Ad Advertisement Ad Advertisement

Meerut nurse murder case : लग्नाची गाठ, नव्हती नेहाच्या नशिबात

Meerut nurse murder case : उत्तर प्रदेशमधील मीरतच्या लोहियानगर भागातील एमसीसी हॉस्पिटलमध्ये १८ जुलै २०२६ रोजी एक खळबळजनक घटना घडली. हॉस्पिटलमधली परिचारिका नेहा सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आली होती, पण दुपारी तीनच्या सुमारास एक कर्मचारी काही कामासाठी तिच्या खोलीत गेला तेव्हा तिच्या तोंडातून फेस येत होता. त्याने घाबरून डॉक्टरांना कळवले. त्यांनी त्वरित उपचार सुरू केले पण काही क्षणांतच तिचे प्राणोत्क्रमण झाले.

Meerut nurse murder case :सगळे अचानक झाल्यामुळे डॉक्टर गोंधळात पडले. त्यांनी तिच्या नातेवाईकांना कळवले आणि त्याचबरोबर पोलिसांनादेखील अवगत केले. थोड्याच वेळात नेहाचे नातेवाईक आणि पोलिसांचे पथकदेखील तिथे हजर झाले. नेहाने विषप्राशन करून आत्महत्या केली किंवा तिला अन्नातून विषबाधा झाली असे सुरुवातीला वाटत होते. सकाळी ती कामावर आली तेव्हा तिला बरे वाटत नसल्याचे ती बोलली होती. पण, ज्या खोलीत ती बेशुद्धावस्थेत आढळली होती त्या खोलीची तपासणी आणि पंचनामा करताना पोलिसांना शिरेवाटे इंजेक्शन देण्याचे साहित्य, ग्लुकोजची एक बाटली वगैरे गोष्टींसह एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत नेहाने लिहिले होते की मी सासरच्या छळाला कंटाळून जीव देत आहे.

ही चिठ्ठी पाहिल्यावर गहजब झाला. नेहाचे नातेवाईक तिच्या सासरच्यांना अटक करायचा आग्रह धरू लागले. पण, सासरचे लोक चकित झाले. कारण नेहा आणि त्यांच्यात कुठलेच वाद नव्हते. त्यांनी आरोप केला की चिठ्ठीतले अक्षर नेहाचे नाही. रुग्णालयातल्या केसपेपर्स वगैरेवर उपलब्ध असलेले नेहाचे अक्षर पडताळल्यावर तिथेच सिद्ध झाले की ती चिठ्ठी बोगस आहे, म्हणजे हा खून होता. पोलिसांनी औपचारिक सोपस्कार पूर्ण करून मृतदेह विच्छेदनासाठी रवाना केला.

रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची तपासणी व चौकशी झाली. दुपारी नेहाच्या खोलीत नेहाबरोबर सुरेश आणि फरहान नावाचे कर्मचारी गेले होते आणि सुरेशच्या हातात ग्लोव्हज होते असे समजले. पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतले, पण त्यांनी चौकशीला दाद दिली नाही. पोलिसांनी चिकाटीने प्रयत्न चालू ठेवले. सुरेश, फरहान आणि नेहाचे कॉल रेकॉर्ड ताबडतोब मागवले तेव्हा आढळले की सुरेश आणि नेहामध्ये सतत फोन आणि व्हॉटसॲपवर संवाद चालू होते. सीसीटीव्हीमध्ये दिसत होते की सुरेश नेहाला घेऊन ओटीमध्ये गेला होता.

Meerut nurse murder case : सरतेशेवटी सुरेशची सहनशक्ती संपली. त्याने गुन्हा कबूल केला. सकाळपासून नेहाला बरे वाटत नव्हते. त्याने तिला सांगितले की तुला ग्लुकोज देतो, पण प्रत्यक्षात त्याने तिला शिरेवाटे भलतेच विषारी इंजेक्शन दिले होते. सुरेशने असे का केले? फरहानचा त्यात काय संबंध होता? नेहा एक गरीब घरातून आलेली सुशिक्षित मुलगी होती. काही वर्षांपूर्वी तिचे जातीतल्या रवी नावाच्या मुलाशी लग्न झाले होते. रवी सुतारकाम करून उदरनिर्वाह करीत होता, त्यामुळे दोघांच्या स्वभावात अंतर होते. लग्नानंतर लगेच त्यांना एक मुलगा झाला तरी त्यांचे मनोमीलन झाले नाही. रवीच्या आर्थिक परिस्थितीमुळे नेहालादेखील मनाविरुद्ध शेतमजुरी करावी लागली.

मुलगा झाल्यावर वर्षभरात, म्हणजे २०२५ साली रवीचा अचानक मृत्यू झाला. यानंतर नेहाने घरच्यांना न जुमानता जरा चांगली नोकरी शोधायला सुरुवात केली. लवकरच तिला एमएमसी हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी मिळाली. बऱ्यापैकी पगार आणि मनासारखे काम यामुळे नेहा खूश झाली. त्याच रुग्णालयात सुरेश टेक्निशियन म्हणून कामाला होता. तो देखील तरुण होता. नेहापेक्षा वयाने किंचित मोठा होता. दोघे रोज एकत्र काम करायचे, त्यामुळे त्यांच्यात मैत्री व्हायला वेळ लागला नाही. सुरेशचे लग्न झाले होते.

त्याला पाच वर्षांचा मुलगादेखील होता. नेहा विधवा होती, पण आधी झालेल्या लग्नातील पतीशी मनोमीलन कधी झाले नव्हते आणि आता तर तो हयात नव्हता. मानसिक आणि शारीरिक भूकेपोटी ती त्याच्याकडे आकृष्ट झाली. तिला त्याचा मानसिक आणि सांसारिक आधार हवा होता, त्यामुळे ती त्याला लीलया समर्पित झाली. दोघांनी सर्व बंधने ओलांडली. आता नेहाला वाटत होते की सुरेशने पत्नीला घटस्फोट द्यावा आणि आपल्याशी लग्न करावे.

सुरेश मात्र या मैत्रीकडे वेगळ्या नजरेने बघत होता. आपला भरला संसार सोडून नेहाबरोबर नव्याने प्रपंच थाटायची त्याची तयारी नव्हती. चार घटका जमेल तेवढी मौज करावी असे त्याचे विचार होते, त्यामुळे नेहाने लग्नाचा विषय काढला की तो टाळाटाळ करीत होता. कधी कधी चिडचिड करीत होता. नेहाने आता सतत त्याच्याकडे लग्नासाठी टुमणे लावायला सुरुवात केली होती.

Meerut nurse murder case : सुरेशने असे वागायला नको होते. पण, सुरुवातीला पाय घसरल्यावर त्याच्याकडून चुका झाल्या आणि त्याचा पाय आणखीन खोलात गेला. त्याने आपली समस्या फरहान नावाच्या मित्राला सांगितली. नेहाचा काटा कसा काढता येईल हे विचारले. तिचा खून केला तर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची आणि पोलिसांना कसे चकवायचे हे प्रश्न होते. यातून मार्ग काढण्यासाठी दोघेजण नियमितपणे क्राईम सीरियल्स बघू लागले. त्यातून एखादी आयडिया सुचेल अशी त्यांना आशा होती आणि मग त्यांनी आपला अमानुष बेत रचला. दिनांक १८ जुलै रोजी सकाळी नेहा कामावर आली तेव्हा तिला बरे वाटत नव्हते.

अशक्तपणा आला होता. दुपारी तिने सुरेशला हे सांगितल्यावर तो म्हणाला, तुला ग्लुकोज देतो म्हणजे बरे वाटेल. तिला घेऊन फरहान आणि तो ओटीमध्ये गेले. सुरेशने हातांवर ग्लोव्हज चढवले होते. त्याने नेहाला शिरेवाटे इंजेक्शनमधून ग्लुकोजऐवजी विषारी औषध दिले. शिवाय त्यानंतर सल्फास नावाच्या गोळ्या दिल्या. यानंतर तिला खोलीत सोडताना सुरेशने तिच्या नावे एक बोगस सुसाईड नोट लिहिली. त्यात लिहिले की सासरच्या छळामुळे मी आत्महत्या करीत आहे. चिठ्ठी तिथे ठेवून दोघे पसार झाले. पण, पोलिसांनी तात्काळ योग्य दिशेने तपास करून दोघांना चोवीस तासाच्या आत कोर्टासमोर हजर केले आणि दोघांची तुरुंगात रवानगी झाली.

विजय तरवडे

Read About : Lawrence Bishnoi gang and Indian underworld : अंडरवर्ल्डला वेळीच संपवायला हवं
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.