प्रौढ प्रताप पुरंदर महानाट्याला भेट : ६ कोटी ३३ लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
छत्रपती संभाजीनगर Devendra Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Ekta Fund: आपण जर विभाजित राहिलो, तर गुलामगिरीकडे जावू, एकत्र राहिलो तर अधिराज्य गाजवू, आपल्या सगळ्यामधील भेद दूर होऊन आपण सगळे एक झालो पाहिजे, छत्रपतींचे सगळे मावळे हे एकत्रित असले पाहिजे, आणि एकोप्याने आपण समाजाची निर्मिती केली पाहिजे, आपल्या महंतांच्या धर्माचार्याच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा भगव्याचा विजय केला पाहिजे. भगव्याची प्रतिष्ठापना केली पाहिजे, त्याअंतर्गत सर्वांना भेदभावरहित समाजरचनेतून नव महाराष्ट्राची उभारणी करण्यासाठी छत्रपतींचा आणि धर्माचार्यांचा आशिर्वाद आपण प्राप्त करून घेऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.१) केले. शहरातील जबिंदा मैदानावर सुरू असलेल्या प्रौढ प्रताप पुरंदर या महानाट्यप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर जगतगुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज, प्रकाशनंदगिरी महाराज, सरलाबेटचे मठाधिपती रामगिरी महाराज, श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत शिवाजी महाराज, गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री, पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे, अनुराधा चव्हाण, सुहास शिरसाट, महापौर समीर राजूरकर, माजी आमदार संजय केणेकर, संजय खंबायते, किशोर शितोळे, जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे, शेषराव साबळे, लक्ष्मी साबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराज नसते, तर आपल्यापैकी कोणीच याठिकाणी राहिलो नसतो, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत महाराजांचा विचार हा आपल्या ठायी असावा, यासाठी हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. ज्या धर्मासाठी महाराजांनी लढा दिला, त्या धर्माचे, संस्कृतीचे पाईक असलेले आमचे सर्व धर्मचार्य उपस्थित आहे, याचा मला आनंद आहे. हे धर्माचार्य आपल्या कार्याच्या माध्यमातून विचारांचे प्रदूषण दूर करून, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना छत्रपतींच्या मार्गाने चालण्यासाठी आशिर्वाद देत असतात. त्यामुळे त्यांची उपस्थिती याठिकाणी महत्वाची आहे, असे मी मानतो. आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट आहे. शेतकऱ्यांना, शेतमजूराला धीर देण्याची आवश्यकता आहे. त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. अशा काळात शिवचरित्राने त्यांच्या मनात एक नवीन उभारी निर्माण झाली पाहिजे, कितीही आव्हाने आली, त्या आव्हानांशी दोन-दोन हात करण्याची उर्मी त्यांच्या मनात तयार झाली पाहिजे. यासाठी महानाट्य अत्यंत महत्वाचे आहे. राज्यातील सरकार बळीराजाच्या पाठिशी उभं राहणारच आहे., अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांना ६ कोटी ३३ लाखांचे चेक सुपूर्द
बळीराजाला मदत करण्यासाठी सेवा समितीने १ हजार पाण्याच्या टाक्या मराठवाड्यातील गावांगावांमध्ये देण्याचा तसेच महिलांना शिलाई मशीन निर्णय घेतला, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील सगळ्या उद्योजकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ६ कोटी ३३ लाख रुपयांचे चेक यावेळी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
२५ वर्षे टिकेल असा भव्य हार मनपाकडे सुपूर्द
क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी सेवा समितीच्या वतीने भव्य असा हार देण्यात आला. पुढील २५ वर्षे टिकेल, असा हा हार असल्याचे साबळे यांनी यावेळी सांगितले. तसेच हा हार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्त अमोल येडगे व महापौर समीर राजूरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
Read About : ST Employees Diwali Bonus – दिवाळी तोंडावर, एसटीच्या 88 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन-बोनस रखडले!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.