Ad Advertisement Ad Advertisement

Digital Arrest Scam in Sambhajinagar – कंपनी अधिकाऱ्याला 9 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ ठेवून 9.90 लाखांचा गंडा

मनी लाँड्रिंग अन् ईडीची भीती : पत्नी, मुलीला अटक करण्याची धमकी देत मोडायला लावल्या एफडी

छत्रपती संभाजीनगर : Digital Arrest Scam in Sambhajinagar मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात नाव आल्याची व ईडीच्या कारवाईची भीती दाखवून सायबर भामट्यांनी एका खाजगी कंपनीच्या ६३ वर्षीय अधिकाऱ्याला तब्बल नऊ दिवस व्हिडिओ कॉलवर डिजिटल अरेस्ट केले. यादरम्यान त्यांच्याकडून ९ लाख ९० हजार रुपये उकळले. भामट्यांनी या अधिकाऱ्याला पत्नी व मुलीला अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्या पोस्टातील एफडी आणि म्युच्युअल फंड मोडायला लावत ही रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग करून घेतली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलाकर बोराळकर (६३, रा. गारखेडा परिसर) असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते चिकलठाणा एमआयडीसीतील जॉली बोर्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मागील २७ वर्षांपासून ‘क्वालिटी इन्चार्ज’ म्हणून कार्यरत आहेत. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास बोराळकर यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने दिल्लीच्या टेलिकम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगत, तुमच्या मोबाईल क्रमांकावरून धमकावण्याचे फोन गेले असून मुंबईत १० ते १५ तक्रारी दाखल आहेत, असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या एका क्रमांकावर व्हॉट्सॲप कॉल करायला लावून भामट्यांनी पडताळणीच्या नावाखाली बोराळकर यांचे आधार कार्ड मागवून घेतले.

तिरंगा, पोलिसांचा झेंडा अन् टेबल ठेवून सेटअप

विश्वास बसावा म्हणून भामट्यांनी व्हिडिओ कॉलवर पाठीमागे तिरंगा व पोलिसांचा निळा झेंडा आणि समोर टेबल असा सेटअप ठेवला होता.तसेच ईडीच्या कार्यालयाचे बनावट पत्रही पाठवले. सोबत कुमार गोयल याच्या मनी लाँड्रिंग केसमध्ये तुमचे नाव आले आहे. तुमच्या नावे खाते उघडून त्यात काळा पैसा फिरवला गेला असून, तुम्हाला जामीन मिळणार नाही. पोलीस वॉरंट निघाले असून पोलीस घरी येऊन तुमच्यासह पत्नी व मुलीला उचलून तुरुंगात टाकतील आणि बँक खाते फ्रीज करतील, अशी भीती भामट्यांनी घातली. २२ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ सतत व्हिडिओ कॉल करून भामट्यांनी बोराळकर यांना मानसिक दडपणाखाली ठेवले.

सुप्रीम कोर्टात पडताळणीच्या नावाखाली मोडल्या एफडी
  • हा प्रकार कोणास सांगितल्यास कुटुंबाला इजा पोहोचवण्याची धमकी देत भामट्यांनी बोराळकर यांना त्यांचे सर्व पैसे सुप्रीम कोर्टात पडताळणीसाठी पाठवावे लागतील, असे सांगितले.
  • यामुळे घाबरलेल्या बोराळकर यांनी पोस्ट बँकेतील आपल्या एफडी आणि म्युच्युअल फंड मोडून ते पैसे एचडीएफसी व बँक ऑफ इंडियाच्या खात्यात वळते केले.
  • ३० ऑक्टोबर रोजी त्यांनी एका खात्यातून ४ लाख ९३ हजार आणि दुसऱ्या खात्यातून ४ लाख ९७ हजार असे एकूण ९ लाख ९० हजार रुपये आरोपींनी दिलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पाठवले.
  • हे खाते श्रीकोना शाखेतील असून एस के जमशेद हे खातेदार आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

Read About :Pregnant Woman Suicide – सहा महिन्यांच्या गर्भवतीची गच्चीवरून उडी मारून आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.