Language of Abuses Across Cultures : ‘वाटाघाटी’, ‘बाचाबाची’ या शब्दांचे वापर केवळ असहमतीच्या वादविवादप्रसंगी जाणवतात.
जेव्हा देणे-घेणे व्यवहारात असहमती, वादावादी होतात, तेव्हा तडजोडीसाठी जो अखेरचा संवाद घडतो त्याला म्हणतात वाटाघाटी. प्रत्यक्षात कुणा एकाला त्यातून मोठा मनाजोगता ‘वाटा’ मिळतो तर दुसऱ्यास मिळते ती ‘घाटी’, अशा अर्थाने सामंजस्याच्या घटनेत या शब्दाचा मजेशीर वस्तुनिष्ठ अर्थ ठरतो.
भाग २
पुलंनी बाचाबाचीची फोड विनोदी पद्धतीने केली, ‘बा’चा (वडिलांचा) आणि ‘बा’ची (वडिलांची), यावेळी ‘कोण?’ या प्रश्नाच्या उत्तराचे निर्देश मातृसंस्थेकडे जातात. जगातील सर्व शिव्या जननीच्या जननेंद्रियाच्या उल्लेखाशिवाय जणू ‘अपूर्ण’ मानल्या जातात.
चारचाकी चालवायला शिकायचे तर आधी शिव्या द्यायला यायला हवे असे सांगितले जाते. अन्यथा तुम्ही तुमची चारचाकी रस्त्यावर दामटू शकत नाहीत असे जपान आणि लखनौ असे सन्माननीय अपवाद सोडता जगभरात सर्वेशां समजले जाते.
तुकोबाराय ‘मऊ मेणाहुनी मऊ आम्ही विष्णुदास’ हे सांगताना ‘कठीण वज्राशी भेदू ऐसे’ असेदेखील स्पष्ट करतात. आणखी एका ठिकाणी त्यांना हेच पुन्हा दुसऱ्या शब्दांत सांगावेसे वाटले, तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘वज्रादपि कठोर। मृदू उपमेसी नीर॥’ वेळप्रसंगी अगदी शिवी वाटेल या शब्दात त्यांनी सुनावले आहेच. म्हणजे शिव्या देणे ही माणसाच्या रागाची, असंतोषाची थोडीशी सभ्य अभिव्यक्ती म्हणावी का? कारण ती शारीरिक झोंबझोंबीपेक्षा बरी म्हणावी इतकचं.
सभ्य, सुसंस्कृत समाजात ज्याची चर्चा असभ्य मानली जाते, त्या शारीरिक क्रिया व शरीराचे ते चर्चेसाठी असलेल्या निषिद्ध भागांचे उल्लेख शिव्या देण्यासाठी केले जातात. शिव्या देताना समोरच्या व्यक्तीच्या मातृसंस्थेतील व्यक्तींचे उल्लेख हे देखील आणखी एक समानसूत्र जगभर आढळते.
प्राणी घाबरवण्यासाठी ओरडतात, डरकाळी फोडतात किंवा भूंकतात, असे करण्यासाठी माणसे मात्र ‘शिव्या देण्याचा पर्याय’ निवडतात.
आदिम काळात शिव्या देण्याचे प्रयोजन केवळ घाबरवण्यापर्यंतच होते, मध्ययुगीन काळात धार्मिक व्यवहारांचे प्रस्थ सुरू झाले तेव्हा धार्मिक विधीत जे जे निषिद्ध त्यांच्या उल्लेखाचे शिव्यात रूपांतर झाले; तर योनिशुचितेचे प्रस्थ वाढ(व)लेल्या आधुनिक काळात लैंगिक कृतींचे उल्लेख शिव्यांचा भाग झाले.
फारसी तथा पर्सियन भाषेने शिव्यांचा आहेर मराठीला केला, उदाहरणार्थ, नालायक, हरामखोर, साले, साला, बाजींदी, गावजानी (व्यभिचारीण) इब्लिस, सैतान, बदमाश, नमक हराम, हरामी, औलादीचा, मुडदा किंवा मुर्दा (बाद), बेवारशी, जनावर, लावारीस, नीच, बेबंद, जंगली, बेचिराख, तमासगीर या पर्शियन शिव्या- विशेषण मराठीने स्वीकारल्या.
शिव्यांचे उल्लेख असणारे शब्दकोश आणि तो कुणाच्या अभ्यासाचादेखील विषय ठरतो. असे शब्दकोश अगदी मराठीदेखील तयार झाले.
जपानी भाषेत इंग्रजी किंवा मराठीसारख्या अत्यंत अश्लील किंवा शिवीगाळयुक्त शब्दांचा अभाव असतो. जपानी संस्कृतीत थेट शिव्या देण्याऐवजी समोरच्याचा अपमान करण्यासाठी, त्याला मूर्ख ठरवण्यासाठी किंवा सामाजिक शिष्टाचार तोडण्यासाठी विशिष्ट शब्दांचा वापर केला जातो.
जपानी भाषेत वापरले जाणारे काही प्रमुख अपमानकारक आणि तीव्र शब्द म्हणजे बाका (‘मूर्ख’ किंवा ‘वेडा’), ‘अहो’ (मूर्ख), कुसो (शेण) (‘धत् तेर की’ – Damn, Shit याप्रमाणे वापर), चिकुशोयू (जनावर), तेमी, किसमा (अरे का रे अर्थी केवळ भांडणाच्या वेळी उल्लेख), उरुसाई (‘गप्प बस’ किंवा ‘तू खूप त्रासदायक आहेस’), कोनो यारोऊ (साल्या मूर्ख), शिने (मर मेल्या किंवा मेल्या मूडद्या कपाळकरंट्या) हा शेवटचा शब्द म्हणजे सर्वात तीव्र आणि धोकादायक शब्द मानला जातो; तर ‘दामात्ते कुदासाय’ हा शब्दप्रयोग म्हणजे इंग्रजीत ‘शट-अप’ अर्थात ‘थोबाड बंद कर.’
या बाबतीत जपानचे कौतुक निदान भारतीयांनी तरी सांगू नयेत, कारण लखनौ संस्कृती. लखनौमधले नबाबी रिवाज म्हणजे आदरसंस्काराची जणू पेरणी. अरे-कारे-तुसडा-फडतूस व्यवहार इथे नाहीच, अगदी लहान-सहान व्यक्तींनादेखील ‘अहो-का हो’चा सन्मान. त्यातून उर्दू ज़बान अन् त्यातील लगेजा, ठेहराव आपली अंगभूत तहज़ीब, नफ़ासत आणि मिठास घेऊन येते, म्हणून कदाचित चेष्टेत असेही म्हटले जाते की या मधाळ भाषेत कुणी कठोर शब्दांत रागावले तरी ते कानावर पडून मनाला वाईट नाहीच वाटणार. मशहूर शायर दाग़ देहलवी म्हणजे पंडित आनंद मोहन झुत्सी म्हणतात की, ‘उर्दू मे कोई गाली दे तो वो भी कबूल है’ एकेकाळी उर्दूत ‘मुडदे फरास’ ही सामान्य मानली जाणारी शिवी केवळ वयस्क महिलाच देत. ‘राब्ता’, ‘इनायत’, ‘आफ़रीन’ म्हणजे मोहब्बत (प्रेम), जिं़दगी (आयुष्य), दर्शन (अध्यात्म) यांची सुरेल मैफल आहे.
अपेक्षाभंग, फसवणूक यांची जाणीव मेंदूला अस्वस्थ करते, म्हणून मनदेखील त्याचा विचार करू लागते. ‘मन चिंती ते वैरी नाही’, या अर्थाने मनातले विचार मनाला, मेंदूला आणि हळूहळू शरीराला खाऊ लागतात. याचा प्रत्यक्ष प्रभाव वैद्यकीयदृष्ट्या सीएस्एफ् (सेरेब्रो स्पायनल फ्ल्यूईड)वर होतो. हे पाठीच्या कण्यातील पाणी. पाठीच्या कण्यातून हे पाणी मेंदू व डोळे नियंत्रित करतात. रक्तदाबाप्रमाणेच या द्रवावरील दाब नियमितपणे १० ते १५ एकक असा असायला हवा. परंतु, अतिविचारी अविचारातून भावना उद्रेकामुळे हा दाब वाढला की ताण असह्य होत पुढे मेंदूज्वर, मेंदूतला रक्तस्त्राव, तसेच डोळे गमावणे, अर्धांगवायू असे कधीही भरून न येणारे शारीरिक आघात होतात.
राग आला तत्क्षणी शिवी हासडणे हा क्षणिक तात्पुरता तरीही परिणामकारक लाभदायी उपाय ठरतो. परंतु, याशिवाय काही उपाय नाही का? तर आहेत असे उत्तर संत शेख महंमद लिहीत ‘योगसंग्राम’ हा ग्रंथ, शिखरिणी वृत्तातले शंकराचार्यांचे ‘सौंदर्यलहरी’ आणि पंडितराज जगन्नाथरचित ‘गंगालहरी’ ही दोन्ही स्तोत्रे चित्त शांत राखण्यास उपयुक्त ठरतात. सिगमंड फ्रॉईड, एरिक फॉर्म मानसशास्त्रावर भाष्य करण्याआधी शेकडो वर्षांपासून ‘मनाचे श्लोक’ आम्हास अवगत होते, तुकोबाराय तर म्हणतात – ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे साधन.’
देवेंद्र रमेश राक्षे
संपर्क : ८३०८३०२४००
Read About : Why Humans Swear : शिव्यांची लाखोली
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.