Ad Advertisement Ad Advertisement

Manoj Jarange Demands SIT Probe into Audio Clip Row- ‘त्या’ ऑडिओ क्लिपचा सर्वच पक्षांना धोका!

मनोज जरांगे पाटील यांचा रामदास कदम यांच्यावर निशाणा; एसआयटी चौकशीची मागणी

Manoj Jarange Demands SIT Probe into Audio Clip Row :वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत काही ऑडिओ क्लिप समोर आणल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमधील कथित संभाषणावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘या प्रकरणामागे मोठा कट असून, त्याचा धोका सर्वच राजकीय पक्षांना आहे,’ असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

या प्रकरणाची सखोल चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे नाव या प्रकरणात आले असेल, तर शिंदे यांनी भाजपला याबाबत जाब विचारला पाहिजे. भाजपने पैसे दिले असतील, तर त्यांनी शिंदे यांना त्याची माहिती द्यावी. या प्रकरणाच्या खोलात जाऊन सत्य बाहेर आणण्याची गरज आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. ते अंकुशनगर येथील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.

रामदास कदम यांना तारीख कशी माहीत?

शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीवर आपण दाखवलेल्या ऑडिओ क्लिपची तारीख सांगितल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. ‘या क्लिपची तारीख कदम यांना आधीच कशी माहीत झाली? त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली कशी?’ असा सवाल त्यांनी केला. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझे सांगणे आहे की, जवळचे लोकच कधीकधी धोकादायक ठरतात. माझ्यासोबत असलेल्या अनेक लोकांना फोडण्यात आले. त्या अनुभवातून मी हे सांगत आहे,’ असेही जरांगे पाटील म्हणाले.

सिरपच्या आरोपावरून पलटवार

जरांगे पाटील यांनी कथितरीत्या ५०० कोटी रुपये घेतल्याचा दावा असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले. त्यानंतर रामदास कदम यांनी जरांगे पाटील आंदोलनादरम्यान झोपण्यासाठी कफ सिरप घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत काही छायाचित्रेही दाखवली होती. या आरोपांना प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी कदम यांच्यावर टीका केली. ‘तुम्हीच ती बाटली पिऊन पाहा, म्हणजे ती कशाची आहे हे कळेल. तुमच्याकडे बार आहेत; त्याची चव तुम्हालाच कळते,’ अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला. ‘क्लिपची तारीख तुम्हाला कशी माहीत झाली, याचे उत्तर द्यावे. क्लिप व्हायरल कशी झाली, याची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी करावी.

‘क्लिपचा स्रोत सांगणार नाही’

या ऑडिओ क्लिपचा स्रोत उघड करणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘ही क्लिप मला कोणी दिली, हे मी सांगणार नाही. या प्रकरणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. सरकारने आपल्या पक्षातील नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये. ही बाब समोर आली आहे, हे महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले.

क्लिप एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केल्याचा दावा फेटाळताना जरांगे पाटील म्हणाले की, अशा प्रकारची क्लिप तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तींचे आवाज ओळखीचे असणे आवश्यक आहे. एक-दोन व्यक्तींच्या आवाजाची नक्कल करणे शक्य असले, तरी क्लिपमध्ये अनेक व्यक्तींचे आवाज असल्याने ती एआयच्या माध्यमातून तयार केल्याचा दावा तपासला पाहिजे. हे संभाषण मूळ असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुंबई ते दिल्लीपर्यंत धागेदोरे?

या कथित कटाचे धागेदोरे मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचलेले असण्याची शक्यता जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान वरिष्ठ राजकीय नेते आणि मंत्र्यांकडून दबाव येण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे. या पथकाला कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे तपास करण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने निष्पक्ष तपास सुरू केल्यास आपण स्वत: तपासात पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाहीही जरांगे पाटील यांनी दिली.

Read About : Manoj Jarange audio clip controversy- जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.