MDH Masala Success Story : भारत मसाल्यांचा देश आहे. किंबहुना भारतात अनेक परदेशी खलाशी या मसाल्यांच्या आकर्षणानेच आले. जिथे मसाले बनवण्याची घरोघरी परंपरा आहे, अशा देशात शंभर वर्षांहून अधिक काळ तयार मसाले विकणे आव्हानात्मक ठरू शकले असते. मात्र, रेडीमेड मसाल्यांचा जमाना येण्याच्या आधीपासून हे आव्हान स्वीकारणारा ब्रँड म्हणजे एमडीएच. याच एमडीएच मसाल्यांची ही झणझणीत कहाणी.
महाशय धर्मपाल गुलाटी यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे नेला. धर्मपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ रोजी सियालकोट येथे झाला. सियालकोट हे आज पाकिस्तानात आहे. त्यांचे वडील चुन्नीलाल गुलाटी यांचे शहरात मसाल्यांचे दुकान होते. या दुकानाचे नाव ‘महाशियन दी हट्टी’ असे होते. हट्टी म्हणजे दुकान. त्यावरूनच एमडीएच हे नाव निश्चित झाले. धर्मपाल गुलाटी यांना ‘डेग्गी मिरच वाले’ या नावानेही ओळखले जात असे. १९३३ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी धर्मपाल गुलाटींनी शाळा सोडली. त्यानंतर त्यांनी सुतारकाम, तांदळाचा व्यापार आणि हार्डवेअर विक्री अशी अनेक कामं केली. पुढे ते आपल्या वडिलांना त्यांच्या मसाल्याच्या व्यवसायात मदत करू लागले.
सियालकोटमधील वडिलांच्या मसाल्याच्या दुकानात काम करताना गुलाटींनी व्यवसाय विस्तारण्याचा विचार सुरू केला. हा व्यवसाय लाहोर, शेखुपुरा, ननकाना साहिब, लायलपूर आणि मुलतान या पंजाबमधील शहरांपर्यंत पोहोचला. त्यावेळी त्यांच्या व्यवसायाची दररोजची उलाढाल सुमारे ५०० ते ८०० रुपये इतकी होती. मात्र, १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या काळात त्यांच्या कुटुंबाला सियालकोट सोडून भारतात यावे लागले. काही काळ त्यांच्या कुटुंबाने अमृतसरमधील निर्वासित छावणीतही वास्तव्य केले. त्यानंतर ते नवी दिल्लीला गेले आणि तेथे आपल्या बहिणीकडे राहू लागले.
दिल्लीमध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी धर्मपाल गुलाटींनी ६५० रुपयांना एक टांगा खरेदी केला. ते नवी दिल्ली रेल्वेस्थानक, कुतुब रोड आणि करोल बाग परिसरात टांगा चालवत असत. मात्र, इतर टांगेवाल्यांचे वर्तन त्यांना पसंत नव्हते. या व्यवसायातून मिळणारे उत्पन्नही कमी होते. यानंतर त्यांनी साखर विकण्यासाठी एक छोटासा स्टॉल सुरू केला. मात्र, या व्यवसायातही भविष्यात फारशी संधी नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तो व्यवसाय बंद केला. अशा प्रकारे अनेक अडचणी आणि संघर्षांचा सामना करत गुलाटी यांनी आपल्या व्यवसायाच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे हाच संघर्ष आणि उद्योजकीय दृष्टिकोन त्यांच्या यशस्वी मसाला व्यवसायाच्या उभारणीचा पाया ठरला. वेगवेगळ्या व्यवसायांच्या अनुभवामुळे काय करायचे नाही याबाबतची त्यांची खूणगाठ पक्की होती. १९५८ मध्ये धर्मपाल गुलाटींनी नवी दिल्लीतील करोल बाग परिसरात एक छोटेसे लाकडी दुकान सुरू केले. या दुकानातून त्यांनी आपल्या वडिलांचा मसाल्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. त्याला पूर्वीचेच ‘महाशियन दी हट्टी’ हे नाव दिले. दुकानाची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्र ‘प्रताप’मध्ये जाहिरात दिली, त्यामुळे त्यांच्या दुकानाचे चौफेर नाव झाले.
१९५९ मध्ये जमीन खरेदी करून नवी दिल्लीतील कीर्ती नगर परिसरात मसाला उत्पादनासाठी त्यांनी कारखाना उभारला. त्या काळात बहुतेक भारतीय घरांमध्ये स्वयंपाकासाठी लागणारे मसाले घरीच दळले जात असत. अशा परिस्थितीत धर्मपाल गुलाटींनी तयार स्वरूपातील दळलेले मसाले बाजारात आणण्याची संकल्पना राबवली. १९६५ मध्ये त्यांच्या कंपनीची अधिकृत नोंदणी ‘एमडीएच’ या नावाने करण्यात आली. धर्मपाल गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठा पल्ला गाठला. त्यांच्या व्यावसायिक यशाबरोबरच ते भारतातील व्यावसायिक ब्रँड मार्केटिंगचे अग्रणी म्हणूनही ओळखले गेले. ते स्वत:च कंपनीचे ब्रँड मॅस्कॉट, ब्रँड आयकॉन आणि ब्रँड ॲम्बेसेडर बनले. पगडी, वळणदार मिशा, चष्मा आणि मोत्यांची माळ असा त्यांचा खास पेहराव असलेले व्यक्तिमत्त्व एमडीएचच्या मसाल्यांच्या प्रत्येक पाकिटावर तसेच जाहिरातींमध्ये दिसू लागले, त्यामुळे त्यांची प्रतिमा कंपनीच्या ब्रँडशी घट्ट जोडली गेली.
त्याचा फायदा असा झाला की, लोकांत अत्यंत आपुलकीची भावना निर्माण करणाऱ्या ब्रँड ॲम्बेसेडर्सपैकी ते एक ठरले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे या ब्रँडला एक वेगळी ओळख मिळाली. स्वत:च्या ब्रँडचं इतकं उत्तम ब्रँडिंग करणारा दुसरा कोणताही सीईओ नसावा. ‘माझे मसाले मीच विकेन, त्यासाठी शाहरुख किंवा अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेचा मी फायदा का बरं घ्यावा?’ हे त्यांचे विचार खूप काही सांगून जातात; त्यामुळे एमडीएच मसाल्यांच्या जाहिरातीची जिंगल, ‘असली मसाले सच सच, एमडीएच एमडीएच’ जितकी आपल्या ओठांवर रुळली तितकेच ते पिळदार मिशांचे आजोबा घराघरांत लोकप्रिय झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी, २०१७ मध्ये धर्मपाल गुलाटी हे भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे एफएमसीजी क्षेत्रातील महत्त्वाचे सीईओ होते. त्या आर्थिक वर्षात त्यांना सुमारे २१ कोटी रुपये इतके वेतन मिळाले होते. आज हा व्यवसाय प्रचंड विस्तारला आहे. त्यांची ६२ प्रकारची उत्पादने १५० हून अधिक वेगवेगळ्या पॅकेजिंग प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. एकूण बाजारपेठेच्या १२% भाग व्यापणारा हा भारतातील दुसरा सर्वांत मोठा मसाला ब्रँड आहे.
मसाल्यांच्या तिखटपणासोबतच प्रतिमेचा गोडवा जपणारा हा ब्रँड म्हणूनच अगदी हटके वेगळा ठरतो.
रश्मी वारंग
rjrashmiwarang@gmail.com
Read About : Yamashita’s Gold : यामाशिताचा खजिना
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.