Ad Advertisement Ad Advertisement

Jalna investment fraud सव्वा कोटींत फसवणूक, मुख्य सुत्रधारास 5 दिवसांची पोलीस कोठडी

ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने घातला होता गंडा

Jalna investment fraud जालना : बाबा ट्रेडिंग आणि आरटीजी कंपनीत गुंतवणूक केल्यास वर्षभरात तिप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून शिक्षकासह ५० जणांची तब्बल १ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार मो. एजाज मो. रफीक सलाट याला आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील वांद्रे येथून अटक केली. न्यायालयाने त्याला तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना शहरातील शेरसवारनगर येथील व्यावसायाने शिक्षक असलेले मोहम्मद फेरोज अब्दुल सत्तार, त्यांचे भाऊ आणि त्यांच्या परिचयातील अन्य गुंतवणूकदारांना आरोपींनी बाबा ट्रेडिंग व आरटीजी कंपनीत पैसे गुंतवल्यास वर्षभरात तिप्पट परतावा देण्याचे प्रलोभन दाखविले. या आमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. मात्र, पैसे जमा झाल्यानंतर आरोपींनी पोबारा केला. याप्रकरणी दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह एमपीआयडी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाईल फोनचा वापर करीत नसल्याने शोध घेणे पोलिसांसमोर होते आव्हान

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. यापूर्वी या प्रकरणातील संशयित आरोपी वसीम अहमद अब्दुल गफार (वय ३७) आणि मोहम्मद युनुस अहमद मोहम्मद सलीम (वय ३४, दोघे रा. इतवार गल्ली, कचेरी रोड, जुना जालना) यांना दि. ७ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. सध्या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सूत्रधार एजाज सलाट फरार होता. तो मोबाईल फोनचाही वापर करीत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते.

पाच दिवसांची पोलीस कोठडी

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीदारांच्या माध्यमातून त्याचा माग काढला. तो मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोधमोहीम राबविली. अखेर निर्मलनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहकार्याने एजाज सलाट याला रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. आरोपीला जालना येथे आणल्यानंतर अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Read About : Wildlife Water Scarcity in Marathwada – जंगलातील पाणवठे आटण्याच्या मार्गावर, मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होणार ?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.