Ad Advertisement Ad Advertisement

US Midterm Elections : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्षांची लिटमस टेस्ट! 1994, 2006 आणि 2010 मध्ये सत्ताधाऱ्यांना बसले होते धक्के

बिल क्लिंटन, जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांना मध्यावधी निवडणुकीत बसला होता मोठा राजकीय धक्का; अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेची आणि धोरणांची होते परीक्षा

वॉशिंग्टन : US Midterm Elections अमेरिकेत मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुकीसाठी (Midterm Polls) मतदान पार पडणार आहे. ही निवडणूक थेट राष्ट्राध्यक्षांची खुर्ची बदलत नसली, तरी सत्ताधारी पक्षाच्या कामगिरीसाठी ती एक प्रकारची धोक्याची घंटा ठरू शकते. अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीला राष्ट्राध्यक्षांच्या कामकाजाची लिटमस टेस्ट आणि जनतेच्या कौल मानले जाते. अमेरिकेच्या राजकीय इतिहासात अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत, जेव्हा मध्यावधी निवडणुकीच्या निकालांमुळे राष्ट्राध्यक्षांना आपली रणनीती बदलणे भाग पडले आहे.

१) १९९४ : बिल क्लिंटन यांना मोठा धक्का

डेमोक्रॅटिक पक्षाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षांत अर्थव्यवस्था आणि आरोग्य सुधारणांवरून जनतेत असंतोष वाढला होता. याचा फायदा घेत रिपब्लिकन पक्षाने न्यूट गिंगरिच यांच्या नेतृत्वाखाली कॉन्ट्रॅक्ट विथ अमेरिका हा १० सूत्री अजेंडा मांडला. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने प्रतिनिधी गृहात (House of Representatives) ५४ आणि सिनेटमध्ये ८ जागा जिंकून सुमारे चार दशकांनंतर दोन्ही सभागृहांवर पूर्ण नियंत्रण मिळवले. यामुळे पुढे क्लिंटन सरकार आणि रिपब्लिकन यांच्यात अर्थसंकल्पावरून एवढा वाद झाला की, १९९५ च्या अखेरीस अमेरिकन सरकारचे कामकाज दोन वेळा ठप्प (Government Shutdown) झाले होते.

२) २००६ : जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि इराक युद्धाचा फटका

तत्कालीन रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या काळात इराक युद्धाच्या धोरणांवरून अमेरिकन जनतेमध्ये तीव्र नाराजी होती. २००६ च्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधी गृहात ३० आणि सिनेटमध्ये ६ जागा जिंकून रिपब्लिकन पक्षाचे बहुमत मोडीत काढले. या पराभवाचा थेट परिणाम बुश यांच्या प्रशासनावर झाला. इराक युद्धाचे मुख्य रणनीतीकार आणि संरक्षण मंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांना निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

३) २०१० : बराक ओबामा यांची मोठा पराभव

२०१० च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागला, ज्याला ओबामांनी स्वतः शेलॅकिंग (एक मोठा पराभव ) म्हटले होते. आर्थिक संकट, बेरोजगारी आणि ओबामाकेअर या आरोग्य कायद्यावरून झालेल्या वादाचा हा परिणाम होता. रिपब्लिकन पक्षाने प्रतिनिधी गृहात तब्बल ६३ जागा जिंकून सभागृहावर नियंत्रण मिळवले. या निकालामुळे ओबामांना त्यांच्या पुढील कार्यकाळात नवीन कायदे मंजूर करून घेणे अत्यंत कठीण झाले होते.

मध्यावधी निवडणुकांमध्ये केवळ संसदेच्या जागांचा फैसला होत नाही, तर सत्ताधारी राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांवर ती जनतेची थेट राजकीय प्रतिक्रिया असते. यामुळेच आगामी निवडणुकीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे.

Read About : Drug-Resistant Superbugs in US – अमेरिकेत औषध-प्रतिरोधक सुपरबग्सचा कहर; दरवर्षी ९७ लाख संसर्ग, ५० हजारांहून अधिक मृत्यू

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.