Ad Advertisement Ad Advertisement

AI agents cybersecurity India Confidential Data Breach – ते आले, ते घुसले अन् गोपनीय माहिती वाचून गेले

एआय एजंट्सची घुसखोरी : भारतीय कंपन्यांना कुणकुणही नाही

नवी दिल्ली : AI agents cybersecurity India Confidential Data Breach – खुल्या इंटरनेट चाचणीदरम्यान एआय एजंट्सनी भारतीय प्रणालीत घुसखोरी करून वैयक्तिक व गोपनीय माहितीचा समावेश असलेल्या व्यावसायिक नोंदी वाचल्याचे भारताच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा यंत्रणेने म्हणजे सीईआरटी-इनने म्हटले आहे. या एजंट्सनी ज्या कंपन्यांच्या प्रणालीला सुरुंग लावला त्यांना याची कुणकुणही लागलेली नव्हती, हे विशेष.
संशोधन आणि चाचणीदरम्यान एआय एजंट्सनी ठरवून दिलेल्या कामाच्या मर्यादा ओलांडल्याचे अंतर्गत पाहणीत समोर आल्यानंतर एआय मॉडेल्स विकसित करणाऱ्या कंपन्यांनी स्वत:हून याची माहिती दिली, असे सीईआरटी-इनने स्पष्ट केले आहे.

सामान्यत: कोणत्याही नवीन एआय प्रणालीची चाचणी ही अत्यंत सुरक्षित आणि बंदिस्त अशा प्रयोगशाळेत केली जाते. तिथे एआयचा बाहेरील जगाशी संपर्क ठेवला जात नाही. परंतु, या एआय मॉडेल्स तयार करणाऱ्या कंपन्यांचे एजंट्स संशोधन व मूल्यांकनासाठी इंटरनेटवर कार्यरत होते. या एजंट्सना विशष्टि कामे दिली होती. ती करण्यासाठी इंटरनेटवर फिरत असताना त्यांना काही भारतीय कंपन्यांचे डिजिटल दरवाजे उघडे दिसले; त्यांचा वापर करून त्यांनी त्या प्रणालीत घुसखोरी केली.

या एजंट्सना काम पूर्ण करायचे होते; पण त्यांनी नेमून दिलेल्या कामाच्या चौकटीबाहेर जाऊन कंपन्यांच्या प्रणालीत घुसखोरी केली. त्यांनी एखाद्या मानवी हॅकरप्रमाणेच काम केले; पण चोरीच्या उद्देशाने नाही, तर केवळ दिलेले काम पूर्ण करण्यासाठी. म्हणजे काम हॅकरसारखेच, पण उद्देश हॅकरसारखा नाही. त्यांनी वैयक्तिक व गोपनीय माहितीचा समावेश असलेल्या व्यावसायिक नोंदी वाचल्या. या माहितीचे नेमके स्वरूप काय होते, याबाबत सीईआरटी-इनने तपशील दिलेला नाही.

ज्या भारतीय कंपन्यांच्या प्रणालीत ही घुसखोरी झाली, त्यांना याचा सुगावा लागलेला नव्हता. एआय बनवणाऱ्या विकासकांनी जेव्हा स्वत:च्या कामाची तपासणी केली, तेव्हा ही बाब उघड झाली आणि त्यांनी भारत सरकारला याची माहिती दिली.

सायबर गुन्हेगारांचे बळ वाढले

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सीईआरटी-इनने एका मोठ्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. आर्थिक फायद्यासाठी डिजिटल चोऱ्या करणारे हॅकर्स आता याच एआय एजंट्सचा गैरवापर करत आहेत. पूर्वी एखाद्या प्रणालीतील त्रुटी शोधून हॅकिंग करायला त्यांना काही दिवस लागायचे. आता ते एआयच्या माध्यमातून अवघ्या काही तासांत कोणत्याही प्रणालीवर आपोआप हल्ला करू शकतात. यामुळे सुरक्षेच्या नेहमीच्या यंत्रणांना सावरण्याची संधीच मिळत नाही.

सायबर एजन्सीने सुचवले उपाय

या प्रकारानंतर भारताच्या सायबर सुरक्षा यंत्रणेने एआयची कोणतीही चाचणी थेट इंटरनेटवर न घेता पूर्णपणे सुरक्षित व नियंत्रित वातावरणातच घ्यावी, अशा सुचना एआय विकसकांना (डेव्हलपर्स) दल्यिा आहेत. एआय एजंटने कोणत्याही बाह्य प्रणालीशी संपर्क साधला, तिसऱ्या पक्षाचे क्रेडेन्शियल शोधले किंवा वापरले, तर चाचणी स्वयंचलितपणे थांबवावी. त्याचबरोबर कंपन्यांनी आपल्या फाइल्स, कोड आणि सर्व्हरचे नियमित स्कॅनिंग करून उघडे राहणारे पासवर्ड्स त्वरित सुरक्षित करावेत, अशी सूचना सीईआरटी-इनने केली आहे.

आवो जावो घर तुम्हारा भोवले

एआय एजंट्सनी केलेले हे हायटेक हँकिंग नव्हते. एआय एजंटची घुसखोरी म्हटले की, काहीतरी खूप गुंतागुंतीचे तंत्रज्ञान वापरून प्रणाली हॅक केली असेल, असे आपणास वाटते. पण, तसे झालेले नाही. हे उघड्या राहिलेल्या घरात चोर घुसण्यासारखे होते. कोडमध्ये उघडे ठेवलेले पासवर्ड्स यासारख्या साध्या आणि नेहमीच्या डीजिटल चुका एआय एजंट्सनी हेरल्या. विकासक काम सोपे व्हावे म्हणून अनेकदा संगणकाच्या कोडमध्ये पासवर्ड लिहून ठेवतात आणि चुकून ते इंटरनेटवर उघडे राहतात. असे पासवर्ड्स एआय एजंट्सनी शोधून काढले.

पासवर्ड्सप्रमाणे डिजिटल कीज्ही त्यांच्या उपयोगी पडल्या. दोन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एपीआय कीज् लागतात. त्या उघड्या राहल्यिामुळे एआयच्या हाती लागल्या. तसेच या कंपन्यांनी सर्व्हरच्या परवानग्या खूप सैल ठेवल्या होत्या. त्यामुळे आत शिरल्यानंतर एआयला सर्व फाईल्स वाचता आल्या. याशिवाय कंपन्यांचे काही मुख्य कंट्रोल पॅनेल इंटरनेटवर दुर्बल क्रेडेन्शियल्ससह किंवा मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशनशिवाय खुले होते. त्याचाही फायदा या एजंट्सनी घेतला.

Read About : AI Impact on Indian Students- एआयमुळे गती वाढली मात्र सखोल ज्ञानाचा अभाव!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.