Ad Advertisement Ad Advertisement

IVF Center Sambhajinagar – अनेक दांपत्यांच्या अपत्यप्राप्तीच्या स्वप्नांना मिळणार नवी आशा!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साकारणार अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर | १० कोटी २० लाखांच्या प्रकल्पाला शासनाची तांत्रिक मान्यता

छत्रपती संभाजीनगर : IVF Center Sambhajinagar एखाद्या घरात लहान बाळाचे आगमन व्हावे, अंगणात बालहास्य घुमावे, आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, ही प्रत्येक दांपत्याची मनापासूनची इच्छा असते. मात्र, वंध्यत्वाच्या समस्येमुळे अनेक दांपत्यांच्या या स्वप्नांना संघर्षाचे स्वरूप येते. उपचारांचा मोठा खर्च, आर्थिक मर्यादा आणि मानसिक तणाव यामुळे अनेक कुटुंबांना इच्छा असूनही आधुनिक उपचार घेणे शक्य होत नाही. अशा दांपत्यांसाठी आशेचा नवा किरण निर्माण करणारी आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक आयव्हीएफ (आयव्हीएफ) सेंटर उभारण्यात येणार आहे.


या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १० कोटी २० लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास तांत्रिक मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील वंध्यत्वग्रस्त दांपत्यांना शासकीय रुग्णालयात आधुनिक प्रजनन उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.
केवळ एक वैद्यकीय सुविधा उभारण्यापुरता हा प्रकल्प मर्यादित नसून, आर्थिक अडचणींमुळे अपत्यप्राप्तीचे उपचार घेऊ न शकणाऱ्या कुटुंबांना आशेचा आधार देणारा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत अनुदानातून शासन निर्णयान्वये काही अटींच्या अधीन राहून तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

एसएसबी इमारतीत उभारणार अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालीटी बिल्डींग (एसएसबी) इमारतीमध्ये हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी डॉ. सोनाली देशपांडे यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात येणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले. या केंद्रात आयव्हीएफ सेटअप, आयसीएसआय सेटअप, आयव्हीएफ ऑपरेशन थिएटरसाठी आवश्यक उपकरणे, क्लीन रूम तसेच आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपचारांसाठी आवश्यक औषधे आणि उपभोग्य सामग्रीचीही तरतूद करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील रुग्णांना होणार लाभ

आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंवंध्यत्व ही केवळ वैद्यकीय समस्या नसून अनेकदा ती दांपत्यांसाठी भावनिक आणि मानसिक संघर्षही ठरते. समाजातील अपेक्षा, कुटुंबीयांचे प्रश्न आणि उपचारांचा वाढता खर्च यांचा सामना अनेकांना करावा लागतो. खासगी रुग्णालयांमधील आयव्हीएफ उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक दांपत्यांना उपचार घेण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागतो. अशा परिस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर सुरू झाल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो. मराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णांनाही या सुविधेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

एका नव्या सुरुवातीची आशा!

एखाद्या दांपत्यासाठी आई-बाबा होण्याचा प्रवास हा आयुष्यातील सर्वांत भावनिक अनुभव असतो. अनेक वर्षांची प्रतीक्षा, असंख्य तपासण्या आणि उपचारांनंतरही अपत्यप्राप्तीचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्यांसाठी शासकीय रुग्णालयातील हे केंद्र आशेचा नवा दरवाजा उघडू शकते. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांतून साकार होणारा हा प्रकल्प केवळ अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेची भर घालणारा नाही, तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचे नवे पर्व सुरू करण्याची क्षमता असणारा असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

Read About :Urban Students Exam Fee Waiver Demand – ग्रामीण विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, शहरी विद्यार्थ्यांना मात्र शुल्काचा भुर्दंड!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.