आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा : ३० सुवर्णसोबत ११४ पदकांची कमाई
India’s Historic 114-Medal Haul at the Asian Para Games : नागोया : भारताच्या पॅरा-ॲथलीट्सनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पदकांचे शतक साजरे केले. शनिवारी होणाऱ्या समारोप सोहळ्याअगोदर भारताने ३० सुवर्णपदकांसह एकूण ११४ पदकांची भरमसाठ कमाई केली. बॅडमिंटनपटू, तिरंदाज, जलतरणपटू आणि नेमबाजांनी अंतिम दिवसातील पदकसंख्येत भर घालण्यासाठी आपले विशेष योगदान दिले. भारताच्या पॅरा खेळाडूंनी ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य पदकांसह स्पर्धेचा समारोप केला.
आपल्या मोहिमेच्या शेवटच्या दिवशी, भारताने शुक्रवारी ९ सुवर्णपदके पटकावली. भारत सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, परंतु शनिवारी काही स्पर्धांचे अंतिम सामने होणार असल्याने आणि त्यापैकी कोणत्याही स्पर्धेत भारताचा सहभाग नसल्याने, या स्थानात बदल होऊ शकतो.
बॅडमिंटनपटूंची मोहीम यशस्वी
आशियाई पॅरा गेम्स बॅडमिंटनमध्ये शुक्रवार भारतासाठी एक उत्तम दिवस ठरला, कारण पॅरिस पॅरालिम्पिक चॅम्पियन नितेश कुमार आणि नवीन शिवकुमार यांनी पुरुष एकेरी एसएल३ आणि एसएल४ मध्ये सुवर्णपदके जिंकली, तर थुलासिमती मुरुगेसन आणि मानसी जोशी यांनी महिला दुहेरी एसएल३ आणि एसयू५ मध्ये सुवर्णपदक पटकावले. अशाप्रकारे भारताने तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि आठ कांस्य पदकांसह एकूण १६ पदकांसह आपली मोहीम पूर्ण केली.
संदीप, हानीच्या सुवर्णला विश्वविक्रमाचे कोंदण
संदीप आणि हानी या खेळाडूंनी शुक्रवारी पुरुषांच्या ४०० मीटर टी ६४ अंतिम फेरी आणि पुरुषांच्या भालाफेक एफ ३७/३८ प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्णपदकांची ऐतिहासिक कमाई केली. संदीपने ५२.२८ सेकंदांच्या विश्वविक्रमी वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर अजय कुमारने ४०० मीटर टी ६४ प्रकारात (५३.६१ सेकंद) विश्वविक्रमासह कांस्य पदक पटकावले. भालाफेक एफ ३७/३८ प्रकारात, हानीने ६०.४९ मीटरच्या (रझा मार्क १११६) विश्वविक्रमी वेळेसह सुवर्णपदक जिंकले. इराणच्या होर्मोझ एस.ने ५०.६८ मीटर भालाफेकीसह (रझा गुण १०१९) रौप्य पदक, तर चीनच्या यू चेंगजीने ५३.६६ मीटरसह (रझा गुण ९४३) कांस्य पदक आपल्या नावावर केले.
हिमांशूची कांस्य पदकांची हॅट्ट्रिक
पॅरा जलतरणपटू हिमांशू नंदालने पुरुषांच्या १०० मीटर फ्रीस्टाईल एस११ प्रकारात कांस्य पदक जिंकून पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. यामुळे भारतीय पॅरा जलतरणपटूंनी आपली मोहीम एकूण ११ पदकांसह पूर्ण केली. मागील स्पर्धेत जिंकलेल्या एका कांस्य पदकाच्या तुलनेत यंदा ही एक लक्षणीय सुधारणा आहे. भारतीय जलतरणपटूंनी यावर्षी ३ रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली. यामध्ये हिमांशू नंदाल आणि रवि बुडिगिना यांना प्रत्येकी तीन पदकांचा समावेश आहे. ऑप्टिक नर्व्हमधील दोषामुळे जन्मत: अंध असलेल्या या २२ वर्षीय खेळाडूने १ मिनिट ५.९० सेकंद अशी वेळ नोंदवली. हिमांशूने यापूर्वी पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईल आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक एस११ प्रकारात कांस्य पदके जिंकली होती. या गेम्समध्ये तीन पदकांसह त्याने आपला देशबांधव रवि बुडिगिनाच्या विक्रमाची बरोबरी केली. रविने दोन रौप्य आणि एक कांस्य पदकासह एकूण तीन पदके जिंकली आहेत.
समारोप सोहळ्यात मोना, निषाद ध्वजवाहक
पॅरा नेमबाज मोना अग्रवाल आणि पॅरा ॲथलीट निषाद कुमार यांची शनिवारी होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोघांनीही या खेळांमध्ये प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. ३८ वर्षीय मोनाच्या नावावर या खेळांमधील विक्रम आहे. वयाच्या नवव्या महिन्यांत पोलिओमुळे तिचे दोन्ही पाय बाधित झाले. यामुळे तिला व्हीलचेअरवर अवलंबून राहावे लागले. तिने प्रथम महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच१ प्रकारात सुवर्णपदक जिंकून खेळांचा विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच१ प्रकारात विश्वविक्रम मोडत सुवर्णपदकावर नाव कोरले. निषादला वयाच्या सहाव्या वर्षी हिमाचल प्रदेशातील आपल्या शेतात लॉन मॉवरची धडक बसल्याने उजवा हात गमावावा लागला.
क्लब थ्रोमध्ये : सुवर्णसोबत कांस्य पदक
प्रणव सुरमाने पुरुषांच्या क्लब थ्रो एफ५१ प्रकारात सुवर्णपदक, तर धर्मवीरने त्याच प्रकारात कांस्य पदक पटकावले. सुरमाने ३२.८७ मीटर अंतरासह क्रीडा स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित करत, मागील स्पर्धेतील आपल्या सुवर्णपदकाचे यशस्वीपणे रक्षण केले. त्याने २०२४ पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये रौप्य पदक जिंकले होते. धर्मवीरने २७.७१ मीटरच्या कामगिरीसह कांस्य पदक आपल्या नावे केले.
भालाफेकीत तिहेरी पदक कमाई
तारांकित पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिलने पुरुषांच्या एफ ४२-४४/६१-६४ संयुक्त प्रकारात आपले सुवर्णपदक राखले. दोन वेळचा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि विश्वविक्रमधारक असलेल्या २८ वर्षीय सुमितने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ७२.४६ मीटरपर्यंत भाला फेकला. एफ४२ गटात महेंद्र गुर्जरने (५९.०३ मीटर) रौप्य पदक आणि एफ४४ गटात स्पर्धा करणाऱ्या संदीप संजय सरगरने (६४.४८ मीटर) कांस्य पदक पटकावले.
Read About : Asian Games 2026 : ट्रीसा-गायत्रीचा वर्ल्ड नंबर-3 जोडीला धक्का
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.