El Nino Effects on India : सध्या एल-निनोची चर्चा आहे. तशी ती होणं सहाजिकच आहे. याचं कारण एल-निनोच्या परिणामांचे पडसाद आता सगळीकडंच उमटायला लागले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एल-निनो आणि एल-निना अशी वातावरणाची दोन दुष्ट चक्रं आहेत. या दुष्टचक्रांवरसुद्धा हवामानातील बदलांचा परिणाम झाला आहे.
गेल्या शतकातील एल-निनोपेक्षा या शतकातील एल-निनो अधिक तीव्र, विध्वंसक आणि अनपेक्षित स्वरूपाचा बनला आहे. ‘जागतिक हवामान संघटने’च्या (वर्ल्ड मेटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन) म्हणण्यानुसार या वर्षाच्या अखेरीस सध्याच्या एल-निनोचा प्रभाव अधिक तीव्र होईल आणि त्याचे पडसाद २०२७ सालामध्येसुद्धा उमटतील!
यंदा सरासरीपेक्षा पाऊस जवळपास १३ टक्क्यांनी कमी पडला आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाची गडद छाया आहे. पाण्याचा तुटवडा आहे. हे एल-निनोचेच परिणाम आहेत. पॅसिफिक महासागराच्या वरच्या थरातील पाण्याचं तापमान नेहमीच्या मर्यादेपेक्षा प्रचंड वाढणं ही एल-निनो आल्याची मोठी खूण असते. तो आला की त्याचा वाईट परिणाम पाऊस-पाण्यावर होतो. वातावरणाच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ होते आणि उष्णतेच्या लाटा येतात.
एल-निनो येतो म्हणजे काय होतं? तर मध्य पॅसिफिक महासागरात नेहमीपेक्षा वातावरणाचा दाब कमी झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या आसपास तो वाढला की एल-निनोचं आगमन होतं. याउलट मध्य पॅसिफिकमध्ये वातावरणाचा दाब वाढला आणि ऑस्ट्रेलियाच्या आसपास तो कमी झाला की एल-निनोचं आगमन होतं. एल-निनोमुळं अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील विषुववृत्त प्रदेशात महासागराच्या पृष्ठभागापासून ५०० फूट खोलपर्यंत गरम पाणी जमा होतं आणि मेक्सिको, पेरू वगैरे प्रदेशांत मुसळधार पाऊस, वादळं, महापूर येतात; त्यामुळं रोगराई होऊन प्राणहानीबरोबरच मोठं आर्थिक नुकसानही होतं. त्याचवेळी पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला इंडोनेशियाच्या प्रदेशात तप्त हवामान, दुष्काळ, वणवे, यांचा प्रादुर्भाव होतो. एल-निनोच्या आगमनात याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी इंडोनेशिया आणि आसपासचा प्रदेश यामध्ये गरम पाणी जमा होऊन तेथील लोकांना मुसळधार पााऊस, वादळं आणि महापूर यांना तोंड द्यावं लागतं आणि मेक्सिको आणि पेरूमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
विसाव्या शतकामध्ये सर्वांत तीव्र एल-निनोचं आगमन १९८२ सालामध्ये झालं होतं. त्यानंतर १९८६, १९९१, १९९२ आणि १९९४ सालातही एल-निनोचं आगमन झालं होतं, पण त्याचा प्रभाव फारसा तीव्र नव्हता. १९९७ सालचा एल-निनो मात्र भयानक स्वरूपाचा होता आणि त्याचा प्रभाव १९९८ सालच्या मध्यापर्यंत टिकला होता. थोडक्यात, एल-निनो येणं ही गोष्ट नवीन नाही, पण आता एकंदरच परिस्थिती पालटली आहे, त्यामुळं निसर्गत:च घडणाऱ्या गोष्टींचे परिणाम अधिक टोकदार आणि म्हणून त्रासदायक होऊ लागले आहेत. सध्या सुरू असलेल्या एल-निनोचे ‘प्रताप’ हे त्याचंच एक ‘तापदायक’ उदाहरण आहे.
सध्याच्या एल-निनोचं आगमन यंदाच्या जून महिन्यामध्ये पॅसिफिक महासागरात झालं, त्यामुळं हवामानावर परिणाम होऊ लागले. भारताला वेढणाऱ्या अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांच्यातील बदल ४०-४५ दिवसांनंतर जाणवायला लागले. त्याचा मोठा परिणाम पावसावर झालाच, पण यंदा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील सरासरी तापमान हे नेहमीच्या हिवाळ्यातल्यापेक्षा जास्त असेल. मात्र, सध्या भारताच्या दक्षिणेकडील राज्यांत पडणारा पाऊस नेहमीसारखाच असेल. जागतिक पातळीवर हवा अधिकाधिक तापत आहे. परिणामी पॅसिफिक महासागराचं तापमानही वेगानं वाढत आहे, त्यामुळं एल-निनोमुळं बसणारे तडाखेही तीव्र होत आहेत. २००९-२०१० मध्ये आलेला एल-निनो भारतातल्या पावसाला फटका देऊन गेला होता. २०१५-२०१६ मध्ये आलेला एल-निनो हा आतापर्यंतच्या काळातला सर्वांत तीव्र स्वरूपाचा होता. त्याकाळामध्ये पॅसिफिक महासागराचं तापमान २.६ अंश से.नं वाढलं होतं. २०२३-२०२४ मध्ये आलेला एल-निनो आणि हवामानातील बदल यामुळं ते वर्ष जगातील सर्वांत ‘गरम’ वर्ष होतं आणि सध्या सुरू असलेला एल-निनो हा खूपच त्रासदायक ठरण्याची संभाव्यता आहे.
महासागराच्या अगदी वरच्या थरातील पाण्याच्या तापमानाच्या नोंदी ठेवायला ४० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्या नोंदींवरून असं दिसतं की, सध्याच्या एल-निनोची तीव्रता वारंवार वाढत आहे. सध्याचा एल-निनो आला यंदाच्या जून महिन्यात. तो आल्यानंतर, ‘रिलेटिव्ह ओशन निनो इंडेक्स’ (रोनी- महासागराच्या पाण्याच्या सर्वसाधारण तापमानात झालेल्या बदलाचा निर्देशांक) असं सांगतो की, जुलै ते सप्टेंबर या काळात पॅसिफिक महासागराच्या पाण्याच्या तापमानात २.० ते २.८ अंश से.ने, वाढ झाली. हे तापमान ३.८ अंश से.पर्यंत जाण्याची चिन्हं आहेत. महासागराच्या पाण्याच्या तापमानात इतकी वाढ यापूर्वी कधीही झालेली नव्हती. या तापमानवाढीचे परिणाम दूरवर होणार आहेत. उत्तर गोलार्धामध्ये, दक्षिण युरोप आणि आफ्रिका, अरबी द्विपकल्प (नैऋत्य आशिया आणि ईशान्य आफ्रिका), भारतीय उपखंड आणि पूर्व युरोप या भागात तापमानात वाढ होणं अपेक्षित आहे. अरबी द्विपकल्प, मध्य आणि पूर्व आशिया, आग्नेय आशिया आणि उत्तर अमेरिका या भागांत नेहमीपेक्षा अधिक पावसाची संभाव्यता आहे. दक्षिण गोलार्धात आफ्रिका (विशेषत: विषुववृत्तीय प्रदेश) आणि दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या भागांत हवामान नेहमीपेक्षा जास्त गरम असण्याची संभाव्यता आहे. दक्षिण आफ्रिका, मध्य अमेरिकेचा दक्षिण भाग आणि कॅरिबियन बेटं या भागात नेहमीपेक्षा कमी पावसाची संभाव्यता आहे.
एकंदर चित्र असं आहे की पूर, दुष्काळ, तापमानात वाढ, चक्रीवादळं यांचा तडाखा जगातल्या हजारो लोकांना बसण्याची संभाव्यता आहे. त्यातूनही अमेरिकेचा मध्य आणि दक्षिण भाग, आफ्रिकेचा दक्षिण भाग आणि आग्नेय आशिया या भागांमध्ये असा फटका बसण्याची संभाव्यता अधिक आहे. या एल-निनोमुळं अन्न आणि पाणी यांच्या सुरक्षेवरही घाला पडू शकतो. हे परिणाम २०२७ मध्ये दिसायला लागतील असं अभ्यासक म्हणतात. सध्याच्या एल निनोच्या परिणामांची गडद सावली येणाऱ्या दिवसांवर पडलेली आहे, ती दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
श्रीराम शिधये
shriramshidhaye@gmail.com
Read About : Why Humans Swear : शिव्यांची लाखोली
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.