Ad Advertisement Ad Advertisement

China border tensions in Arunachal Pradesh- चीनच्या कुरापती सुरूच !

अरुणाचल प्रदेशमध्ये गडबड; परराष्ट्र खात्याकडून दखल

China border tensions in Arunachal Pradesh – नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात भारतीय जवान आणि चिनी सैनिक आमने-सामने येण्याचे प्रकार अलीकडील काळातही सुरूच असल्याची स्पष्टोक्ती इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाचे महासंचालक शत्रुजित कपूर यांनी दिल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे. शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भूतकाळातील अनुभव लक्षात घेता, जेव्हा जेव्हा चिनी सैन्य त्यांच्या ठरलेल्या गस्तीच्या मार्गापासून भरकटते, तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बिघडते.


आयटीबीपीचे महासंचालक शत्रुजित कपूर यांनी गुरुवारी म्हटले होते की, अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागांत चिनी सैन्यासोबत संघर्ष सुरूच आहे. त्यावर विचारणा केली असता, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल शुक्रवारी म्हणाले, ‘याबाबतची विशिष्ट माहिती संरक्षण खातेच देऊ शकते. पण भूतकाळात आपण तसा अनुभव घेतला आहे.

दोन्ही बाजू आपापसातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा चुकीचा अंदाज टाळण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या राजनैतिक आणि लष्करी यंत्रणांचा वापर करत आहेत.’ त्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत आपापल्या क्षेत्रांत अधिक स्पष्टता आणण्यावर चर्चा करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे. जेणेकरून तेथील स्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येईल. सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे, असेही भारताने स्पष्ट केले आहे.

‘ड्रोन प्लॅटून’ तैनात

गुरुवारी राजस्थानमधील अलवर येथे बोलताना, आयटीबीपी महासंचालकांनी नमूद केले होते की, त्यांच्या दलाने सर्व सीमा युनिट्समध्ये ‘ड्रोन प्लॅटून’ तैनात केले आहेत. तसेच गलवानसारख्या संघर्षांना अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्यांनी एक नवीन ‘स्ट्राइक’ प्रशिक्षण अभ्यासक्रमही तयार केला आहे.

पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावे

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत, या विषयावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. खरगे म्हणाले, अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्यासोबत संघर्ष सुरू असल्याचे आयटीबीपी महासंचालकांनी मान्य करणे अत्यंत चिंताजनक आहे. डोकलाम आणि गलवाननंतर, आता आणखी एक गंभीर संघर्ष उभा राहत आहे का? ऑगस्ट महिन्यात तक्सिंगजवळ चिनी घुसखोरी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

वाचा-दमाई येथे कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चा होऊन ४७ दिवस उलटले आहेत. ही ठिकाणे अवघ्या १८० किमी अंतरावर आहेत, तरीही संघर्ष सुरूच आहे. भारताच्या गस्त घालण्याच्या अधिकारांवर गदा आली आहे का, असे प्रश्न त्यांनी विचारले. पंतप्रधानांनी या विषयावर संसदेत निवेदन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Read About : Starlink Speed Limit on Ukraine : स्टारलिंकच्या निर्बंधांमुळे युद्धाचे पारडे रशियाकडे झुकणार?

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.