सोळा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न : सासरच्या पाचजणांविरुद्ध गुन्हा; पती, सासूला कोठडी
छत्रपती संभाजीनगर : Pregnant Woman Suicide लग्नानंतर अवघ्या सोळा महिन्यांतच सासरी छळ सुरू झाल्यामुळे सहा महिन्यांच्या गर्भवतीने आत्महत्या केली. चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे सोनू विनोद राठोड (१९) या विवाहितेने पतीसमोरच थेट गच्चीवरून उडी मारून हे टोकाचे पाऊल उचलले. यात तिच्या पोटातील बाळही दगावले. सातारा परिसरातील माहेरी असताना आलोकनगरमध्ये २६ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सासरच्या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि सासूल अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पती विनोद राठोड (२६), सासू सुनिता राठोड (४५), अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, दीर विशाल राठोड (२४), मावस सासू पिनाबाई राठोड आणि मावस सासरा सुभाष राठोड (सर्व रा. गेट नं ५६, मुकुंदनगर, मुकुंदवाडी), हे तिघे पसार झाले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
मृत सोनूचे वडील रमेश दासू चव्हाण (४०) हे फिर्यादी आहेत. १२ जून २०२५ ला कुबेर लॉन्स, बोरगाव येथे सोनू हिचा विनोद राठोड याच्याशी विवाह झाला. २० ऑगस्ट २०२६ रोजी चारित्र्यावर संशय घेऊन सासरी सोनूला मारहाण केली होती. तेव्हा तिने वडिलांना फोन करून हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर समजूत घातल्यावर सासऱ्यांनी काही दिवस तिला चांगले नांदविले होते.
घटस्फोटाचा बॉण्ड अन् दुसऱ्या लग्नाचा दबाव
एक महिना होताच पुन्हा सासरी सोनूच्या चारित्र्यावर संशय घेऊन धुसफूस सुरु झाली. ४ ऑक्टोबरला सासरच्या लोकांनी तिला जालन्याला नेले. तिथे त्यांचा घटस्फोटाचा बॉण्ड तयार केला आणि दिरासोबत लग्न करण्यासाठी दबाव वाढविला. तेव्हा सोनू ही सहा महिन्यांची गर्भवती होती. तिने या प्रकाराला नकार दिला. त्यामुळे १४ ऑक्टोबरला विनोदने पुन्हा तिला मारहाण केली. त्यानंतर रमेश चव्हाण हे तिला माहेरी घेऊन गेले होते. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख करीत आहेत.
पती भेटायला यायचा, वाद होताच गच्चीवरून उडी
- सोनूला माहेरी घेऊन गेल्यानंतर दर दोन दिवसाआड तिचा पती विनोद हा भेटायला यायचा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी २५ ऑक्टोबरला रात्री ११ वाजेच्या सुमारास विनोद सोनूला भेटायला आला.
- मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत तो तिथेच होता. त्यानंतर तो घरी गेला पण, तासाभराने दीड वाजता तो पुन्हा आलोकनगरला सोनूकडे आला. तेव्हा सोनू, तिची बहीण आणि विनोद हे तिघेही गच्चीवर गेले.
- तिथेच पहाटे ४ वाजता सोनू आणि विनोद या पती-पत्नीचा वाद सुरू झाला. दुसरी मुलगी हा प्रकार वडिलांना सांगण्यासाठी खाली गेली तेवढ्या वेळेत सोनूने गच्चीवरून उडी मारली.
- गच्चीवरून काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने सर्वजण तिकडे धावले. समोर सोनू दिसताच तिला जखमी अवस्थेत घाटीत दाखल केले. २७ ऑक्टोबरला तिच्या पोटातील बाळ दगावले. २९ ऑक्टोबरला सोनूचा मृत्यू झाला.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Asian Games 2026 : ट्रीसा-गायत्रीचा वर्ल्ड नंबर-3 जोडीला धक्का
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.