Ad Advertisement Ad Advertisement

Nashik Godavari Aarti Guinness World Record- कुंभमेळा आस्था व सामाजिक समरसतेची परंपरा – राष्ट्रपती मुर्मू

नाशकात विश्वविक्रमी गोदाआरती

Nashik Godavari Aarti Guinness World Record : नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये होणारा कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर सामाजिक समरसतेची प्राचीन काळापासून आलेली परंपरा आहे. अनेक वीर, देशभक्तांची भूमी असलेल्या नाशिकने आपल्या कार्याने देशासमोर एक आदर्श उभा केला आहे. समाजाला विज्ञानासोबतच अध्यात्माचीही गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नाशिकमध्ये पार पडलेल्या कुंभ धर्मध्वजारोहणानिमित्त झालेल्या सामूहिक विश्वविक्रमी गोदाआरतीप्रसंगी त्या बोलत होत्या. नाशिकमध्ये रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे ६२३३ आदिवासी भाविकांच्या उपस्थितीत गोदाआरतीचा गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित झाला.


गोदाकाठी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत महागोदाआरती पार पडली. यावेळी राष्ट्रपतींनी नाशिकसह महाराष्ट्रातील वीरांची आठवण काढली. या वीरांमुळे देशाचे सामर्थ्य वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदींचे कार्य देशाने स्वीकारले आहे, असेही त्या म्हणाल्या.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील सनातन धर्माला अनादी परंपरा आहे. या संस्कृतीत अनेक पंथ, संप्रदाय येऊन मिळाले आहेत. सनातनचे सारे आविष्कार आपल्याला कुंभमेळ्यात बघायला मिळतील. या महाआरतीनिमित्त आलेल्या जनजातीय समाजानेच खऱ्या अर्थाने सनातन धर्म जागृत ठेवला आहे. या कुंभाच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकचा स्थायी विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, हा नारी शक्तीचा सन्मान आहे. कुंभमेळा हा केवळ साधू व संतांचा नाही, तर सर्व समाजाचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, नाशिककरांनी गोदावरीला स्वच्छ ठेवले तर नक्कीच जगासमोर एक चांगला संदेश जाईल. यासाठी सामाजिक संस्था, एनजीओ, व्यापारी व नागरिकांनी हिरिरीने सहभागी होण्याची गरज आहे. सध्या स्वच्छता व पर्यावरणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही, असेही वर्मा म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वेधले लक्ष

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या सोहळ्यात विश्वविक्रमाची नोंद झाल्याने रामतीर्थावरील महाआरतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष लक्ष वेधून घेतले. या महाआरतीत ६२३३ जनजातीय भाविकांनी सहभाग घेतला.

Read About : Nashik Kumbh Mela 2026 – सिंहस्थाचे मंगलपर्व आजपासून

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.