर करून माझा दिवस खरोखरच खूप खास बनवला आहे. केवळ प्रियांकाच नाही, तर प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर हिनेही यशोदा यांचा व्हिडिओ शेअर करून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
सेलिब्रेटी कोण आहेत हे माहीतच नव्हते
यशोदा यांच्या घरी टीव्ही नाही आणि त्या कोणत्याही मोठ्या सेलिब्रेटी किंवा कलाकारांना ओळखत नाहीत. त्यामुळे प्रियांका चोप्राने त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे, याची कल्पना सुरुवातीला त्यांना आलीच नव्हती. जेव्हा त्यांच्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मेसेज करून ही आनंदाची बातमी दिली आणि प्रियांका चोप्रा किती मोठी स्टार आहे हे समजावून सांगितले, तेव्हा यशोदा यांचे डोळे आनंदाने भरून आले.
कोण आहेत यशोदा लोधी?
यशोदा लोधी या केवळ १२ वी पर्यंत शिकलेल्या ग्रामीण महिला आहेत. त्या स्वत:च्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांना मोफत इंग्रजी बोलायला शिकवतात. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर ४ लाखांहून अधिक आणि इंस्टाग्रामवर ५ लाख ७७ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Read About : Liquor Smuggling – गॅस सिलिंडरमध्ये दारूचा गुप्त कप्पा; बिहारमध्ये 127 बाटल्या जप्त
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.