एकेरीसह दुहेरीतही विजेतेपदावर मोहोर
छत्रपती संभाजीनगर : National Under 14 Tennis Champion- ईएमएमटीसीतर्फे आयोजित एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेने पार पडलेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिने दमदार कामगिरी करत दुहेरी मुकुट पटकावला. मुलींच्या एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांत विजेतेपद मिळवत मायराने स्पर्धेवर आपली छाप उमटवली. मुलांच्या एकेरीत तेलंगणाच्या सत्या चिंतागुंता याने, तर दुहेरीत राजस्थानचा रोनक हरियानी आणि कर्नाटकचा आदित्य कामत या जोडीने विजेतेपद मिळवले.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या स्पर्धेच्या मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या मायरा शेखने अव्वल मानांकित उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडेचा ६-०, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तब्बल दीड तास रंगलेल्या या सामन्यात मायराने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सेटमध्ये तिने दुसऱ्या आणि चौथ्या गेममध्ये सिद्धीची सर्व्हिस ब्रेक करत ६-० अशी एकतर्फी बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्येही सहाव्या आणि आठव्या गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदत ६-३ असा सेट जिंकला आणि एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले.
मुलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या सत्या चिंतागुंता याने चौथ्या मानांकित तेलंगणाच्याच सुजई पोथुलाचा ७-६ (२), ६-२ असा पराभव केला. तब्बल अडीच तास चाललेल्या या सामन्यात सत्याने पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही वर्चस्व राखत विजेतेपद निश्चित केले. मुलांच्या दुहेरीच्या अंतिम सामन्यात राजस्थानचा रोनक हरियानी आणि कर्नाटकचा आदित्य कामत या चौथ्या मानांकित जोडीने तामिळनाडूच्या शिशांत शिवराज आणि हरिहरण महामुनी यांचा २-६, ६-४, १०-५ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत या जोडीने सामना आपल्या बाजूने झुकवला.
मुलींच्या दुहेरीच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित रिशीता यादव आणि मायरा शेख या जोडीने महाराष्ट्राच्याच शौर्या पाटील आणि अस्मी पित्रे यांच्यावर ६-३, ४-६, ११-९ अशी मात केली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात निर्णायक सुपर टायब्रेकमध्ये बाजी मारत रिशीता आणि मायराने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मायराच्या दुहेरी मुकुटाच्या कामगिरीला पूर्णत्व मिळाले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडकासह २०० एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडकासह १५० एआयटीए गुण देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन्ड्युरन्स ग्रुपचे कॅप्टन के. कवी, अभिनव मिश्रा, ॲड. आशुतोष मिश्रा, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर, मुख्य पंच रमय्या कोंकट्टी, प्रवीण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
Read About : Finals National Tennis – राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची मायरा शेख चमकली
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.