मनपा आयुक्तांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश : बेपत्ता मजुरांच्या शोधासाठी एसडीआरएफला पाचारण
छत्रपती संभाजीनगर : Chikalthana Building Collapse चिकलठाणा येथील बाजारतळाजवळ सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नसल्याचे समोर आले आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या घटनेप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि.३०) दिले. तसेच बेपत्ता मजुराच्या शोधासाठी एसडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्त येडगे यांनी शुक्रवारी चिकलठाण्यातील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, उपायुक्त अंकुश पांढरे, अतिक्रमण विभागप्रमुख सविता सोनवणे आदींसह अधिकारी उपस्थित होते. आयुक्त येडगे यांनी बेपत्ता व जखमी मजुरांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले. या पाहणीबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, शहरात लहानमोठे असे कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेणे बंधनकारक आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगीबाबत नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, इमारत बांधकामाची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मुजीदबा खान या व्यक्तीच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी राठोड नावाच्या कंत्राटदाराला काम देण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना, गुरुवारी सायंकाळी स्लॅब कोसळला, त्याखाली एक मजूर मलब्याखाली दबला, तर इतर तिघे जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने दबलेल्या मजूराचा शोध सुरू केला. मात्र चोवीस तासानंतरही तो सापडला नाही. घटनेची गांभिर्य ओळखून पुण्याहून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद बल) ला पाचारण करण्यात आले आहे, ३० जवानांचे हे पथक शुक्रवारी रात्री शहरात दाखल झाले. उद्या सकाळपासून पथक शोधकार्य सुरू करेल., असे उपायुक्त पांढरे यांनी सांगितले.
बांधकामांचा ड्राइव्ह घ्या…
चिकलठाणा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात सुरू असलेल्या बांधकामांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. परवानगी घेऊन बांधकाम केले जात आहे का, परवानगी घेतलेली नसेल, तर संबंधितांवर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
विहिरी बुजवली नाही..
बांधकाम सुरू असलेल्या जागेत एक विहिर आहे. ही विहिर काम सुरू करण्यापूर्वी पूर्णपणे बुजविणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी मनपाकडून परवानगी घेतली असती, तर अधिकाऱ्यांच्या पाहणीत ही बाब दिसून आली असती, विहिर बुजविल्याशिवाय मनपाने बांधकाम परवानगी दिली नसती., ही दुर्घटना टळली असती, अशी चर्चाही यावेळी झाली.
Read About : Ritu Negi Asian Games Gold : इराणला 37-34 ने हरवत भारताचे सुवर्णपदक कायम
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.