अखंड उड्डाणपूलासाठी एकही पूल पाडणार नाही
Shendra-Waluj Elevated Road छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शेंद्रा ते वाळूजपर्यंत उभारल्या जाणाऱ्या १८ किमी लांबीच्या अखंड उड्डाणपुलासाठी (एलिव्हेटेड रस्ता) ४,१५० कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाने एमएसआयडीसी राज्य सरकारला सादर केला आहे.
अखंड उड्डाणपुलाचे बांधकाम करताना सध्या अस्तिस्वात असलेले पाचही उड्डाणपूल पाडले जाणार नाहीत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेंद्रा ते वाळूज या अखंड उड्डाणपुलाची घोषणा केली होती. त्यानंतर ‘एमएसआयडीसी’ने दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडे याबाबतचा व्यवहार्यता अहवाल सादर केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४,१५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अखंड उड्डाणपुलामुळे जालना रोडवर अस्तिव्यात असलेल्या वसंतराव नाईक चौक, सेव्हन हिल, मोंढा नाका, क्रांती चौक आणि महावीर चौक या पाच उड्डाणपुलांबाबत पेच निर्माण झाला होता. हे पूल पाडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे पूल नव्या पुलाशी जोडले जाणार आहेत. जालना रोड हा पूर्णत: व्यावसायिक मार्ग असल्याने भूसंपादनासाठी मोठा खर्च लागणार होता. मात्र, उपलब्ध जागेतच पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने भूसंपादनाचा खर्च वाचणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
क्रांती चौकात केबल ब्रिज
अखंड उड्डाणपुलाचे काम करताना क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याबरोबरच परिसराचे सुशोभीकरण केले जाईल. पुतळ्याच्या दुतर्फा वरळी सी-लिंकच्या धर्तीवर ‘केबल स्टेड ब्रिज’ उभारला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. प्रस्ताव मंत्रिमंडळ पायाभूत विकास समितीकडे पाठवला जाईल. मंजुरी मिळताच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
Read About : Umed Mall Chhatrapati Sambhajinagar महिलांच्या उत्पादनांना मिळणार बाजारपेठ!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.