Ad Advertisement Ad Advertisement

Global health challenges by 2100 : नव्या आव्हानाच्या उंबरठ्यावर…

Global health challenges by 2100 : नैसर्गिक आपत्ती, युद्धखोरी, दुष्काळ, अतिवृष्टी, वादळे, बेरोजगारी, महागाईसारख्या असंख्य संकटांशी संघर्ष करताना मेटाकुटीला आलेल्या मानवजातीसमोर संकटांच्या नव्या मालिका निर्माण होण्याचे गंभीर संकेत आता मिळू लागले आहेत. जागतिक आरोग्याच्या पटावर सध्या अनेक दूरगामी बदल घडून येत आहेत. संसर्गजन्य रोगांवर मात करण्यात मानवाने वैद्यकीय शास्त्राच्या बळावर मोठी प्रगती केली असली तरी पुढच्या पाऊणशे वर्षांत, म्हणजे सन २१०० पर्यंत मानवजातीसमोर आरोग्याचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि दुहेरी संकट उभे ठाकणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ आणि प्रख्यात संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी या संदर्भात धोक्याची घंटा वाजवत एका गंभीर वास्तवाकडे जगाचे आणि विशेषत: भारताचे लक्ष वेधले आहे. हवामान बदल, स्थूलपणाचा वाढता विकार, प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंचा फैलाव आणि भविष्यात येणारे नवनवे जीवघेणे साथीचे आजार या चार धोक्यांची आव्हाने येत्या सात दशकांत मानवजातीसमोर उभी ठाकणार असल्याने, त्यांना सामोरे जाण्यासाठी तात्पुरत्या आणि अल्पकालीन उपाययोजना पुरेशा ठरणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. या संभाव्य संकटाचे धोके भविष्यात मानवी आरोग्याच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या करतीलच, पण त्यामुळे समाजव्यवस्थेची घडी विस्कटून जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडेदेखील मोडू शकेल, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केलेली असल्याने नव्या जीवनशैलीसमोरील ही आव्हाने उंबरठ्यावर दाखल होण्याआधीच सावध व्हावे लागणार आहे.

हवामान बदल हे नव्या आयोग्य समस्यांचे मुख्य कारण असेल, याबाबत आता जागतिक मतैक्य झाले आहे. येत्या अडीच दशकांत कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि उष्माघातामुळे वर्षागणिक होणाऱ्या मानवी मृत्यूंमध्ये तब्बल अडीच लाखांची भर पडेल असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. हवामान बदल आणि तापमानवाढीमुळे डासांची उत्पत्ती आणि त्यांचे आयुर्मानदेखील वाढत असल्याने डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारखे आजार पूर्वी कधीही न पोहोचलेल्या नवीन भौगोलिक भागात पसरत आहेत. याशिवाय, अवेळी पाऊस आणि दुष्काळामुळे अन्नाअभावी बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे, असाही जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे.

प्रतिजैविकांना दाद न देण्याची क्षमता असलेल्या जीवाणूंच्या विकासामुळे २०१९ च्या एकाच वर्षात जगभरात सुमारे १३ लाख लोकांचा मृत्यू झाला होता, असे लॅन्सेट या जागतिक प्रतिष्ठित वैद्यकीय मासिकाच्या एका अभ्यासात स्पष्ट झाले होते. योग्य वैद्यकीय सल्ला न घेताच होणारा प्रतिजैविकांचा वापर, पशुपालनात आणि शेतीमध्ये होणारा अतिवापर यामुळे जीवाणू आणि विषाणू औषधांना जुमानत नसल्याने येत्या काही वर्षांत प्रतिजैविकांचे उपचार निष्प्रभ ठरून वर्षाकाठी एक कोटींहून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत लोटले जातील अशी भीती आहे.

स्थूलपणासारख्या विकारांचा वाढता फैलाव याच गतीने सुरू राहिला तर येत्या दहा वर्षांत जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या, म्हणजे सुमारे चार अब्ज लोकसंख्या अतिवजन किंवा लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असेल. ही समस्या भारतात आजच चिंताजनक वेगाने वाढत आहे. बदलती जीवनशैली, शारीरिक श्रमाचा अभाव आणि अति-प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वाढता वापर यामुळे लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत लठ्ठपणाचा विकार वेगाने पसरत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयरोग, यकृताचे आजार आणि काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कित्येक पटीने वाढतो. शारीरिक क्षमता कमी होऊन उत्पादकता घटते आणि आरोग्यावरील खर्चाचा भार प्रचंड प्रमाणात वाढून अर्थव्यवस्थेचे आरोग्यदेखील ढासळू शकते.

कोविड महामारीच्या काळाने जगाला आरोग्य यंत्रणेची नाजूक अवस्था दाखवून दिली होती. परंतु, ती तर बहुधा आगामी आरोग्यसंकटांची केवळ एक पूर्वसूचना असावी. वाढती लोकसंख्या, बेसुमार जंगलतोड आणि मानवाचा निसर्गात होणारा वाढता हस्तक्षेप; यामुळे प्राण्यांमधून मानवात विषाणू पसरण्याचा धोका वाढला आहे. दरवर्षी नवनवीन विषाणूंचे उत्परिवर्तन होत असून ते मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्यास सक्षम होत आहेत. या बाबी लक्षात घेऊन येत्या पाच दशकांचे दीर्घकालीन नियोजन करणे, पायाभूत आरोग्य सुविधांचा पाया भक्कम करणे, संशोधनांची व्याप्ती वाढविणे, आरोग्य सेवांशी संबंधित यंत्रणांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, याबरोबरच आरोग्य धोरणाची पर्यावरण रक्षणाशी समंजस सांगड घालण्याची गरज या इशाऱ्याने अधोरेखित केली आहे.

एआयच्या माध्यमातून भविष्यातील आजारांच्या प्रसाराचा आणि वातावरणीय बदलांचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अचूक अंदाज बांधणे यापुढे शक्य आहे. भारतास जागतिक आरोग्य धोरण निश्चितीच्या मंचावर महत्त्वाची भूमिका बजावताना कोविड महामारीसारख्या संकटकाळातील अनुभवांची शिदोरी देशातील संभाव्य धोक्यांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरता येईल. कारण जागतिक आरोग्यरक्षणात भारताने आपले योगदान याआधीच सिद्ध केलेले आहे. ‘जगाचे औषधालय’ असलेल्या भारताने कोविड काळात लस निर्मिती आणि पुरवठ्यामध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्यामुळे भविष्याने संकेत दिलेल्या या संभाव्य संकटकाळास सामोरे जाण्यासाठी परवडणाऱ्या औषधांच्या निर्मितीमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत संशोधन क्षेत्रातही नेतृत्व करण्याची जबाबदारी भारतावर पडणार आहे.

अर्थात, भारतासाठी ही लढाई सोपी नाही. भारताला अजूनही क्षयरोग, मलेरिया, कुपोषण आणि अस्वच्छतेमुळे होणारे आजार यांसारख्या पारंपरिक समस्यांशी लढावे लागत आहे; तर दुसऱ्या बाजूला मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारखी आधुनिक आव्हाने समोर उभी आहेत. ही आव्हाने अचानक समोर आलेली नाहीत, उलट त्यांनी तातडीच्या कृतीची वेळीच जाणीव करून दिली आहे, त्याची दखल घ्यायला हवी.

Read About : Maharashtra drought : माणुसकीची सत्त्वपरीक्षा सुरू!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.