इंडिया आघाडीचे रामलीला मैदानावर शक्तिप्रदर्शन; मोदी-शाह यांनासुद्धा कारवाईचा सामना करावा लागेल
Rahul Gandhi Gyanesh Kumar : नवी दिल्ली : ‘मतचोरी रोखणे’, ‘संविधानाचे रक्षण करणे’, ‘लोकशाही वाचवणे’ व ‘देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे’ या मुख्य मागण्यांसह काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने रविवारी ऐतिहासिक रामलीला मैदानावर लाखोंच्या उपस्थितीत विराट शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अभेद्य एकजूट दाखवत कथित ‘मतचोरी’वरून मोदी सरकारला ललकारले. ज्ञानेश कुमारांनी देशद्रोह केला. त्यामुळे त्यांना केवळ पदावरून हटवले जाणार नाही तर त्यांची तुरुंगात रवानगी केली जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. हे दोन्ही नेते भविष्यात वाचू शकणार नाहीत, अशा शब्दांत विरोधक कडाडले.
‘मतचोरी’विरोधातील आंदोलनाला धार देत इंडिया आघाडीने रामलीला मैदानावर ‘मत वाचवा, देश वाचवा’ महारॅली घेत शक्तिप्रदर्शन केले. ‘मतचोरी’ विरोधातील हे आंदोलन म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. आता लोकशाही वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना सत्तेतून जावेच लागेल, असा एकसूर विरोधकांनी काढला. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले की, मोदी, शाह आणि ज्ञानेश कुमार यांनी देशाचा आत्मा आणि लोकशाहीवर हल्ला केला असून, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची वेळ आली आहे. आम्ही देशातील संविधान आणि लोकशाही मिटू देणार नाही. हा एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा नव्हे तर देशातील तरुण, शेतकरी आणि कामगारांचा आवाज आहे, असे त्यांनी ठणकावले.
पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर १३.५ कोटी मतदारांची नावे वगळली. हे प्रमाण एकूण मतदारांच्या सुमारे १५ टक्के आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए व विरोधकांतील फरक हा अवघ्या ३ टक्क्यांचा होता. ही निवडणूक ‘चोरीची आणि अवैध निवडणूक’ होती, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला. ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय मोदी पंतप्रधान आणि शाह गृहमंत्री बनू शकले नसते.
नागरिकाच्या आवाजाची आणि अभिव्यक्तीची चोरी
मतचोरी साधी नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची आणि अभिव्यक्तीची चोरी आहे. कायदेशीर भाषेत याला ‘दुर्मिळात दुर्मीळ प्रकरण’ आणि ‘देशद्रोह’ ठरवत ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी राहुल यांनी केली.
केंद्र, महाराष्ट्र, बिहार आणि यूपी सरकार चोरीचे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, केंद्र, महाराष्ट्र, बिहार आणि यूपी सरकार चोरीचे होते. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना भीती घातली जात आहे. पण, काँग्रेस आणि आघाडीचे नेते याला भीक घालणार नाहीत. मोदींना जनता निवडत नाही, मोदी सत्तेतून बाहेर पडतील तेव्हाच लोकशाही वाचेल, असे ते म्हणाले.
उघड्या वाहनातून मोर्चा
रामलीला मैदानावरील सभेपूर्वी विरोधकांनी उघड्या वाहनातून मोर्चा काढत सभास्थळ गाठले. यावेळी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. या माध्यमातून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Maharashtra Local Body Elections- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मार्गी!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.