Nana Patekar Natsamrat : नाना पाटेकर आणि ‘नटसम्राट’चा सेट हे एक वेगळं समीकरणं होतं. मी तर म्हणेन असा ‘नटसम्राट’ पुन्हा होणे नाही. ‘नटसम्राट’ या चित्रपटात मला याचा प्रत्यय आला. स्वतंत्र कलादिग्दर्शन करत असताना माझ्याकडे जो चित्रपट आला तो म्हणजे ‘नटसम्राट.’ नानांची माझी पहिली भेट ‘आविष्कार’च्या एका नाटकात झाली. कॉलेजमध्ये असताना मी ते नाटक पाहिलं होतं. त्यात त्यांची छोटीशी भूमिका होती- विद्यार्थी म्हणून. पण त्या छोट्या भूमिकेतही त्यांचा तो खर्जातला, प्राध्यापकासारखा बोलणारा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय.
त्यानंतर १९९० मध्ये मी कलादिग्दर्शन या क्षेत्रात पदार्पण केलं. आधी अवांतर संस्थेत काम करत असताना ते नाटकात काम करायचे, मी त्यांना तेव्हापासून बघत आलोय. पुढे मी नितीन देसाई यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करायला लागलो आणि अनेक चित्रपटांच्या निमित्तानं त्यांची भेट झाली.
त्यांचा खरा सहवास लाभला तो २०१५ साली, ‘नटसम्राट’च्या निमित्ताने. या चित्रपटाचे कलादिग्दर्शन मी केले होते. या चित्रपटासाठी आम्ही दोन मुख्य सेट उभारले होते – एक म्हणजे जळलेले थिएटर आणि दुसरा म्हणजे कॉर्पोरेटरचा बंगला. हे दोन्ही सेट ‘नटसम्राट’ला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले.
या सेटवरचे नानांचे वावरणे हेच मोठे शिकण्यासारखे होते. ते स्वत: आर्टिस्ट आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची नेमकी तयारी त्यांना कळते. सेटवर आल्यावर एखादी गोष्ट कशी केली आहे, जुन्या काळात ते कसे असायचे हे ते बारकाईने पाहायचे. नाना कोणत्याही सेटवर गेले की तेथील चुका काढायचे; पण ‘नटसम्राट’च्या सेटबद्दल ते मला कधीही एका शब्दानेही बोलले नाहीत, उलट माझे भरपूर कौतुक केले. इतकेच नाही तर प्रसारमाध्यमांमध्ये बोलतानाही ते माझा आवर्जून उल्लेख करायचे – ‘हा एकनाथ कदम यांनी ‘नटसम्राट’चा सेट बनवला’ असे ते अभिमानाने सांगायचे.
नाना सेटवर आले की, त्या सेटला जिवंतपणा यायचा. त्यांचे १५-१५ मिनिटांचे संवाद ते एका टेकमध्ये म्हणायचे. शूटिंगच्या वेळी पूर्ण शांतता असायची. तो भारदस्त आवाज, विशेषत: क्लायमॅक्सचा शिरवाडकर आणि त्यांचे संवाद ऐकताना अंगावर काटा यायचा. त्यामुळे असा नटसम्राट पुन्हा होणे नाही, असे मला वाटते.
एकनाथ कदम
कलादिग्दर्शक
(शब्दांकन : संतोष काळे)
Read About : Nana Patekar Death : हृदयविकाराने मृत्यू, तरी MLC का नोंदवली? जाणून घ्या कायदा काय सांगतो
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.