Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागात भीषण आग; 9 बाळांना सुरक्षित बाहेर काढले

Massive Fire in Chhatrapati Sambhajinagar Hospital’s Newborn Ward; All 9 Babies Safely Evacuated
सतर्क स्टाफने वाचवले नऊ चिमुरड्यांसह ५८ रुग्ण

Chhatrapati Sambhajinagar : आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमधील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला शुक्रवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग लागली त्यावेळी या विभागासह पहिल्या मजल्यावर एकूण ५८ रुग्ण उपचार घेत होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने बचावकार्य सुरू केल्याने ९ नवजात बालकांसह सर्व ५८ रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले.

९ चिमुकल्यांना तातडीने हलवले

आग लागली त्यावेळी नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात ९ बालकांवर उपचार सुरू होते. विभागात धूर पसरत असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढून पुढील उपचारांसाठी
वेगवेगळ्या रुग्णालयांत हलवण्यात आले. यापैकी पाच बालकांना घाटी रुग्णालयात, तीन बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

१० ते १५ मिनिटांत आग नियंत्रणात

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. आग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी जवानांनी खबरदारी घेतली. अवघ्या १० ते १५ मिनिटांत आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे रुग्णालयाच्या इतर विभागांना आगीची झळ पोहोचण्याचा धोका टळला.

सतर्क स्टाफने वाचवले नऊ…

अवघ्या १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे आग रुग्णालयाच्या अन्य भागात पसरण्याचा धोका टळला.

पहिल्या मजल्यावर ५८ रुग्ण :

नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग असलेल्या पहिल्या मजल्यावर एकूण ५८ रुग्ण उपचार घेत होते. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील ९ नवजात बालकांसह जनरल विभागातील ३६ आणि विशेष कक्षातील १३ रुग्णांचा समावेश होता. आग आणि धुराची परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

३० रुग्णवाहिका दाखल :

बचावकार्य अधिक वेगाने करण्यासाठी सुमारे ३० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवाहरनगर पोलिसांसह आरसीपीचे जवानही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी समन्वयाने बचावकार्य केल्याने सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

वातानुकूलित यंत्रणेतील बिघाडाचा प्राथमिक अंदाज

रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणेतील विद्युत बिघाडामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेनंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

अमरावतीच्या घटनेनंतर पुन्हा नवजात कक्षात आग

अलीकडेच अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर एशियन हॉस्पिटलच्या नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मात्र (Chhatrapati Sambhajinagar) आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून बचावकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने सर्व रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.