Ad Advertisement Ad Advertisement

Ghee on Rice Benefits – भातावर तूप का घ्यावं?

Ghee on Rice Benefits : गरमागरम पांढराशुभ्र भात, त्याच्यावर वरण घ्या, सांबार घ्या नाही तर दाल तडका घ्या. त्या सर्वावर तुपाची धार सोडल्याशिवाय त्याचं पूर्णान्नात रुपांतर होत नाही, घास घशाखाली उतरत नाही. वास्तविक आपल्या देशात गावागावागणिक खाद्यसंस्कृती बदलत जाते. आज काही प्रमाणात जागतिकीकरण झालं असल्यामुळं इतर संस्कृतीतले खाद्यपदार्थ किंवा ते खाण्याची पद्धत अंगीकारण्याची सवय लागते हे खरं. तरीही पारंपरिक जेवण म्हटलं की भातावर तूप घेण्याची प्रथा आवर्जून सगळीकडे पाळली जाते.

सहाजिकच मनात प्रश्न उमटतोच, असं का? भातावर तूप का घ्यायचं? कोणी म्हणेल की त्यामुळं त्या भाताची लज्जत वाढते. कोणी म्हणेल की भातावर तूप घातल्याक्षणी त्यातून दरवळणारा गंध नाकपुड्यांनाच सुखावत नाही तर भूकही चाळवतो. नाही तरी आपण कोणत्याही पदार्थाचं भक्षण करतो त्यात जीभ महत्त्वाची भूमिका बजावत असली तर डोळे आणि नाक यांचा सहभागही तितकाच मोलाचा असतो. एखाद्या पदार्थाचं रूप डोळ्यांना रुचलं नाही तर तो खाण्याची इच्छा होत नाही. तसंच त्याला जर चित्तवृत्ती चाळवणारा गंध नसेल तर तोही जिभेवर ठेवावासा वाटत नाही. तेव्हा भातावरच्या तुपाचा गंध मोहवतो यात नवल नाही.

याचा अर्थ भातावर आपण तूप घेतो ते केवळ त्याचा स्वाद वाढतो म्हणून? अजिबात नाही. म्हणजे ते एक कारण असेलही, नाही आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे ते तसं केल्यानं त्या भाताचं पौष्टिक मूल्य वाढतं हेच आहे, असं आता वैज्ञानिकच सांगत आहेत. एके काळी तेलकट, तूपकट पदार्थ आरोग्याला हानिकारक असतात असं सांगितलं जात होतं. त्यामुळं रोजच्या आहारातून त्यांना वगळण्याचाच सल्ला दिला जात होता. आता मात्र संशोधनानंतर तुपाबाबतीत वेगळा विचार करायला हवा असंच वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, म्हणजेच त्याचं सेवन केल्यानं रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं हे दिसून आलं आहे. कारण त्यात मुख्यत्वे शर्करायुक्त कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. पण, त्यात तूप मिसळलं की त्याच्या पचनाचा वेग मंदावतो. परिणामी, जठरातून रक्तात साखर हळूहळूच वितरित केली जाते. म्हणजे भात खाऊनही मधुमेहाला आमंत्रण देण्याची शक्यता मंदावते.

अमेरिकेतल्या डॉक्टरांनी यासाठी मधुमेहाची लागण झालेल्या १०५ जणांवर प्रत्यक्ष प्रयोगच केले. तेही तब्बल तीन महिने. हे भातावर तूप घेत नसत. त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण मोजलं गेलं. त्यांना भातावर तूप घेण्याची सवय लावली. त्यानंतर त्यांच्यापैकी जवळजवळ ८७ टक्के रुग्णांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण लक्षणीयरीत्या घसरलेलं दिसून आलं. आपल्याकडेही आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांची सांगड घालण्याचे प्रयत्न करणाऱ्या डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी हृदयविकारानं ग्रस्त रुग्णांची अशीच निरीक्षणं घेतली. त्यानंतर त्यांनी अशा मंडळींना रोजच्या जेवणात चमचाभर तूप घेण्याचाच सल्ला दिला. मात्र ते तूप शुद्ध लोणकढं असायला हवं, यावर त्यांचा कटाक्ष होता.

तूप आणि तेल दोन्हींमध्ये अपायकारक सॅच्युरेटेड फॅट्स असले तरी या दोन्हींमध्ये फरक आहे. तूप हे दुधापासून तयार होतं. तेल मात्र बव्हंशी निरनिराळ्या वनस्पतींपासून मिळवलं जातं. सहाजिकच तुपात या फॅट्सबरोबर इतर स्निग्द्ध आम्लंही असतात. खास करून त्यात ब्युटायरेट असतं. ते पोषक तर आहेच, पण विशेष करून जठर आणि आतडी या पचनसंस्थेच्या मुख्य घटकांच्या पेशींच्या बाह्य आवरणाचं संरक्षण करण्यासाठीही आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त अनेक जीवनसत्वंही असतात, त्यामुळं केवळ फॅट्सवर लक्ष देऊन त्याला वगळणं योग्य नाही असंच वैज्ञानिकांना आढळलं आहे. आयुर्वेदानुसार तर मर्यादित प्रमाणात तुपाचा समावेश आहारात केल्यानं आकलनक्षमता, पचन, पोषण आणि पुनर्जीवन यांना मदत होते. जखमा लवकर भरून येण्यासाठी तसंच त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठीही त्याची मदत होते.
आपण बहुतांशी शाकाहारी आहोत. मांसाहारी मंडळीही प्रत्येक जेवणात मांस किंवा मच्छीचा समावेश सहसा करत नाहीत आणि असे पदार्थ असले तरी भाजी आणि डाळी असतातच. या वनस्पतींपासून मिळणारे पोषणघटक तसंच काही जीवनसत्वं ही स्निग्धमय पदार्थांमध्येच विरघळतात, पाण्यात नाही. याचा अर्थ असा की, शरीराकडून त्यांचं शोषण होण्यासाठी त्यांना अशी तुपासारख्या मध्यस्थाची गरज असतेच आणि त्यांचं व्यवस्थित शोषणच झालं नाही तर मग त्यांच्यापासूनची पोषणमूल्यं कशी मिळावीत!

भाताबरोबर जर गाजर, पालक, भोपळा किंवा पालेभाज्या असतील तर त्यावर चमचाभर तूप घेतल्यानं या भाज्यांमधील ए, ई, के ही जीवनसत्वं आणि कॅरोटिनाईड्ससारखी पोषण तत्वं शरीराला मिळण्याचं प्रमाण आणि वेग वाढतो असंच दिसून आलं आहे. भात, डाळीची आमटी, भाजी आणि थोडंसं तूप यांनी भरलेली आपली थाळी, हे परिपूर्ण जेवण असल्याचंच येल विद्यापीठातील याओ यांनी स्पष्ट केलं आहे. भातावर तुपाची धार पडल्यानंतर आता सुग्रास अन्न मिळणार आहे, अशी नांदी पिटणारा जो गंध दरवळतो त्याचाही वेध घेतला गेला आहे. तूप थेट तव्यावर पडत नाही, त्यामुळं त्याला जोमदार उष्णता मिळत नाही; उलटपक्षी गरम भाताशी त्याचा संपर्क आला की त्या भातातून त्याला हलकेच उष्णता मिळत जाते. तसं झालं की त्या तुपातल्या गंधित रसायनांना वाट फुटते. ती हवेत सहज उडून जाणारी असल्यामुळं इतस्तत: पसरायला सुरुवात होते. जसजशी अधिक उष्णता मिळत जाते तसतसा त्यांना बहर येतो आणि चमचाभर तुपानंही सगळ्या थाळीचं स्वरूपच बदलून जातं. पहिला घास जिभेवर पडण्यापूर्वीच भोजनानंदानं अंगावर सुखाच्या लहरी उमटू लागतात. मग तो भात खाणं म्हणजे नुसतंच उदरभरण न होता त्याला यज्ञकर्माची कळा नकळत येते.

आयुर्वेदात तर स्पष्टच सांगितलं आहे की, तूप पचनक्रियेला आवश्यक असलेल्या अग्निला चालना देतं. त्यापायी पचन सुलभ होतं आणि शरीराला पोषक द्रव्यं मिळण्याची वाट सुकर होते. त्यापायीच तुपाला आयुर्वेदानं औषधी दर्जा बहाल केला आहे. पण, याचा अर्थ ते भरपेट ओरपावं असा होत नाही. माफक प्रमाणातच त्याचं सेवन करायला हवं. औषध आपण प्रमाणातच घेतो. ते कितीही आरोग्यदायी असलं तरी एका वेळी एकच गोळी किंवा चमचाभर द्रवच पोटात घेतो. तेच तुपाबाबतीतही खरं आहे. तेव्हा यापुढं जेव्हा गरम भाताचा घास घेण्यापूर्वी त्याच्यावर तुपाची धार सोडाल तेव्हा अपराधी वाटण्याचं मुळीच कारण नाही. उलट आपण त्या अन्नाचा स्वाद आणि पोषणमूल्यं दोन्ही वाढवतच आहोत याची खात्री बाळगा.

डॉ. बाळ फोंडके
balphondke@gmail.com

Read About : Yamashita’s Gold : यामाशिताचा खजिना

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.