Ad Advertisement Ad Advertisement

WASP-17b Atmosphere : जेम्स वेब टेलिस्कोपने उलगडले परग्रहाच्या वातावरणाचे त्रिमितीय रहस्य

नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने परग्रहाच्या वातावरणातील असमान विस्तार टिपला; ग्रहाच्या दिवस, रात्रीच्या बाजूतील तापमान व वाऱ्यांचा परिणाम अधिक स्पष्ट

वॉशिंग्टन : WASP-17b Atmosphere नासाच्या जेम्स वेब वेधशाळेने (स्पेस टेलिस्कोप) पृथ्वीपासून सुमारे १,३०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘वास्प-१७ बी’ या परग्रहाच्या वातावरणात असमान फुगवटा असल्याचे शोधले आहे. ग्रहाचा एकूण आकार साधारण गोलाकार असला, तरी त्याच्या वातावरणाचा एका बाजूचा विस्तार दुसऱ्या बाजूपेक्षा अधिक आहे.

‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रकाशित संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. ‘वास्प-१७ बी’ हा ‘हॉट ज्युपिटर’ प्रकारातील महाकाय वायूचा ग्रह आहे. तो आपल्या ताऱ्याच्या जवळ असल्याने त्याच्या एका बाजूला कायम प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला अंधार असतो. ग्रहावरील प्रचंड वेगाचे वारे उष्ण वायू दिवसाच्या बाजूकडून रात्रीच्या बाजूकडे वाहून नेतात. त्यामुळे संध्याकाळच्या बाजूचे वातावरण अधिक गरम होऊन बाहेरच्या दिशेने विस्तारते, तर सकाळच्या बाजूचे वातावरण तुलनेने थंड असते.

‘ट्रान्समिशन स्ट्रग्सिं’ तंत्रज्ञानाचा वापर

अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ आणि ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधकांनी ‘ट्रान्समिशन स्ट्रग्सिं’ या नव्या तंत्राचा वापर केला. ग्रह आपल्या ताऱ्यासमोरून जाताना त्याच्या वातावरणातून आरपार जाणाऱ्या प्रकाशाचे विश्लेषण करण्यात आले. यामुळे वातावरणाच्या वेगवेगळ्या भागांची उंची, रासायनिक रचना आणि तापमानातील फरक तपासणे शक्य झाले.

संगणकीय अंदाजांना संशोधनातून पुष्टी

प्रमुख संशोधक डॉ. लिली ॲल्डरसन यांच्या मते, प्रत्यक्ष निरीक्षणांनी ग्रहांच्या त्रिमितीय स्वरूपाबाबतचे सैद्धांतिक अंदाज योग्य असल्याचे स्पष्ट झाले. सहसंशोधक डॉ. हॅना वेकफोर्ड यांनीही या निष्कर्षांमधून दूरच्या ग्रहांवरील गुंतागुंतीच्या वातावरणीय प्रक्रियांची माहिती मिळत असल्याचे नमूद केले.

परग्रहांवरील हवामानाचा अभ्यास सोपा होणार?

आतापर्यंत अनेक ग्रहांच्या वातावरणाची एकत्रित सरासरी माहितीच मिळत होती. नव्या तंत्रामुळे वेगवेगळ्या भागांतील परिस्थिती स्वतंत्रपणे अभ्यासता येईल. भविष्यात याचा वापर इतर परग्रहांवरील वारे, तापमान आणि हवामानाचे स्वरूप समजून घेण्यासाठी होऊ शकतो. आतापर्यंत ६,००० हून अधिक परग्रहांची पुष्टी झाली असून, हे संशोधन त्यांच्या वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी नवी दिशा देणारे ठरू शकते.

Read About : Nanodiamonds from Plastic : शक्तिशाली लेझरने सामान्य प्लास्टिकपासून बनवले अब्जावधी हिरे

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.