परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतरही पगाराची प्रतीक्षा; दिवाळीची खरेदी करायची कधी, कर्मचाऱ्यांचा सवाल
छत्रपती संभाजीनगर : ST Employees Diwali Bonus दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाही राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे ८८ हजार कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन आणि दिवाळीचा बोनस मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तीन दिवसांपूर्वीच परिवहन मंत्र्यांनी माध्यमांसमोर दुसऱ्याच दिवशी वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप वेतन जमा झाले नसल्याने कर्मचाऱ्यांचा संताप वाढत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी पैसेच हातात नसतील, तर सण साजरा करायचा कसा, असा सवाल कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपडे, मिठाई, घरगुती साहित्य आणि मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. मात्र, वेतनासोबतच दिवाळीचा बोनसही मिळालेला नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सरकारकडून वेतन वेळेत देण्याची घोषणा करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने या घोषणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनेही याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रलंबित देयके आणि दिवाळीचा बोनस याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
”राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी हक्काचे वेतन देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा केली होती. मात्र, वेतनासोबतच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रलंबित देयके आणि दिवाळीचा बोनसही जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी.”
-राजेंद्र ए. वहाटुळे विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर
Read More : Workplace Safety Ergonomics CMIA – कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी अर्गोनॉमिक्स महत्त्वाचे
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.