Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Listed Companies – शेअर बाजारातही छत्रपती संभाजीनगरच्या ३० हून अधिक कंपन्या सूचीबद्ध

औद्योगिक ताकद वाढली; ऑटोमोबाईल, औषधनिर्मिती ते अभियांत्रिकी क्षेत्रातील ; एकत्रित बाजारमूल्य १०.७९ लाख कोटींच्या पुढे

छत्रपती संभाजीनगर :Chhatrapati Sambhajinagar Listed Companies ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरची औद्योगिक ताकद आता शेअर बाजारातही ठळकपणे उमटत आहे. ऑटोमोबाईल, ऑटो कंपोनंट्स, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी, स्टील, औद्योगिक साहित्य आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील ३० हून अधिक कंपन्या राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध आहेत. या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य तब्बल १० लाख ७९ हजार ३६८ कोटी रुपये म्हणजेच १०.७९ लाख कोटींच्या पुढे आहे. अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षांत दुप्पट ते पंधरापट वाढ झाल्याचे चित्र आहे.
या यादीत बजाज ऑटो, ल्युपिन, ग्लेनमार्क फार्मा, वॉकहार्ट, अजंता फार्मा, आयपीसीए लॅबोरेटरीज, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, व्हॅरोक इंजिनिअरिंग, लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज, गरवारे हाय-टेक फिल्म्स आणि अ­ॅथर एनर्जीसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

लुमॅक्सच्या शेअरमध्ये १४७१ टक्के वाढ

ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील तुलनात्मक आकडेवारीनुसार, लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये तब्बल १,४७१ टक्के, तर गरवारे हाय-टेक फिल्म्सच्या शेअरमध्ये ७१० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. काही कंपन्यांचे शेअर दोन ते चारपट वाढले आहेत. मात्र, सर्वच कंपन्यांना तेजीचा फायदा झालेला नाही. बलकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये १५.८ टक्के, क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये ५८.९ टक्के, कॉस्मो फर्स्टमध्ये ३२.४ टक्के आणि नाथ बायो-जिन्समध्ये ५४.२ टक्क्यांची घसरण झाली आहे.

ऑटोमोबाईल उद्योगाचा मोठा वाटा

छत्रपती संभाजीनगरची औद्योगिक ओळख प्रामुख्याने ऑटोमोबाईल उद्योगामुळे निर्माण झाली. बजाज ऑटोचे वालुज येथील उत्पादन केंद्र, एन्ड्युरन्स, व्हॅरोक, बेलराईज, धूत ट्रान्समिशन, लुमॅक्स, सीआयई ऑटोमोटिव्ह, ग्रीव्हज कॉटन आणि एनआरबी बेअरिंग्ज यांसारख्या कंपन्यांनी परिसरात मोठी औद्योगिक परिसंस्था उभी केली आहे. यामुळे हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. आता इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या विस्तारामुळे या क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

औषधनिर्मितीतही जागतिक ओळख

ऑटोमोबाईलनंतर औषधनिर्मिती हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. ल्युपिन, ग्लेनमार्क, आयपीसीए, अजंता फार्मा, वॉकहार्ट, एफडीसी आणि ऑर्किड फार्मा यांसारख्या कंपन्यांची उपस्थिती या उद्योगाची व्याप्ती दर्शवते. या क्षेत्रातील कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य सुमारे २.९० लाख कोटी रुपये असल्याचे आकडेवारीतून दिसते. उत्पादनासोबतच संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि निर्यातीच्या माध्यमातून या कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण केले आहे.

एमएसएमईमुळे औद्योगिक परिसंस्थेला बळ


जिल्ह्यात केवळ सूचीबद्ध कंपन्याच नव्हे, तर मोठ्या खासगी कंपन्या आणि त्यांचे पूरक उद्योगही कार्यरत आहेत. जिल्हा औद्योगिक परिसंस्था अहवालानुसार, उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुमारे ८६ हजार ४२९ सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची नोंद असून, त्यांच्यामार्फत सुमारे ४ लाख ४ हजार ८३८ रोजगार उपलब्ध झाले आहेत. आगामी काळात ऑरिक आणि बिडकीन डीएमआयसीमधील नव्या गुंतवणुकीमुळे औद्योगिक विस्ताराला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.अशा प्रकारे उत्पादन, रोजगार, निर्यात आणि भांडवली बाजारातील सहभाग या चारही आघाड्यांवर छत्रपती संभाजीनगरची औद्योगिक ओळख अधिक मजबूत होत आहे. आगामी काळात नव्या कंपन्यांचे शेअर बाजारातील आगमन झाल्यास या औद्योगिक सामर्थ्याचे आर्थिक प्रतिबिंब आणखी व्यापक होऊ शकते. संबंधित कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प देशातील विविध राज्यांत आणि परदेशातही आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण बाजारमूल्य छत्रपती संभाजीनगरशी जोडता येणार नाही. मात्र, या कंपन्यांच्या औद्योगिक प्रवासात शहर आणि परिसरातील उत्पादन केंद्रांचे योगदान महत्त्वाचे आहे.

Read About : ST Employees Diwali Bonus – दिवाळी तोंडावर, एसटीच्या 88 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन-बोनस रखडले!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.